You are currently viewing को.म सा‌.प. मालवणचा “माझे आजोळ, माझी देवभूमी” हा उपक्रम संपन्न

को.म सा‌.प. मालवणचा “माझे आजोळ, माझी देवभूमी” हा उपक्रम संपन्न

मालवण :

 

‘मामाच्या गावाला जाऊया’ म्हटलं की अगदी लहान थोरी मंडळींच्या मनाला विशेष आनंद होतो. मात्र आजच्या धकाधकीच्या जीवनात 21 व्या शतकातील पिढी आजोळाला पारखी झालेली दिसून येते. मे महिना म्हटला की मामाच्या गावाची ओढ प्रत्येकाला असतेच. अशा आजोळच्या आठवणी जागवण्याच्या हेतूने कोकण मराठी साहित्य परिषद, शाखा मालवणने एक आगळावेगळा कार्यक्रम आपल्या ग्रुप वर १८ मे ते ३० मे २०२३ या कालावधीत संपन्न केला. एकूण बारा भागांमध्ये चाललेल्या या उपक्रमात कोमसाप मालवणच्या बारा सदस्यांनी सहभाग घेतला. कोकणातील निसर्ग हा सर्वांच्याच मनाला भर घालतो याच कोकणातील विविध बारा गावांची नैसर्गिक, सांस्कृतिक, सामाजिक माहिती असलेली लेखमालिका या निमित्ताने सादर करण्यात आली. गावातील विविध मंदिरे त्यांची ऐतिहासिक पार्श्वभूमी या गावात राबवले जाणारे वेगवेगळे सण, उत्सव, परंपरा या सोबतच आपल्या मामा-मामीच्या हृदयात जपून ठेवलेल्या आठवणींना या निमित्ताने उजाळा दिला गेला. आजी आजोबा मामा मामी यांनी लावलेले वेगवेगळे संस्कार आणि त्याचा जीवनात झालेला फायदा यावरही प्रत्येकाने लेखन केले.

या लेखमालिकेत नारायण धुरी, बाबू घाडीगावकर, वर्षाराणी अभ्यंकर, देवयानी आजगावकर, अदिती मसुरकर, सदानंद कांबळी, पूर्वा खाडिलकर, शिवराज सावंत, वैजयंती करंदीकर, दिव्या परब, अशोक कांबळी, विठ्ठल लाकम या कोमसाप मालवणच्या सदस्यांनी लेखन केले. त्यांनी आपल्या लेखनातून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वजराट, ता. वेंगुर्ला, हंडी जुवा पाणखोल, चांदेर मालोंड, चिंदर, पेंडूर-खरारे, मसुरे देऊळवाडा, ता. मालवण, आरोस, ता. सावंतवाडी, गोवा राज्यातील कोरगाव, ता. पेडणे, रत्नागिरी जिल्ह्यातील नरवण ता. गुहागर, रावारी, ता. लांजा या कोकणातील निसर्गसम्य गावांचं साहित्यिक वर्णन केले. त्या त्या गावांची वैशिष्ट्ये आपल्या लेखनातून रेखाटली.

या उपक्रमाचे उद्घाटन श्री. विठ्ठल लाकम यांच्या अध्यक्षतेखाली आणि अर्चना कोदे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले. तर समारोप सोहळा श्री. आत्माराम नाटेकर यांच्या अध्यक्षतेखाली आणि श्री. बाळ धुरी व सौ. पूर्वा खाडीलकर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. या कार्यक्रमाची संकल्पना श्री. सुरेश शामराव ठाकूर अध्यक्ष मालवण यांची होती. तर संयोजनाची जबाबदारी श्री. गुरुनाथ ताम्हणकर यांनी पार पाडली.

कोमसाप मालवण मराठी साहित्याच्या विकासासाठी विविध उपक्रम नियमित राबवत असते. “मी वाचले, मला आवडले, तुम्ही वाचा” या वाचन संस्कृती विकसनासाठी राबवलेल्या उपक्रमानंतर आजोळचा उपक्रम मोठ्या थाटात संपन्न झाला. यानंतर कोमसाप सदस्यांच्या लेखनाला प्रेरणा देणारे “पेरते व्हा!” हे मासिक लवकरच सुरू होणार आहे.

कोकण मराठी साहित्य परिषदेचे संस्थापक आदरणीय मधु मंगेश कर्णिक यांचे नेहमीच अशा वेगवेगळ्या साहित्यिक उपक्रमांना प्रोत्साहन असते. “माझे आजोळ, माझी देवभूमी” या उपक्रमालाही विशेष संदेशाद्वारे कोमसाप मालवणच्या सर्व सदस्यांचे खास कौतुक त्यांनी केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा