*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा.सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रा.सौ.सुमती पवार लिखित अप्रतिम लेख*
*वट सावित्रीचे व्रत करावे काय?*
नवा अन्वयार्थ…
मंडळी,
मोठा अवघड प्रश्न आहे हो हा! फार मोठी भावनांची गुंतागुंत
त्यात आहे.आपला समाज अजुनही रूढी, परंपराग्रस्त आहे.
ह्या रूढी परंपरा आपल्या रक्ताइतक्याच जुन्या व मुरलेल्या
आहेत.जसे रक्त बदलत नाही तशा परंपराही बदलत नाहीत ,
फक्त काळानुसार त्यात थोडेफार बदल होतात इतकेच !
सावित्रीच्या कथेची मी उजळणी करण्याचे कारण नाही.
कारण, आपण त्यात मुरलेलो आहोत. आपले वेद पुराणे धर्मग्रंथ यां विषयी आपण पूर्ण आदर बाळगावा असेच
ते आहेत या बद्दल शंकाच नाही. जीवनाच्या सर्व प्रश्नांची
उत्तरे आपल्या प्राचिन सर्व धर्मग्रंथात मिळतात इतके ते
आदरणिय आहेत.
पण हे सारे स्थलकाल सापेक्ष असते.म्हणून त्या काळाची
गरज म्हणून लिहिलेले हे माननीय ग्रंथ व त्या वेळी मोलाचे
ठरलेले विचार आज तुम्ही तसेच्या तसे लागू करणार असाल
तर ते कसे शक्य आहे? त्या वेळी समाज घडत होता, संस्कृती
बनत होती, नियम ठरत होते , रूढी परंपरा बनत होत्या,ही
हजारो वर्षांपूर्वी त्या काळाची ती गरज होती.
वैद्यकिय संशोधन तर फारसे झालेले नव्हते. त्या काळचे
शल्य विशारद भूल न देता ॲापरेशन करत होते. किती भयंकर
असतील हो त्या वेदना? आणि जडीबुटी हीच औषधे होती
जी आजही आपण वापरतो व रूग्णांना त्याच फायदा ही होतो.
पण हे असेच्या असे पुढे चालवा असे तुम्ही म्हणत असाल तर
कसे चालेल ? नाहीच चालणार हे आपल्याला माहित आहे.
हळू हळू समाज घडत गेला. राजे महाराजांचे राज्य आले.
माणूस माणूस बनू लागला पण बरोबरीने चिकटलेल्या रूढी
परंपरा अधिक मजबूत होऊ लागल्या. उदा. सतीची चाल,
केशवपन इ. ह्याला कारण आपल्यातील अज्ञान जे शिक्षणाच्या अभावामुळे रूजले होते, अजून आहे. ह्या परंपरा
रूढी साक्षर व शिकलेल्या समाजातूनही नष्ट झाल्या नाहीत
व होत नाहीत इतक्या त्या मजबूत आहेत. त्यातीलच एक
म्हणजे जाती व्यवस्था.
हे सगळे सांगण्याचे कारण म्हणजे, कालांतराने इंग्रज आले,
इंग्रजी भाषा आली, नवे ज्ञान विज्ञान आले, समाजातील शिक्षण व साक्षरतेचे प्रमाण वाढले तरी ही माणूस परंपरांना
रूढींना चिकटून राहिला. पुरूषप्रधान समाज व्यवस्थेने स्रियांना
ह्या परंपरेत असे काही जखडले की जवळ जवळ घरातच डांबुन तोंड बाहेर काढायला जागाच ठेवली नाही.तुम्हाला
आश्चर्य वाटेल १२/१२ वर्षे सूर्यप्रकाश न पाहिलेल्या स्रिया
त्या काळात होत्या.खरे वाटू नये पण सत्य आहे.चौदाव्या वर्षी
विधवा झालेली चिमुरडी केशवपन करून आलवणात अंधाऱ्या
खोलीत डांबलेली!
वास्तविक गार्गी मैत्रेयी द्रौपदी कुंती माद्री जिजाऊ झाशी
येसूबाई ताराबाई रमा बाई अहिल्याबाई अशा तेजस्वी स्रिया
आपल्याकडे झाल्या पण त्याही परंपरेचं हे जोखड न भिरकावता पुरूष प्रधान समाज व्यवस्थेचे भयकारी वास्तव
स्वीकारून त्यात धन्यता मानत राहिल्या.सती जाणे एवढी
सोपी का गोष्ट होती ? बायको मेल्यावर एखादाही नरवीर
सती का गेला नाही? कारण तेराव्या दिवशी तेरा वर्षाच्या मुलीशी लग्न करायला तो मोकळा होता. मंडळी खेदाने
म्हणावेसे वाटते, टिळक आगरकर रानडे यांच्या सारख्या
विद्वान लोकांच्या काळातील ह्या घटना आहेत.जे स्वत:ला
सुधारणावादी म्हणवत होते व केसरी व सुधारक नावाचे
वर्तमान पत्र चालवत होते. त्या काळी तडफदार ताराबाई
शिंदे यांचे जळजळीत व काशिबाई कानिटकरांनी
लिहिलेले लेख वाचले म्हणजे त्यांचा तळतळाट
समजतो. हरि नारायण आपटे यांची” पण लक्षात कोण घेतो?” ही कादंबरी वाचा म्हणजे १३/१४ वर्षांच्या चिमुरड्यांची
काय हालत होती ते तुम्हाला कळेल! १३/१४ व्या वर्षी न कळत्या खेळण्याच्या वयात लादलेली बाळंतपणे बायकांचा
खुळखुळा करून टाकत, स्रिया मरत, रोगी बनत पण गृहस्थाश्रम चालू, विधवा स्रिया घरातल्याच लोकांच्या पापाच्या बळी ठरत व पाय घसरला कुणाचा? तर स्री चा!
मग पुरूष पूर्णच घसरतो का हो?
डॅा. आनंदी बाई ही अशा अकाली बाळंतपणापासून सुटल्या
नाहीत व त्यांचे पोर अकालीच दगावले. नशिबाने फुले दांपत्य
जन्माला आले व हळू हळू शृंखला सैल होऊ लागल्या,निराधारांना आश्रय व निवारा मिळाला व शिक्षणही मिळाले.
व निदान या अवस्थेपर्यंत आपण पोहोचलो. नाही तर …?
कल्पनाही करवत नाही.
मग सावित्रीचे व्रत आज कसे करायचे? पारंपारिक त्याच
त्या रूढी परंपरा तशाच पुढे चालवायच्या की त्यांना नवा साज
द्यायचा? व्रत वैकल्ये करू नये असे कोण म्हणते? फक्त त्याला नवी परिमाणे द्या. काळानुसार बदला. अहो, फेऱ्या मारून दोरा बांधून काय साध्य करणार तुम्ही? ज्या श्रद्धेने त्या
काळच्या स्रियांनी हे व्रत केले तो जमानाच वेगळा होता.
आज आपण विज्ञान युगात चंद्रावर जाण्याच्या तयारीत
असलेले लोक आहोत.म्हणून वड पुजेचा नवा अर्थ शोधा.
गेल्या हजारो वर्षांपासून लोकसंखे वाढीबरोबर आपण झाडांची अपरिमित हानी केली आहे त्यामुळे आपले पर्यावरण
पूर्ण ढासळले आहे.पाण्याच्या गंभीर समस्या निर्माण झाल्या
आहेत. पावसाचे गणित बिघडले व तो विध्वंसक झाला आहे.
ह्यावर आपण उपाय शोधायला हवा. वृक्ष तोडीमुळे चिमण्यांचा
कॅांक्रिटच्या जंगलात निवारा हरवला आहे. तो शोधायला हवा ना? त्या साठी दिर्घ काळ टिकणारे प्राणवायू देणारे, पक्ष्यांना
आश्रय देणारे वृक्ष लावायला नकोत ? तीच आज काळाची
गरज आहे. वडा भोवती धागा बांधत फिरण्या ऐवजी प्रत्येकी
एक झाड आपण जोपासले तर… ? पर्यावरणाची सारी गणितेच बदलून जातील.. खरं ना?
इतर सर्वच सणांचा नवा अन्वयार्थ आपण शोधायला व
काळानुरूप त्यात बदल घडवायला हवेतच हवेत, नाही तर
काळ आपल्याला क्षमा करणार नाही. त्याची सहनशिलता
जितकी मोठी तितकी त्याची विध्वंसकता भयकारी आहे. त्याची प्रचिती आपण घेत आहोत. मग वाट कसली बघता?
विध्वंसाची की नव्या चांगल्या युगाची? काळाच्या काठीचा
आवाज होत नाही, ती र्रप्पकन् पाठीत बसते व माणूस
नेस्तनाबूत होतो. काय करायचे ते तुम्ही ठरवा.
जगायचे… की … मरायचे…?
भले ही विषयांतर आले असेल कदाचित पण ह्या विषयावर
बोलणे आवश्यक आहे.
बरंय् मंडळी,
राम राम 🙏🏼🙏🏼
आणि ही मते फक्त नि फक्त माझीच आहेत .
आपलीच,
प्रा.सौ. सुमती पवार नाशिक
(९७६३६०५६४२)
दि : ८ जून २०२३
वेळ : संध्या : ४/३८
*संवाद मिडिया*
*🧑🏻🎓प्रवेश..सुरू ! प्रवेश..सुरू ..!! प्रवेश..सुरू ..!!!🧑🏻🎓*
📣 *B. C. A. DEGREE*
*BCA Degree ला ॲडमिशन म्हणजे संगणक क्षेत्रात करिअर करण्याची सुवर्णसंधी.*🧑💻🧑💻
*👉 प्रवेश पात्रता…*
*▪️प्रथम वर्ष बीसीएकरिता: कोणत्याही शाखेची बारावी परीक्षा (गणित किंवा गणिताशिवाय) किमान ४५ टक्के व मागासवर्गीयांसाठी ४० टक्के गुणांसह उत्तीर्ण किंवा अभियांत्रिकी पदविका उत्तीर्ण*
*▪️थेट द्वितीय वर्ष बीसीएकरिता: डिप्लोमा पदवीका प्रथम श्रेणीत उत्तीर्ण (सिव्हिल इंजिनियर व्यतिरिक्त)*
*▪️मर्यादित प्रवेश उपलब्ध*
*संपर्क:*
*महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था, कॉलेज ऑफ कॉम्प्युटर ॲप्लिकेशन फॉर वुमन्स*
*(एसएनडीटी महिला विद्यालय, मुंबई संलग्न)*
*साखरतर रोड, शिरगाव, रत्नागिरी*
*📱 ७९७२९९७५६७, ९४२०२७४११९*
*Advt Link*
———————————————-