You are currently viewing मूल होत नाही म्हणून पत्नीची केली हत्या

मूल होत नाही म्हणून पत्नीची केली हत्या

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) :

लग्नाला १२ वर्षे उलटूनही विविध औषधे घेऊनही मूल होत नसल्याने पतीने पत्नीची निर्घृण हत्या केल्याची घटना अंबरनाथमध्ये घडली आहे. अंबरनाथ पश्चिमेकडील आयुध निर्माण संस्थेच्या निवासी वसाहतीत ही घटना उघडकीस आली असून पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली आहे.

मूळचे बिहारचे असलेले अंबरनाथच्या ऑर्डनन्स मॅन्युफॅक्चरिंग इन्स्टिट्यूटच्या मैदानासमोर रोनितराज मंडल (३७) हे पत्नी नीतू कुमारी मंडल (३०) यांच्यासोबत राहत होते. या दोघांनी २०११ मध्ये लग्न केले. २०१६ मध्ये रोनितराजने ऑर्डनन्स मॅन्युफॅक्चरिंगमध्ये काम करायला सुरुवात केली. आयुध निर्माण संस्थेतील एच ३८ या कर्मचारी वसाहतीमध्ये हे जोडपे राहत होते. त्यांच्या लग्नाच्या १२ वर्षानंतर नीतू कुमारी निपुत्रिक असल्याने त्यांच्यावर उपचार सुरू झाले. मात्र रोनितराजला तिच्या चारित्र्यावर संशय होता आणि या कारणावरून तिच्याशी नेहमी वाद होत असे.

रविवारी दुपारी मद्यपान केल्यानंतर रोनितराज जेवत असताना पत्नीसोबत पुन्हा वाद झाला. या वादात त्याने पत्नीच्या डोक्यात जड वस्तूने वार करून तिचा खून केला. नंतर संध्याकाळी शेजाऱ्यांना बोलावून पत्नीची कोणीतरी हत्या केल्याचा बनाव केला. या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. मात्र रोनितराज काय बोलतोय याचा पोलिसांना संशय आल्याने त्यांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली.

या प्रकरणी पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला असून मृत नीतू कुमारीचा पती रोनितराज याला संशयित म्हणून अटक केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा