You are currently viewing भारताचा २०९ धावांनी पराभव करून सर्व आयसीसी चषक जिंकणारा ऑस्ट्रेलिया पहिला संघ ठरला

भारताचा २०९ धावांनी पराभव करून सर्व आयसीसी चषक जिंकणारा ऑस्ट्रेलिया पहिला संघ ठरला

*भारताचा २०९ धावांनी पराभव करून सर्व आयसीसी चषक जिंकणारा ऑस्ट्रेलिया पहिला संघ ठरला*

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) :

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या जागतिक कसोटी विजेतेपदाच्या अंतिम सामन्यातील पराभवानंतर भारतीय कर्णधार रोहित शर्माने अंतिम सामन्याच्या स्वरुपा विषयी मोठं वक्तव्य केलं आहे. रोहितने म्हटले आहे की पुढील आवृत्तीपासून जागतिक कसोटी विजेतेपदाच्या अंतिम सामन्यात तीन सामन्यांच्या मालिकेद्वारे निर्णय केला जावा. हे सामने केवळ इंग्लंडमध्येच नाही तर जगाच्या कोणत्याही भागात आयोजित केले जाऊ शकतात, असेही रोहितने सांगितले. मात्र, त्यानंतर ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सने त्याला चोख प्रत्युत्तर दिले. कमिन्स म्हणाले की, आम्ही आता जागतिक कसोटी विजेतेपद जिंकलं आहे. आम्हाला कितीही सामन्यांच्या मालिकांची समस्या नाही. ऑलिम्पिकमध्ये खेळाडूंना अंतिम फेरीत सुवर्णपदक जिंकण्याची एकच संधी मिळते.

रोहित आणि त्याचे सहकारी आता रडीचा डाव खेळत अाहेत. भारतीय संघात पराभव खिलाडूवृत्तीने घेण्याचा दिलदारपणा नाही. रोहितने नाणेफेक जिंकल्यानंतर गोलंदाजी स्वीकारली तिथेच सामन्याचा निकाल लागला होता. भारतीय संघ चौथ्या डावात फलंदाजी करून जिंकण शक्य नव्हतं हे रोहितलाही ठाऊक होतं. पण त्याच्या चुकीच्या निर्णयाचा फटका भारतीय संघाला सहन करावा लागला. अश्विनला संघाबाहेर ठेऊन जडेजाला संघात स्थान देणं अनाकलनीय होतं. विराट नेहमीप्रमाणे स्वतःसाठी खेळत राहिला, त्याच्यासाठी संघ ही कधीच प्राथमिकता नसते. तेच त्याने पुन्हा सिद्ध केलं. आतातरी निवड समिती त्याला बाहेरचा रस्ता दाखवेल का, हा नेहमीप्रमाणे अनुत्तरित प्रश्न आहे.

भारतीय संघातले जे खेळाडू अ, ब आणि क दर्जा मध्ये करारबद्ध आहेत त्यांना आयपीएलमध्ये खेळण्यासाठी पूर्णपणे मज्जाव करावा. आयपीएलमध्ये अनेक खेळाडू दुखापतग्रस्त होतात त्यामुळे ते राष्ट्रीय संघाला त्यांचं सर्वोत्कृष्ट योगदान देऊ शकत नाहीत. हे १६ वर्षांमध्ये वारंवार सिद्ध झालं आहे. हा निर्णय आता घ्यावाच लागेल. राष्ट्रीय संघ ही खेळाडूंची प्राथमिकता असली पाहिजे. नाहीतर त्यांना सरळ संघाबाहेर ठेवणेच श्रेयस्कर आहे. भारताचे दहा तर ऑस्ट्रेलियाचे केवळ दोन खेळाडू आयपीएलमध्ये खेळत होते. ह्यावरूनच देश कोणासाठी महत्त्वाचा आहे हे दिसून येते.

रोहित म्हणाला, आम्ही सर्व खेळाडूंना मोकळेपणाने खेळण्यास सांगितले होते आणि विरोधकांना दबावाखाली आणण्यास सांगितले होते. आम्ही दुसऱ्या डावात निर्भय क्रिकेट खेळण्याचा निर्णय घेतला आणि केवळ १० षटकांत ६० धावा केल्या. ४४४ धावांचा पाठलाग करण्यासाठी आम्ही आशावादी होतो पण काही खराब शॉट खेळल्याने सामना गमावला. कर्णधार म्हणाला की प्रथम क्षेत्ररक्षण निवडल्यानंतर पहिल्या तीन विकेट्स घेत भारताची स्थिती चांगली होती. मात्र, त्यानंतर स्टीव्ह स्मिथ आणि ट्रॅव्हिस हेड यांच्यातील २८५ धावांच्या भागीदारीने सामन्याचा रूपच पालटले. रोहित म्हणाला, पहिल्या सत्रानंतर आम्ही चांगली गोलंदाजी केली नाही. भारताच्या लाल-बॉल संघातील बदलांचे संकेत देताना रोहित म्हणाला – अनेक खेळाडू देशांतर्गत क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करत आहेत. त्या खेळाडूंना शोधून त्यांना संघात स्थान देण्याचा विचार करायला हवा. आता याकडे आमचे लक्ष असेल. त्याच वेळी, जेव्हा ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्सला रोहितच्या तीन सामन्यांच्या मालिकेतील वक्तव्यावर उत्तर विचारण्यात आले तेव्हा तो म्हणाला – मला वाटते की ते देखील करणे योग्य होईल. मला काही हरकत नाही. मला वाटते की तुमच्याकडे 50 सामन्यांची मालिका देखील असू शकते, परंतु तुम्हाला ऑलिम्पिक सुवर्णपदक जिंकण्याची फक्त एक संधी मिळेल. ऑस्ट्रेलियन फुटबॉल लीग (एएफएल) आणि ऑस्ट्रेलियन नॅशनल रग्बी (एनआरएल) यांचीही एकच फायनल आहे. हा खेळ आहे.

कमिन्स म्हणाला- इथे तुम्हाला जिंकण्याची एकच संधी आहे, पण फायनलमध्ये स्थान मिळवण्यासाठी तुम्हाला जगात कुठेही विजय मिळवावा लागेल. माझ्या मते ही सायकल २० कसोटी सामन्यांची होती. यापैकी, आम्ही फक्त तीन किंवा चार कसोटी गमावल्या असतील, परंतु २० सामन्यांमध्ये आमच्या खेळाडूंनी खुपच चमकदार कामगिरी केली. आम्हाला परिस्थितीची चांगली सवय झाली आहे आणि त्यामुळेच आमचे विजेतेपदाचे खरे दावेदार आहोत.

या सामन्याबद्दल बोलायचे झाले तर ऑस्ट्रेलियाने नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना पहिल्या डावात ४६९ धावा केल्या. एका टप्प्यावर कांगारूंनी ७६ धावांत तीन विकेट गमावल्या होत्या. त्यानंतर ट्रॅव्हिस हेड आणि स्टीव्ह स्मिथ यांनी १२१ धावांची भागीदारी करून सामना भारतापासून दूर नेला. ट्रॅव्हिसने १६३ आणि स्मिथने धावा केल्या. त्याचवेळी अॅलेक्स कॅरीने ४८ धावा केल्या. प्रत्युत्तरात भारताचा पहिला डाव २९६ धावांवर आटोपला. एका क्षणी टीम इंडियाने ७१ धावांत चार विकेट गमावल्या होत्या आणि टीम फॉलोऑनही वाचवू शकणार नाही असे वाटत होते. यानंतर रवींद्र जडेजाने ४८ धावांची, अजिंक्य रहाणेने ८९ धावांची आणि शार्दुल ठाकूरने ५१ धावांची खेळी करत भारताला फॉलोऑनपासून वाचवले. ऑस्ट्रेलियाला १७३ धावांची आघाडी मिळाली.

दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाने आठ गड्यांच्या मोबदल्यात २७० धावा करून डाव घोषित केला. मार्नस लबुशेनने ४१, अॅलेक्स कॅरीने नाबाद ६६ आणि मिचेल स्टार्कने ४१ धावा केल्या. ऑस्ट्रेलियाने भारतावर ४४३ धावांची आघाडी घेत ४४४ धावांचे लक्ष्य ठेवले होते. प्रत्युत्तरात रोहित-शुबमन गिलने टीम इंडियाला चांगली सुरुवात करून दिली. दोघांनी ४१ धावा जोडल्या. १८ धावा करून शुभमन वादग्रस्त झेलबादचा बळी ठरला. यानंतर रोहित आणि पुजारा यांनी सावध फलंदाजी करत ५१ धावांची भागीदारी केली. मात्र, लागोपाठ दोन षटकांत दोघांच्या विकेट्सने टीम इंडियाला अडचणीत आणले. रोहित (४३) आणि पुजारा (२७) हे दोघेही खराब फटके खेळून बाद झाले. ९३ धावांपर्यंत टीम इंडियाच्या तीन विकेट पडल्या होत्या. यानंतर चौथ्या दिवशी विराट कोहली आणि अजिंक्य रहाणे यांनी एकही विकेट पडू दिली नाही आणि नाबाद पॅव्हेलियनमध्ये परतले. पाचव्या दिवशी कोहलीही खराब शॉट खेळून पॅव्हेलियनमध्ये परतला. तो ४९ धावा करून बाद झाला. कोहली आणि रहाणे यांनी चौथ्या विकेटसाठी ८६ धावांची भागीदारी केली. रवींद्र जडेजा आणि शार्दुल ठाकूर यांना खातेही उघडता आले नाही. भरत २३ धावा, उमेश एक धाव आणि सिराज एक धावा करून बाद झाला. रहाणेने ४६ धावांची खेळी खेळली. अशा प्रकारे भारताचा संपूर्ण डाव २३४ धावांवर संपुष्टात आला आणि टीम इंडियाला २०९ धावांनी पराभवाला सामोरे जावे लागले.

ट्रॅव्हिस हेडला सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

twenty − three =