You are currently viewing आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य 2023 वर्षानिमित्त सोमवारी जिल्हास्तरीय पौष्टिक तृणधान्य महत्व जनजागृती कार्यक्रम…

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य 2023 वर्षानिमित्त सोमवारी जिल्हास्तरीय पौष्टिक तृणधान्य महत्व जनजागृती कार्यक्रम…

पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते होणार शेतकऱ्यांना पौष्टिक तृणधान्य बियाण्यांचे वाटप

सिंधुदुर्गनगरी

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 च्या निमित्ताने महाराष्ट्र शासन कृषी विभाग, जिल्हा परिषद कृषी विभाग, सिंधु आत्मनिर्भर अभियान, सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आणि स्नेहसिंधू कृषी पदवीधर संघ यांच्या संयुक्त विद्यमाने सिंधुदुर्ग भरड धान्य अभियान उपक्रम राबविण्यात येत आहे. या अनुषंगानेच सोमवार दि. 29 मे रोजी सकाळी 10.30 वा. नवीन जिल्हा नियोजन समिती सभागृहात जिल्हास्तरीय पौष्टिक तृणधान्य महत्व जनजागृती कार्यक्रम होणार आहे. पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते या कार्यक्रमांचे उद्घाटन होत असून, जिल्ह्यातील शेतकऱ्यांना प्रातिनिधिक स्वरुपात बियाण्यांचे वाटप होणार आहे.

या संदर्भात आज पालकमंत्री श्री. चव्हाण यांनी ऑनलाईन बैठक घेत आढावा घेतला. या बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विजयकुमार राऊत, सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष अतुल काळसेकर, माजी खासदार निलेश राणे, माजी आमदार राजन तेली, प्रभाकर सावंत, स्नेहसिंधुचे अध्यक्ष हेमंत सावंत, सदस्य पंकज दळी, संदिप राणे, डी. आर. परब आदींसह तालुका कृषी अधिकारी उपस्थित होते.

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री. राऊत यांनी सर्वांचे स्वागत करुन नियोजनाबाबत माहिती दिली. त्याचबरोबर, सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष श्री. काळसेकर यांनीही यावेळी 5 टन भरड धान्यांचे बियाणे गोळा केल्याचे सांगितले. यात नाजणी, कांग, सावा, कोडो, छोटे वरी, ब्राऊन टॉप यांचा समावेश आहे.

भरड धान्यांचा आहारात वापर व्हावा- पालकमंत्री रविंद्र चव्हाण

काही वर्षांपूर्वी आपल्या सर्वांच्या आहारात भरड धान्यांचा समावेश होता. बदलत्या काळात तो कमी-कमी होत गेला. काही ठिकाणी भरड धान्यांचा वापर आहारातून बाजूला गेला आहे. या पौष्टिक भरड धान्यांचा आहारात वापर होण्याच्या दृष्टीकोनातून आंतरराष्ट्रीय वर्ष साजरे केले जात आहे. त्याची जनजागृती होण्याच्या दृष्टीने आणि आहारातील महत्व समजण्यासाठी जिल्हास्तरीय पौष्टिक तृणधान्य जनजागृती कार्यक्रम होत आहे.

याचे उत्पादन वाढविण्यासाठी शेतकऱ्यांना बियांणे वाटप करण्यात येत आहे. अशा पौष्टिक भरड धान्यांचा आहारात वापर करावा, असे आवाहन पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी केले.
सोमवारी होणाऱ्या कार्यक्रमांत सर्व लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापिठाचे सहयोगी प्राध्यापक डॉ. योगेश परुळेकर यांचे भरड धान्याचे महत्व यावर व्याख्यान होणार आहे. त्याचबरोबर यावेळी भरड धान्यांच्या महत्वाविषयी चित्रफित दाखविण्यात येणार आहे. तरी या कार्यक्रमांला शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री. राऊत यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

2 × 5 =