मुंबई :
बिहार विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचं पानीपत झाल्यानंतर भाजप नेत्यांकडून शिवसेनेवर जोरदार टीका केली जात आहे. काँगसने महाराष्ट्रात ‘हातात’ ‘धनुष्यबाण’ धरला, त्याचा ठासून फटका बिहारमध्ये बसला. आता महाराष्ट्रात सुध्दा जनतेच्या ‘घड्याळाचे’ काय सांगावे टायमिंग…? अशी टीका भाजप नेते आशिष शेलार यांनी सरकारमधील तिन्ही पक्षांवर केली.
‘काँगसने महाराष्ट्रात ‘हातात’ ‘धनुष्यबाण’ धरला, त्याचा ठासून फटका बिहारमध्ये बसला…आता…महाराष्ट्रात सुध्दा जनतेच्या ‘घड्याळाचे’ काय सांगावे टायमिंग…?पंचायत ते पार्लमेंट मॅन ऑफ द मॅच पंतप्रधान नरेंद्र मोदीच!
त्यांच्यासह नितीश कुमारजी, देवेंद्रजीं फडणवीस यांचे अभिनंदन!,’ असे ट्वीट आशिष शेलार यांनी केले आहे.
भ्रष्टाचारी काँग्रेस सोबत सलगी केलेलेल्या ‘जगंलराज का युवराज’ला बिहारच्या जनतेने नाकरले. महाराष्ट्रात पण भ्रष्टाचारी काँग्रेस सोबत ‘जंगलाचे बेगडी प्रेमी युवराज’ युती करुन बसलेत. समजनेवाले को इशारा काफी है, असेही आशिष शेलार म्हणाले.
भाजपला शह देण्यासाठी शिवसेनेने बिहारमध्ये 23 जागांवर उमेदवार उभे केले होते. या निवडणुकीसाठी शिवसेनेला ‘तुतारी वाजवणारा मावळा’ हे चिन्ह मिळाले होते. त्यानंतर शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांनी हिरीरीने प्रचारही केला होता. मात्र, एकूण 23 जागांपैकी 21 जागांवर शिवसेनेच्या उमेदवारांना ‘नोटा’पेक्षाही कमी मते मिळाली होती.
दरम्यान बिहार विधानसभा निवडणुकीत भाजप्रणित एनडीए आणि तेजस्वी यादव यांच्या महागठबंधनमध्ये प्रचंड चुरस पाहायला मिळाली. ताज्या आकडेवारीनुसार ‘एनडीए’ने बहुमताचा जादुई 122 आकडा गाठला आहे. बिहार विधानसभेच्या एकूण 243 जागांपैकी 125 जागांवर एनडीए तर 110 जागांवर महागठबंधनचे उमेदवार विजयी ठरले.
त्यामुळे बिहारमध्ये पुन्हा एकदा भाजप-जेडीयूच्या नेतृत्वातील एनडीए सरकार स्थापन होणार हे स्पष्ट झालंय. दुसरीकडे 75 जागांवर विजय मिळवत तेजस्वी यादव यांचा राष्ट्रीय जनता दल पक्ष सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला. मात्र, त्यांना सत्तास्थापनेसाठीच्या बहुमताचा आकडा गाठता आला नाही. भाजपने 74 जागांवर विजय मिळवत दुसऱ्या क्रमांकाच्या पक्षाची जागा घेतली. तर नितीशकुमारांचा संयुक्त जनता दलाने 43 जागांवर विजयाची नोंद केली. काँग्रेसला केवळ 19 जागांवर समाधान मानावे लागले.