सावंतवाडी
तळवडे-मिरस्तेवाडी येथील शेतकरी रमाकांत कुलकर्णी यांच्या घराच्या परिसरात तब्बल सहा फुट लांबीची मगर आढळून आली. तिला पकडून नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले. ही घटना काल रात्री घडली.
याबाबत अधिक माहिती अशी की, तळवडे येथे भरवस्तीत मगर असल्याची माहिती सावंतवाडी वनक्षेत्रपाल मदन क्षीरसागर यांना देण्यात आली. त्यानंतर वनविभागाचे जलद बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले. यावे॓ळी ६ फूट लांबीची मगर श्री. कुलकर्णी यांच्या घराच्या परिसरात असल्याचे दिसून आले. घराच्या बाजूला असलेल्या होडावडा नदीतून आली असावी, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.
वन विभागाचे कर्मचारी रामचंद्र रेडकर यांनी तळवडे ग्रामस्थांच्या मदतीने मोठ्या शिताफीने त्या मगरीला यशस्वीरित्या पकडले. तद्नंतर ती मगर नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यासाठी सुदृढ असल्याने, तिला नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यात आले.