वेंगुर्ले-पालकरवाडी येथे झुंजीत गव्याचा मृत्यू…
वेंगुर्ले
तालुक्यातील पालकरवाडी येथे आज पहाटे गवारेड्यांच्या झालेल्या झुंजीत एका गवारेड्याचा मृत्यू झाला. ही घटना आज पहाटे ५.३० ते ६ वा. च्या दरम्यान घडली. एका गवारेड्याच्या कळपाने त्या एकट्या असलेल्या गवारेड्यावर हल्ला केल्याने त्यात तो मृत्युमुखी पडला असावा,असा अंदाज आहे.
आज सकाळी ९.३० वा. पालकरवाडी येथे शेतात गवारेडा मृतावस्थेत असल्याचे ग्रामस्थांच्या निदर्शनास आले. याबाबत रवींद्र महादेव वराडकर यांनी वनविभागाला माहिती दिल्यावर कुडाळ वनक्षेत्रपाल तथा सावंतवाडी सहाय्यक वनसंरक्षक अमृत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल सावळा कांबळे, मठ वनरक्षक सूर्यकांत सावंत, तुळस वनरक्षक विष्णू नरळे, वनकर्मचारी संतोष इब्रामपूरकर, शंकर पाडावे आदींनी घटनास्थळी दाखल होत पंचनामा केला. पशुधन विकास अधिकारी धनंजय कुठार यांनी शिवविच्छेदन केल्यानंतर सदर मृत गवारेड्याचे दहन करण्यात आले.
यावेळी सरपंच बंड्या पाटील, वन्यप्राणी सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष अनिल गावडे, दिपक वराडकर, विकास अणसुरकर, संतोष वराडकर, महेश कोंडसकर, स्वप्नील वराडकर, बाळा दळवी, सतीश गावडे आदिसह स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते.