You are currently viewing इचलकरंजी शहरासाठी आता स्वतंत्र एमएच 51 नोंदणी क्रमांक

इचलकरंजी शहरासाठी आता स्वतंत्र एमएच 51 नोंदणी क्रमांक

आम.प्रकाश आवाडे यांच्या पाठपुराव्याला यश

 

इचलकरंजी/प्रतिनिधी :

 

इचलकरंजीसह हातकणंगले व शिरोळ तालुक्यातील नागरिकांसह वाहनधारकांची उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाची प्रतिक्षा संपली आहे. या संदर्भात आमदार प्रकाश आवाडे यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश आले असून राज्य शासनाने याबाबतचा अध्यादेश जारी करत एमएच 51 हा स्वतंत्र नोंदणी क्रमांक दिला आहे.

इचलकरंजी हे कोल्हापूर जिल्ह्यातील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. शिवाय वस्रोद्योगाचे प्रमुख केंद्र असल्याने विविध उद्योगाच्या निमित्ताने वाहनांची संख्या मोठी आहे. तसेच हातकणंगले व शिरोळ तालुक्यासाठी इचलकरंजी हे मध्यवर्ती ठिकाण आहे. परंतु येथील वाहनधारकांना वाहन पासिंगसाठी कोल्हापूर येथे जावे लागत असल्याने परिणामी वेळ व पैसा खर्ची पडतो. त्यामुळे शहराचा वाढता विस्तार व भौगोलिक परिस्थिती व दोन्ही तालुक्यातील वाहनांची संख्या लक्षात घेऊन इचलकरंजी येथे उपप्रादेशिक परिवहन कार्यालय सुरु व्हावे म्हणून आमदार प्रकाश आवाडे यांनी शासन स्तरावर पाठपुरावा सुरु ठेवला होता.

दोनच दिवसांपूर्वी आमदार आवाडे यांनी पत्रकार परिषद घेऊन उपप्रादेशिक परिवहन कार्यालयास शासनाने मंजूरी दिल्याचे सांगितले होते. त्या संदर्भातील अध्यादेश आज गुरुवारी (25 मे) राज्याच्या गृह विभागाचे अवर सचिव भारत लांघी यांनी जारी केला आहे. त्याचबरोबर एमएच 51 हा नवीन नोंदणी क्रमांक दिला आहे.

हे उपप्रादेशिक परिवहन कार्यालय हातकणंगले व शिरोळ या दोन्ही तालुक्यांसाठी उपयुक्त ठरणार आहे. वाहनधारकांच्या वेळेची व पैशाची बचत होणार आहे.

याकामी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर, वस्रोद्योग मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचे मोलाचे सहकार्य लाभल्याचे आमदार प्रकाश आवाडे यांनी सांगितले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

six + eleven =