You are currently viewing G-20 शिखर परिषदे अंतर्गत चीवला बीच, मालवण येथे स्वच्छता मोहिम संपन्न

G-20 शिखर परिषदे अंतर्गत चीवला बीच, मालवण येथे स्वच्छता मोहिम संपन्न

मालवण :

 

G-20 शिखर परिषदेचे अध्यक्षपद भारताला मिळाल्यानंतर देशभरात मोठ्या उत्साहात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे. या कार्यक्रमांतर्गत विविध क्षेत्रातील प्रगतीवर विशेष भर दिला जात आहे. याच कार्यक्रमाचा भाग म्हणून समुद्र किनारे, सागरी जैवविविधता यांचे जतन व संवर्धन करण्याबाबत जागतिक पातळीवर लक्षवेधण्याच्या उद्देशाने जगभरातील काही निवडक समुद्र किनाऱ्यांवर रविवार दिनांक २१ मे २०२३ रोजी सकाळी ७ ते ९ यावेळेत स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आलेले होते. G-20 शिखर परिषदे अंतर्गत राबविल्या जाणाऱ्या या स्वच्छता मोहिमेत भारतातील एकूण ३७ किनाऱ्यांवर एकाच वेळी स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमांतर्गत मालवण येथील चीवला बीच येथे स्वच्छता मोहीम संपन्न झाली.

केंद्रशासनाच्या निर्देशानुसार मालवण नगर परिषदेच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. स्वच्छता मोहिमेस सुरुवात होण्यापूर्वी निसर्गाबरोबरच मानवी आरोग्याचा संदेश देण्यासाठी मालवण येथील योगज्योती या योगा क्लासेसच्या माध्यमातून अगदी मराठमोळ्या नऊवारी साडीत महिलांच्या योगाचे आयोजन करण्यात आले होते; कार्यक्रमाच्या ठिकाणी नागीकांना स्वच्छतेविषयी जागृत करणेसाठी सेल्फी केंद्र, सिग्नेचर फलक इत्यादीची उभारणी करण्यात आली होती, स्वच्छता मोहिमेची सुरुवात समुद्राच्या स्वच्छतेची व सागरी जैवविविधता रक्षणाची शपथ घेवून करण्यात आली व किनारा स्वच्छतेस प्रारंभ करण्यात आला.

हा कार्यक्रमास मा. जिल्हाधिकारी के मंजुलक्ष्मी यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला. तसेच या कार्यक्रमास मालवण नगरपरिषदेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी श्री संतोष जिरगे, तहसीलदार वर्षा झाल्टे, पोलीस निरीक्षक श्री विजय यादव यांच्यासह माजी नगर सेवक श्री दीपक पाटकर, माजी नगर सेवक श्री मंदार केणी, सौ पूजा सरकारे, सौ ममता वराडकर, सौ आकांक्षा शिरपूटे, आदी उपस्थित होत्या. स्वच्छता मोहिमेत सहभागी नागरिकांना सन्मानपत्राचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. तसेच प्लास्टिक ऐवजी पार्यावरण पूरक साधनांच्या वापरास प्रोत्साहन म्हणून नगर पालिकेतर्फे कापडी पिशवीचे वाटप करण्यात आले.

कचऱ्याचा विशेषतः प्लास्टिक कचऱ्याचा समुद्र आणि महासागरावर व येथील जैवविविधतेवर होणाऱ्या परिणामांकडे जागतिक पातळीवर लक्ष वेधणे तसेच यासंदर्भात मोठ्या प्रमाणात जनजागृती करून जास्तीत जास्त नागरिकांच्या सहभागाने समुद्र किनारे स्वच्छ ठेवण्यासाठी व येथील परीसंस्थेचे जतन करण्यासाठी G-20 देशांमध्ये सामुहिक कृती करणे हे या कार्यक्रमाचे मूळ उद्दिष्ट होते. या आंतरराष्ट्रीय मोहीमेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण चिवला बिचची निवड करुन मालवणला हा बहूमान दिल्याबद्दल मा. जिल्हाधिकारी आणि मुख्याधिकारी यांनी केंद्र शासनाचे मालवणवासियांतर्फे आभार मानले. केंद्रीय गृहममंत्रालयाच्या प्रतिनिधी मा. अरुणिमा श्री या कार्यक्रमास उपस्थित होत्या त्यांनी मालवणच्या निसर्ग सौंदर्याचे आणि विशेषतः चिवला बिच किनाऱ्याचे आणि स्वच्छता मोहीमेचे उत्कृष्टपणे आयोजन करणाऱ्या पालिका प्रशासनाचे कौतुक केले.

स्वच्छता मोहिमेत शहरातील विविध संस्था, नागरिक, व्यवसायीक, व्यापारी, शासकीय कर्मचारी, पत्रकार, अशा विविध क्षेत्रातील नागरिक सहभागी झाले होते. सर्व सहभागी अधिकारी व नागरिकांचे पालिकेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी श्री. संतोष जिरगे यांनी आभार मानले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

12 + one =