You are currently viewing राज्य सरकारच्या बेजबाबदार कारभारामुळे एसटी कर्मचाऱ्यांवर आत्महत्येची वेळ !

राज्य सरकारच्या बेजबाबदार कारभारामुळे एसटी कर्मचाऱ्यांवर आत्महत्येची वेळ !

भाजपा एसटी कर्मचाऱ्यांच्या पाठीशी राहात जिल्ह्यात उग्र आंदोलन छेडणार

भाजपा सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष राजन तेली यांची माहिती

राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे राज्यातील अनेक क्षेत्रांमधील कर्मचाऱ्यांवर आत्महत्या करण्याची वेळ आली आहे. यामध्ये गेल्या काही महिन्यांपासून एसटी कर्मचाऱ्यांचे वेतन दिले गेले नसल्याने अनेक ठिकाणी एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्याच्या धक्कादायक घटना घडत आहेत. कोरोनाच्या काळातदेखील आपले कर्तव्य प्रामाणिकपणे व योग्यरित्या पार पाडत राज्यातील अनेक एसटी कर्मचाऱ्यांनी काम सुरू ठेवले होते. मात्र लॉकडाऊनमध्ये आर्थिक परिस्थिती बिकट झाल्याने आणि आपल्या कुटुंबाला पोसण्यासाठी काहीच मार्ग न उरल्याने त्यांनी आत्महत्येचा पर्याय निवडला. या सर्व घटनांसाठी केवळ राज्य सरकारच जबाबदार असून त्यांच्यामुळेच राज्यावर ही आजची परिस्थिती ओढवली आहे, असा आरोप भाजपाचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष श्री राजन तेली यांनी केला आहे.

जळगाव जिल्ह्यातील मनोज चौधरी यांनी ज्या कारणामुळे आत्महत्या केल्याची संतापजनक घटना घडली, त्याच कारणासाठी रत्नागिरी डेपोचे चालक पांडुरंग गडदे यांनीही आज आत्महत्या केली आहे. हे लोण पसरू नये यासाठी राज्यसरकारला वेळीच वठणीवर आणण्याची गरज आहे. मनोज चौधरी यांनी लिहिलेल्या चिठ्ठीत या परिस्थितीसाठी ठाकरे सरकार जबाबदार आहे, असा स्पष्ट उल्लेख केला आहे. ज्या राज्यातील जनतेने तुम्हाला निवडून दिले आहे, त्याच जनतेच्या जीवावर हे निर्दयी सरकार उठले आहे. राज्यातील एकही प्रश्न मार्गी लागला नाही. शेतकऱ्यांसाठीही केवळ आश्वासन दिलं, मात्र काडीभरचीही मदत बळीराजाला केली नाही. बेस्टवर ताण येत असल्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांना मुंबईत पाठवलं. मात्र तिथेही त्यांना सोयीसुविधा पुरवल्या गेल्या नाहीत. त्यांची भोजन व्यवस्था नाही आणि त्यांना थेट कोव्हीड सेंटर मध्ये राहण्यासाठी पाठवले गेले. या क्रूर वागणुकीमुळे व बेजबाबदारपणामुळे शेकडो कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली. नियोजनशून्य मंडळींच्या हातात राज्य गेल्यामुळे आज हे दुर्दैवी दिवस महाराष्ट्र पाहत आहे.

थकीत वेतनामुळे हजारो एसटी कर्मचारी आणि त्यांचे कुटुंब अडचणीत आले आहेत. कुटुंबाला जगवण्यासाठी त्यांनी कुठे जायचे हा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला आहे. राज्यभरातील जनता त्रस्त झाली आहे. ठाकरे सरकार कोरोनावर नियंत्रण मिळवू शकले नाही, शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवू शकले नाही, वाहतूक व्यवस्थेची कोणतीही पूर्वतयारी नाही, लोकल रुळावर नाही, शिक्षणाचा खेळखंडोबा करून ठेवलाय, कोणासोबतही योग्य समन्वय नाही, देवळे उघडली गेली नाहीत, मंत्री महोदय घराबाहेर पडत नाहीत, त्यात आता एसटी कर्मचाऱ्यांचे वेतन वेळेवर नाही, त्यामुळे एसटी कर्मचारी आत्महत्या करत आहेत. आंदोलनाशिवाय आता या सरकारला ताळ्यावर आणण्याचा पर्याय उरला नाही.महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य जनतेच्या घरात ऐन दिवाळीत अंधार करणाऱ्या या अपयशी ठाकरे सरकारविरोधात ऐन दिवाळीत आंदोलनाचा जाळ काढण्याची वेळ जनतेवर आली असून भारतीय जनता पार्टी भक्कमपणे या सर्व अन्यायग्रस्त जनतेच्या पाठीशी रहात रस्त्यावर उतरणार असल्याची माहिती श्री राजन तेली यांनी दिली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

three + 13 =