You are currently viewing पुन्हा खालीस्तान (भाग २)

पुन्हा खालीस्तान (भाग २)

ब्रिगेडियर सुधीर सावंत यांचा लेख

 

पुन्हा खालीस्तान (भाग २)

 

१९८१ साली पंजाब भारतातले नंबर एक राज्य होते. हरितक्रांतीचा सर्वात जास्त फायदा पंजाबला झाला. सुबत्तेमुळे खालीस्तानची चळवळ पण सुरू झाली. १० वर्ष घनघोर संग्राम झाला. पण शेवटी शंकरराव चव्हाण गृहमंत्री असताना पंजाबमध्ये प्रचंड संघर्षानंतर शांती स्थापित झाली. पण या घनघोर संघर्षामध्ये इंदिरा गांधी मारल्या गेल्या. सरसेनापती अरुण वैद्य यांची पण हत्या झाली. सरते शेवटी बी.एन.सिंग. जे पंजाबचे मुख्यमंत्री होते, त्यांचासुद्धा घात झाला. पोलीस प्रमुख गिल यांच्या नेतृत्वाखाली पंजाब पोलिसांनी अर्थात सैन्य दलाच्या मदतीने पंजाबमध्ये शांती प्रस्थापित केली. खालीस्तानची चळवळ दाबली गेली. याचा अर्थ ती संपुष्टात आली असे नाही. आज पुन्हा एकदा ही चळवळ डोके वर करू पाहत आहे.

मी सैन्य दलात असताना आमचे जास्त वेळ दहशतवाद विरोधी संघर्ष करण्यात गेला. दहशतवाद हा जगात कुठे गेलात तरी लोकप्रक्षेभातून निर्माण होतो. लोकप्रक्षेप कशामुळे निर्माण होतो हे सर्वांना माहीत आहे. ज्यावेळेस सामान्य जनतेवर अन्याय होतो. कुठे जायला वाट दिसत नाही. त्यावेळी दहशतवाद होतो. दहशतवाद नेहमीच राजकीय कारणामुळे होतो. शेवटी पंजाबमध्ये काय झाले. भारतातील सर्वात समृद्ध राज्य असताना आज हे राज्य बरबाद होताना आपल्याला दिसत आहे. गेल्या पाच वर्षांमध्ये पंजाब मधील राजकीय परिस्थिती पूर्ण बदलली. अमरेंद्र सिंग यांच्या नेतृत्वाखाली पंजाबमध्ये काँग्रेसच सरकार स्थापन झाले. पण त्याआधी गेल्या दशकामध्ये, पंजाब बरबाद झाला होता. ड्रग्स सेवन, बेकारी, एके काळचा समृद्ध शेती असणार्‍या पंजाबची जमीन रासायनिक खते आणि कीटकनाशनामुळे उद्ध्वस्त झाली. त्यामुळे पंजाबची कृषी क्रांती आणि कृषी औद्योगिक क्रांती ही अधोगतीकडे धावायला लागली.

हा देश अन्नधान्यामध्ये संपन्न झाला. पंजाबने जबरदस्त कृषी क्षेत्रामध्ये भरारी घेतली, कृषी औद्योगिक क्षेत्रामध्ये प्रचंड उंची गाठली. त्या प्रदेशात ग्रामीण अर्थव्यवस्था इतकी सुधारली की घराघरांमध्ये समृद्धी आली. पण राजकर्त्यांनी पंजाबचा घात केला. मी कुठल्या पक्षावर अंगुली निदर्शन करत नाही. पण अनेक पक्षाच्या सरकारने पंजाबकडे दुर्लक्ष केले. कृषी क्रांतीला योग्य दिशा देऊ शकले नाहीत. सर्व पिकांकडे दुर्लक्ष करून फक्त गहू आणि तांदळाच्या उत्पादनावर पूर्ण ताकद लावण्यात आली. जेणेकरून जमिनीखालच्या पाण्याची पातळी खोलवर जात राहिली. शेतकऱ्यांनी कर्जबाजारी होणे आणि सरता शेवटी व्यसनाधीन होणे. हे परिणाम समोर आले. पाकिस्तान आयएसआयने आणि दहशतवाद्यांनी पंजाबमध्ये इतका ड्रग्स पोहोचवला की पंजाबची युवा पिढी तिच्या सेवनात दंग झाली. २००० ते २०१८ च्या दरम्यान ९००० शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. त्यातील ८८% शेतकरी हे कर्जबाजारी होते. सर्व सरकारच्या दुर्लक्षामुळे. आज ड्रग्सच्या सेवनामध्ये काही कमतरता येण्याचे चिन्ह दिसत नाहीत. उदाहरणार्थ २०२२ मध्ये जवळजवळ ७०० किलो हीरोइन पकडली गेली. ती वाढतच आहे.

या सर्व प्रश्नांच्यापाठी खालीस्तानचा एक अतिशय जुना विषय शिजत राहिला आहे. १९६६ साली पंजाबचे विभाजन झाले. १९६९ साली जगजीत सिंग चव्हाण यांनी खालीस्तानची सुरुवात केली होती. तो इंग्लंडला गेला आणि खालीस्तानचा प्रचार सुरू केला. पुढे जाऊन अकाली दल या राजकीय पक्षाने अनंतपुर साहेब ठराव केला, ज्याच्यात पंजाबसाठी प्रचंड स्वातंत्र मागितले. १९७८ साली शीख पंथामध्ये यादवी युद्ध झाले जेणेकरून भिंड्रनवाल्याची निर्मिती झाली. पंजाब मधील ताकतवर असणारे अकाली दल आणि भिन्न वाले यांनी आनंदपुर साहेब ठरावाच्या मागणीसाठी धर्म युद्ध सुरू केले. लोक म्हणतात की अकालीदलच्या मागणीला शह भिंड्रनवाल्याची निर्मिती इंदिरा गांधींनीच केली. एकंदरीत सर्वच बाजूंनी शीख समुदाय आपल्या मागण्यांसाठी संघर्षात उतरला. भिंड्रनवाले आणि त्यांचे साथीदार हे सुवर्ण मंदिरात घुसले आणि त्याचा ताबा घेतला.

पंजाबमध्ये प्रचंड संघर्ष सुरू झाला. १ जून ते ८ जून १९८४ ला इंदिरा गांधींनी ऑपरेशन ब्लू स्टार सुरू केले. भिंड्रनवाला आणि त्यांच्या टोळीला सुवर्ण मंदिरातून काढण्यासाठी जवळजवळ एक युद्ध झाले. मी त्यावेळेला कमांडो प्रशिक्षक होतो. खालिस्तानच्या आव्हानाला तोंड देण्यासाठी अनेक लोकांना प्रशिक्षण देत होतो. पण या सीमा वरती भागात असा संघर्ष भारताला परवडणारा नव्हता. त्या काळात आणि त्या दशकात पूर्ण भारतच पेटला होता. आसाम मध्ये आणि तेथील सात राज्यांमध्ये बंडच निर्माण झाले होते. ज्या तामिळ वाघांना भारतीय सैन्याने प्रशिक्षण दिले होते ते आपल्या विरोधात गेले. श्रीलंकेच्या युद्धात अनेक सैनिक मारले गेले. खालिस्तानचा संघर्ष, काश्मीरचा दहशतवाद या सर्व कारणामुळे भारतीय सैन्य पूर्ण देशात दहशतवाद विरोधात लढण्यात गुरफटले गेले. असंख्य सैनिक मारले गेले आहेत. पण दहशतवाद सुरूच आहे.

२०१३ ला जेव्हा मी सैन्यातून निवृत्त झालो, त्यावेळी काश्मीर शांत होता. आम्ही हजारो दहशतवाद्यांना आत्मसमर्पण करायला लावले होते. या दहशतवाद्यांच्या माध्यमातून आम्ही ८००० लोकांचे सैन्य उभे केले होते. जे प्राणपणाने दहशतवादा विरोधात लढत होते. ८००० काश्मिरी युवकांना सैन्यात नोकरी मिळाल्यामुळे, काश्मीरमध्ये अमन आणि चैन आली होती. असे काय झाले की पंजाब मध्ये पुन्हा दहशतवाद सुरू होत आहे.

अमृतपाल नामक एक ग्रंथी दुबईहून आला आणि सर्व खडे खालिस्तानचा प्रचार करत फिरला. पोलिसांनी सुरुवातीला त्याला काहीच केले नाही. त्यातच अजनाला पोलीस स्टेशनवर हल्ला झाला आणि खालिस्तानच्या ठिणगीला वाव मिळाला व आज दहशतवाद वाढतच आहे. त्याचे कारण म्हणजे बेकारी, ग्रामीण कृषी क्रांतीचा अंत, माफियाचा सुळसुळाट, ड्रग्स विक्रीसाठी आणि पैसे कमवण्यासाठी खालीस्तानच्या नावाखाली ड्रग्सचा प्रचंड व्यापार वाढतच आहे. एकेकाळी एक नंबर वर असणारा पंजाब आज सतरा अठरा नंबर वर पोचला आहे. २०२२ ला ड्रग्सच्या आरोपाखाली १८२८२ लोकांना पकडण्यात आले. म्हणजे वर्षात ३०% वाढ झाली.

शिखांच्या युद्धाची परंपरा दोन गोष्टीमुळे आहे. पहिली म्हणजे शिखांचा दहावा धर्मगुरू गुरु गोविंद सिंग यांनी मोगलाविरुद्ध संघर्ष केला, त्यात औरंगजेबमुळे तो मारला गेला. दुसऱ्यांदा महाराजा रणजीत सिंगने पंजाब मध्ये खालसा राज १८०१ ते १८३९ पर्यंत स्थापन करून चालवले. त्यामुळे शिखांमध्ये लढाऊ बाणा निर्माण झाला. त्याच लढाऊ परंपरेत डिसेंबर २०१९ मध्ये शिखाने शेतकऱ्यांचे आंदोलन उभे केले आणि सरकारला ते कायदे रद्द करावे लागले. भारतीय सैन्यात सुद्धा १६ टक्के सैनिक हे पंजाब मधून येतात. मुळात शीख धर्म हे बुद्धिस्ट धर्मासारखा आहे. शिख धर्म हा जास्त राजकीय आहे. हिंदू धर्मातील वाईट प्रथा परंपरेच्या विरोधात उभा राहिला आहे. त्यात सामाजिक चळवळीचा परिणाम आहे. अंधश्रद्धा आणि धार्मिक भावना ह्या कमीच आहेत. म्हणून शीख धर्म हा सामाजिक न्याय आणि डाव्या तत्त्वज्ञानाचा संबंधित आहे. ही बाब शेतकऱ्यांच्या लढाईमध्ये सुद्धा दिसून आली. या सर्व इतिहासाचा परिणाम म्हणजे खालीस्तान आहे. १९८४ ला ऑपरेशन ब्लू स्टार मध्ये अनेक दहशतवादी मारले गेले. तिचे प्रतीक म्हणून भिंड्रनवाले आज देखील जिवंत आहेत. काही ठिकाणी दहशतवादा कारवाई सोडल्या. पण अनेक लोक शहीद झाले. अशी भावना पंजाब मध्ये जिवंत आहे. सुवर्ण मंदिराच्या युद्धामध्ये १९८४ साली अनेक सैनिक आणि रिटायर्ड सैनिक हे लढले आणि आपल्यातून गेले. त्यांची कहाणी आज पुन्हा जिवंत केली जात आहे. त्यांना शहीद म्हणून मान्यता येत आहे. माझ्या सैनिकी जीवनामध्ये दहशतवादा विरोधात घनघोर संघर्ष मी पाहिला. आज तामिळनाडूमध्ये सुद्धा तामिळ वाघ संघटित होत आहे. मी १९९१ ला लोकसभेतील माझ्या भाषणात स्पष्ट केलं होतं की ज्या दिवशी तामिळनाडूमध्ये बंड होईल. तो भारताला तोडण्याचा निकराचा संघर्ष होईल. त्या पाठीमागे आपले शत्रू आहेतच. अमेरिकेने भारताला तोडण्याचा नेहमी प्रयत्न केला. त्यासाठी तेव्हा आणि आज देखील पाकिस्तानला पुढे करून प्रचंड दहशतवादी चळवळ भारतात निर्माण करण्याचा प्रयत्न कायम चालू आहे.

दहशतवाद हा एक षड्यंत्राचा भाग आहे. जो आज देखील खेळला जात आहे. जोपर्यंत भारत या षड्यंत्राला मोडून काढणार नाही, तोपर्यंत अमृतपाल सारखे लोक निर्माण होणार आणि जागोजागी संघर्ष होत राहणार. श्रीमंत अति श्रीमंत होत जातात. गरीब हा गरीब होत जातो. दहशतवादाचे हे खरे कारण आहे. जोपर्यंत सर्वांना समान न्याय आणि हक्क मिळणार नाहीत, तोपर्यंत पंजाबसारखे राज्य पेटतच राहणार.

लेखक : ब्रिगेडीयर सुधीर सावंत

वेबसाईट : www.sudhirsawant.com

मोबा. न. ९९८७७१४९२९

प्रतिक्रिया व्यक्त करा