You are currently viewing समर्पण

समर्पण

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा.सदस्या लेखिका कवयित्री अंजली दीक्षित लिखित अप्रतिम लेख*

 

*समर्पण*

 

समुद्राच्या किनाऱ्यावर लाटांना आपल्या पायावर आदळू दे, घरंगळून तिला पुन्हा समुद्राच्या पोटात जाऊ दे, पुन्हा पुन्हा खोडसाळपणा करत उंच उंच लाटा आपल्याला भिजवायला येऊ दे,तेव्हा वाटलेल्या अनामिक भीतीमध्ये आपण चिंब होऊन जाऊ दे, तिने ओल्या स्पर्शाने उस्फूर्तपणे न्हाऊ घातल्यावर रेतीत रुतत जाणारी आपली पावलं आणि तोल सांभाळताना शरीराला मिळालेले नाजूक हिंदोळे किती सुंदर असतात ना?

 

मऊ मऊ लुसलुशीत हिरव्यागार गवतावरून चालत जाताना तळपायाला होणारा त्या गवताचा वेल्हाळ स्पर्श आठवतोय का? अशा गवतावरून चालत चालत पाण्याच्या आवाजाच्या दिशेने जात असताना वाटेत पिवळ्या धम्मक रंगांची इवली इवली फुललेली सोनकीची फुलं आपल्याबद्दल काही बोलत असतील का? का त्यांच्या गावीही नसू आपण? का ती आपसात खेळण्यातच दंग असतील? त्यांच्या इतक्याशा आयुष्याचा मनसोक्तपणे आनंद लुटताना बाहेरच्या जगाकडे फार उत्सुकतेने बघण्याचं भान तरी राहत असेल का त्यांना?

 

निसर्गातली प्रत्येक गोष्ट अशीच समर्पित आयुष्य घेऊन येते. कुठल्यातरी नाजूक क्षणाला आपले सारे जीवन समर्पित करून लुप्त होते.

हे त्या क्षणांशी तादात्म्य पावणे, एकरूप होणे म्हणजे आपल्याला मिळालेले जीवनातले उच्च श्रेणीचे परमोच्च आनंदाचे बिंदू!हा निरपेक्ष भाव,हे समर्पण जेव्हा आपण धीरगंभीर पण प्रसन्न वातावरणात एखाद्या शांत पवित्र मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश करतो त्यावेळी अनुभवतो; अगदी नकळतपणे तिथल्या पवित्र लहरींचा प्रवेश आपल्या शरीरात होतो आणि स्वाभाविकच सगळा अहंकार,मागणं,मी पणा गळून पडतो. दर्शनाची आस घेऊन तासनतास रांगेत उभं रहावं,पाय उंच करून करून मुख्य प्रतिमा दिसते का हे बघण्याची धडपड करावी आणि शेवटी जेव्हा ती शालीन, सुंदर, सात्त्विक,प्रेमळ प्रतिमा आपल्यासमोर असते तेव्हा डोळे आपोआपच मिटले जावेत आणि सहजच नतमस्तक व्हावं त्या शक्तीपुढे…हेच तर समर्पण! तुम्ही आस्तिक असा अथवा नास्तिक, मूर्तीपूजा माना अथवा नका मानू, जेव्हा तुम्ही अशा एका पवित्र शक्तीच्या सानिध्यात येता तेव्हा क्षणभरासाठीच का होईना आपण आपले रहात नाही.

माझा स्वत:चाच अनुभव काहीसा तसा आहे. तशी मी फारशी श्रद्धाळू वगैरे नाही.पण तिरूपती बालाजीला जेव्हा प्रथम गेले, तिथल्या अंधाऱ्या गाभाऱ्यातल्या मिणमिणत्या प्रकाशात त्याचं दर्शन झालं आणि अक्षरशः डोळ्यातून पाणी कधी वहायला लागलं कळलंच नाही. ही अतिसंवेदनशीलता म्हणेल कोणी पण तो क्षण कदाचित माझा नव्हताच. त्यावेळेपुरते कदाचित माझे अस्तित्व माझे नव्हतेच. ती जागृतावस्था नव्हतीच…खरं तर या अनुभवण्याच्याच गोष्टी आहेत त्यांना शब्दात बांधणं हाच एक केविलवाणा प्रयत्न आहे. त्या एका अंतर्बाह्य बदलून टाकणाऱ्या क्षणाच्या अनूभूतीसाठी आपण शेकडो हजारो किलोमीटर्सचा प्रवास करून त्या शक्तीच्या सानिध्यात जाण्यासाठी धडपडतो.असाही प्रसंग पाहिलाय की तिथे जाऊन सुद्धा तुम्हाला दर्शन मिळालेलं नाही…हो ना? तरीही आतुरता कायम आहे, का? कशासाठी?

 

अशाच स्वरूपाचा अनुभव अजून दोन ठिकाणी मला नेहमी येतो.एक म्हणजे शेगावला श्री गजानन महाराज मंदिरात आणि दुसरा स्वामी विवेकानंदांचे गुरू श्री. रामकृष्ण परमहंस यांच्या मठात. जसा शेगावला अतीव शांतता आणि समाधान यांचा अनुभव येतो तसेच श्री रामकृष्णांच्या मठात थोडावेळ जरी ध्यान लावून बसले तरी मनात कितीही अभूतपूर्व गोंधळ चालू असूदे तुम्ही त्या धीरगंभीर वातावरणाचा एक भाग बनून जाता. एकेक पायरी उतरत मनाच्या गाभाऱ्यात खोलवर प्रवेश करता करता अंतर्मुख होऊन मन इतकं निर्मळ आणि भक्तीमय होऊन जातं की कधी गालावरून अश्रू ओघळायला लागतात याचा पत्ता लागत नाही. मन,शरीर,आत्मा यांच्या जाणीवा शिथिल होत जातात, आपल्या नेणिवासुद्धा त्या क्षणाला शरण जातात आणि पुन्हा एकदा निर्मळ अशा समर्पणाची अनूभूती येते.

 

हे सगळं अनुभवावच लागतं. तुम्ही इतरांना सांगण्यासाठी तो अनुभव शब्दात पकडण्याची कितीही धडपड करा पण ते सफल होणार नाही. हा एक ज्याचा त्याचा प्रवास आहे, एकट्यापासून सुरू झालेला आणि एकट्यानेच पूर्ण करण्याचा. मला तर असं वाटतं बरेचदा की अशी अनुभूती ही कधी कधीच अनुभवायची गोष्ट आहे आणि कधी कधीच ती आपल्या वाट्याला येते. परंतु अशी उत्कटता निसर्गानं प्रत्येक जीवात ठासून भरली आहे फक्त आपण मॉडर्न होण्याच्या नादात या गोष्टींपासून पारखे होत जात आहोत. काहीही झालं तरी ही प्रचिती आपल्याला हवी तेव्हा हवी तशी येणारच नसते त्यासाठी ‘त्या’ची सुद्धा इच्छा अतिशय महत्त्वाची असते. तो समर्पणाचा क्षण ना आपल्या हातात आहे ना परिस्थितीच्या. अशावेळी वाटतं की आपण म्हणजे केवढासा एक टिंब आहोत. ही निसर्गाची शक्ती किती विशाल अद्भुत आहे. बस फक्त मनात किंतु न ठेवता शरण जावं त्या मिळालेल्या एका क्षणाला आणि हजारो क्षण ओवाळून टाकावेत अशा अनमोल क्षणावर.

 

…. तुम्हीही अनुभवला असेलच असा एखादा गर्भ श्रीमंत क्षण. आठवा पाहू? आणि स्वतःला भाग्यवान समजा की आपण इतके श्रीमंत आहोत की हे अनुभव मिळवायला, अनुभवायला आणि आठवायला आपलं मन शरीर आणि बुद्धी आपल्याला साथ देते आहे; यापेक्षा मोठी गोष्ट कुठली असू शकते?

 

अंजली दीक्षित (पंडित)

प्रतिक्रिया व्यक्त करा