You are currently viewing संजय गांधी योजना कार्यालयात पुरेसे कर्मचारी नेमणूक करण्याची भाजपची मागणी 

संजय गांधी योजना कार्यालयात पुरेसे कर्मचारी नेमणूक करण्याची भाजपची मागणी 

इचलकरंजी : प्रतिनिधी

 

इचलकरंजी शहरातील संजय गांधी निराधार अनुदान योजना कार्यालयामध्ये कायमस्वरूपी नायब तहसीलदारसह दोन कर्मचारी उपलब्ध करून द्यावेत. तसेच इंदिरा गांधी हॉस्पिटल येथे आठवड्यातून एकदा नागरिकांना अपंगाचा दाखला देण्यासाठी सिव्हील सर्जन यांना कायमस्वरूपी पाठवावे या मागणीसाठी भारतीय जनता पार्टी व संजय गांधी निराधार योजना समितीचे अध्यक्ष अनिल डाळ्या यांनी निवासी उपजिल्हाधिकारी भगवान कांबळे यांना निवेदन सादर केले.

या निवेदनात म्हटले आहे की, इचलकरंजी शहरामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे सर्वाधिक लाभार्थी आहेत. संजय गांधी निराधार अनुदान योजना कार्यालयामध्ये अप्पर तहसीलदार कार्यालय इचलकरंजी मधून दोन कर्मचारी दैनंदिन कामकाजाबाबत पाठवले आहेत. याठिकाणी नायब तहसीलदार, अव्वल कारकून व महसूल कारकून असे आकृतिबंध मंजूर नसल्यामुळे ही पदे रिक्त आहेत. या कार्यालयातून सुमारे साडे ३५ हजार लाभार्थी या निराधार योजनेचा लाभ घेत आहेत. परंतू, पुरेशा कर्मचाऱ्यांच्या अभावी नवीन लाभार्थी व जुने लाभार्थी यांची कुचंबना व खोळंबा होत आहे. त्यामुळे संजय गांधी निराधार अनुदान योजना कार्यालयामध्ये सदर पदे भरणे अत्यंत गरजेचे आहे. त्याचप्रमाणे संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यासाठी फक्त छत्रपती प्रमिला राजे रुग्णालयामध्ये दिव्यांग व्यक्तींना अपंगत्वाचा दाखला देण्यात येत आहे. इचलकरंजी शहरामध्ये इंदिरा गांधी मेमोरियल हॉस्पिटल हे जिल्हा उपकेंद्र आहे. याठिकाणी संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना वयाचा दाखला देण्यात येत आहे. इचलकरंजी शहरासह हातकणंगले व शिरोळ तालुक्यातील नागरिकांना अपंगत्वाच्या दाखल्यासाठी कोल्हापूर येथील सी. पी. आर. हॉस्पिटल येथे जावे लागत आहे. सदर दाखल्यासाठी नागरिकांना किमान ३ ते ४ वेळेस कोल्हापूरला जावे लागत आहे.त्यामुळे नागरिकांचा वेळ आणि पैसा यांचा मोठा अपव्यय होत आहे. त्यामुळे इचलकरंजीमधील आय.जी.एम. हॉस्पिटल येथे किमान आठवडयातून एकदा सी.पी.आर. चे सिव्हिल सर्जन यांनी अपंगांचे दाखले देण्यासाठी येणे गरजेचे आहे. याचा लाभ इचलकरंजीसह हातकणंगले व शिरोळ तालुक्यातील नागरिकांना होणार आहे.त्यामुळे वरील दोन्ही महत्वाच्या विषयासंदर्भात भारतीय जनता पार्टी व संजय गांधी निराधार अनुदान योजना समितीचे अध्यक्ष अनिल डाळ्या यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने निवासी उपजिल्हाधिकारी भगवान कांबळे यांना निवेदन सदर केले. यावेळी यासंदर्भात सकारात्मक चर्चा झाली असून लवकरच इंदिरा गांधी मेमोरियल हॉस्पिटल येथे अपंग दाखला देणे व संजय गांधी कार्यालयात पुरेसे कर्मचारी देण्याबाबत निर्णय घेण्याचे श्री. कांबळे यांनी आश्वासन दिले.

यावेळी भारतीय जनता पार्टी व्यापारी प्रकोष्ठचे प्रदेश अध्यक्ष विनोद कांकाणी, भाजप शहर सरचिटणीस अरविंद शर्मा, कोल्हापूर जिल्हा छोटे व्यापारी संघटना जिल्हाध्यक्ष दीपक पाटील, भाजप प्रभाग क्रमांक १५ चे अध्यक्ष प्रदीप मळगे आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

18 − 2 =