वेंगुर्ला
दक्षिण कोकणातील प्रसिद्ध व जागृत देवस्थान वेंगुर्ला- तुळस येथील ‘नराचा नारायण’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्री देव जैतीर उत्सवाला प्रारंभ झाला आहे. उत्सवाच्या आज पहिल्या दिवशी हजारो भाविकांनी श्री देव जैतीराचे दर्शन घेतले. एकूणच आज तुळस गावातील धार्मिक वातावरण पाहून या गावात भाविकांच्या भक्तीचा मेळा भरल्याचे चित्र दिसत होते. उत्सवाच्या पार्श्वभूमीवर गेले काही दिवस मंदिराची रंगरंगोटी सुरु होती. त्यानंतर लांबलांबच्या दुकानदारांनी आधीच दोन ते चार दिवस दुकानांसाठीची आपली जागा निश्चित केली होती. त्यामुळे उत्सवापूर्वीच मंदिर परिसरात जत्रेचे स्वरुप निर्माण झाले होते.
दरम्यान आज उत्सवाच्या पहिल्याच दिवशी सकाळपासून भाविकांनी दर्शन घेण्यासाठी गर्दी करीत नारळ, केळी, तुरे आदी वस्तू देवाला भक्तिभावाने अर्पण केल्या. दुपारनंतर मुख्य कार्यक्रमाला तर भाविकांनी प्रचंड गर्दी करीत उत्सवाचा आनंद लुटला. मंदिर परिसरात विविध खाद्य पदार्थ, जीवनोपयोगी वस्तू, हौशेच्या वस्तूसह शेतीसाठी लागणारी अवजारेही विक्रीस आली होती. दर्शन घेतल्यानंतर भाविकांनी बाजारपेठेत खरेदीही केली. या उत्सवात मुंबई, गोवा, कर्नाटक आदींसह राज्यभरातून भाविक तसेच विविध राजकीय पक्षाचे नेते पदाधिकारी यांनी हजेरी लावून देवाचे दर्शन घेतले.