You are currently viewing लखनौचा हैदराबादवर विजय; प्लेऑफच्या आशा अबाधित

लखनौचा हैदराबादवर विजय; प्लेऑफच्या आशा अबाधित

*लखनौचा हैदराबादवर विजय; प्लेऑफच्या आशा अबाधित*

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) :

आयपीएल २०२३ च्या ५८ व्या सामन्यात लखनौ सुपर जायंट्सने सनरायझर्स हैदराबादचा सात गडी राखून पराभव केला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना हैदराबादने २० षटकांत ६ गडी गमावून १८२ धावा केल्या. हेनरिक क्लासेनने २९ चेंडूत ४७ धावा केल्या आणि अब्दुल समदने २५ चेंडूत नाबाद ३७ धावा केल्या. प्रत्युत्तरात लखनौने १९.२ षटकांत तीन गडी गमावून लक्ष्य गाठले. युवा प्रेरक मांकडने ४५ चेंडूत ६४ धावांची नाबाद खेळी केली. त्याचवेळी निकोलस पूरनने १३ चेंडूत ४४ धावा केल्या. मार्कस स्टॉइनिसने २५ चेंडूत ४० धावांची खेळी केली.

या विजयासह लखनौचा संघ १२ सामन्यांत सहा विजय आणि पाच पराभवांसह चौथ्या स्थानावर पोहोचला आहे. त्याला १३ गुण आहेत. चेन्नईविरुद्धचा सामना पावसाने वाहून गेला. त्याचबरोबर सनरायझर्स हैदराबादचे ११ सामन्यांत आठ गुण आहेत. या संघासाठी प्लेऑफचा मार्ग अत्यंत कठीण झाला आहे. त्यांना इतर संघांच्या निकालावर अवलंबून राहावे लागेल. हैदराबादने ११ पैकी चार सामने जिंकले आहेत, तर ७ सामने गमावले आहेत. लखनौचे पुढील दोन सामने मुंबई विरुद्ध १६ मे रोजी एकाना येथे आणि २० मे रोजी कोलकाता विरुद्ध ईडन गार्डन्स येथे होणार आहेत. तर हैदराबादचा सामना १५ मे रोजी गुजरात टायटन्सशी होणार आहे.

एकवेळ हैदराबादने सामन्यावर आपली पकड मजबूत केली होती. धावांचा पाठलाग करताना लखनौची धावसंख्या १५ षटकांत २ बाद ११४ अशी होती. मार्कस स्टॉइनिस आणि प्रेरक मांकड खेळपट्टीवर होते. लखनौला ३० चेंडूत ६९ धावांची गरज होती. १६व्या षटकात अभिषेक शर्मा गोलंदाजी करायला आला आणि इथून सामना फिरला. या षटकात अभिषेकला पाच षटकार मारले आणि वाईडही दिला, म्हणजे त्याने एकूण ३१ धावा दिल्या. ११४ नंतर लखनौची धावसंख्या २६ षटकांत ३ बाद १४५ अशी होती. यानंतर लखनौला २४ चेंडूत विजयासाठी ३८ धावांची गरज होती, हे टी२० मध्ये सोपे समीकरण आहे. अभिषेकच्या षटकात लखनौने स्टॉइनिसची विकेट नक्कीच गमावली, पण पूरणने मैदानात येताच लागोपाठ तीन षटकार ठोकले. लखनौने चार चेंडू शिल्लक असताना सामना जिंकला.

प्रथम फलंदाजी करताना हैदराबादची सुरुवात खराब झाली. अभिषेक शर्मा काही विशेष करू शकला नाही आणि केवळ सात धावा करून तंबूमध्ये परतला. यानंतर अनमोलप्रीत सिंग आणि राहुल त्रिपाठी यांनी दुसऱ्या विकेटसाठी ३७ धावांची भागीदारी केली. त्रिपाठी १३ चेंडूंत चार चौकारांच्या मदतीने २० धावा करून बाद झाला. यानंतर अनमोलप्रीतने कर्णधार एडन मार्करामसोबत तिसऱ्या विकेटसाठी २६ धावांची भागीदारी केली. अनमोलप्रीत २७ चेंडूंत सात चौकारांच्या मदतीने ३६ धावा करून तंबूमध्ये परतला. कृणाल पांड्याने १३व्या षटकात लागोपाठ दोन चेंडूंवर एडन मार्कराम आणि ग्लेन फिलिप्सला बाद केले. मार्कराम २० चेंडूत २ चौकार आणि १ षटकाराच्या मदतीने २८ धावा करून बाद झाला, तर फिलिप्सला खातेही उघडता आले नाही. यानंतर हेनरिक क्लासेनने अब्दुल समदसोबत सहाव्या विकेटसाठी ५८ धावांची भागीदारी केली. मोठा फटका मारण्याच्या नादात क्लासेनने आपली विकेट गमावली. त्याचे अर्धशतक हुकले आणि तो २९ चेंडूंत तीन चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने ४७ धावा करून बाद झाला. अब्दुल समदने २५ चेंडूत एक चौकार आणि चार षटकारांच्या मदतीने नाबाद ३७ धावा केल्या. भुवनेश्वर कुमार दोन धावा करून नाबाद राहिला. लखनौकडून कर्णधार कृणाल पांड्याने सर्वाधिक दोन विकेट घेतल्या. तर युधवीर सिंग चरक, आवेश खान, यश ठाकूर आणि अमित मिश्राला प्रत्येकी एक विकेट मिळाली.

१८३ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना लखनौच्या संघाला काइल मेयर्सच्या रूपाने पहिला धक्का बसला. १४ चेंडूत दोन धावा करून मेयर्स बाद झाला. यानंतर क्विंटन डिकॉक आणि प्रेरक मांकड यांनी दुसऱ्या विकेटसाठी ४२ धावांची भागीदारी केली. डिकॉक १९ चेंडूंत तीन चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने २९ धावा काढून बाद झाला. यानंतर प्रेरकने मार्कस स्टॉइनिससोबत तिसऱ्या विकेटसाठी ४३ चेंडूत ७३ धावांची भागीदारी केली. स्टॉइनिस २५ चेंडूंत दोन चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने ४० धावा करून बाद झाला. दरम्यान, प्रेरकने आयपीएल कारकिर्दीतील पहिले अर्धशतक झळकावले. त्याने पूरनसोबत चौथ्या विकेटसाठी नाबाद ५८ धावांची भागीदारी केली. प्रेरकने ४५ चेंडूंत सात चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने नाबाद ६४ धावा केल्या तर पूरणने १३ चेंडूंत तीन चौकार आणि चार षटकारांच्या मदतीने 44 धावा केल्या. हैदराबादकडून ग्लेन फिलिप्स, मयंक मार्कंडे आणि अभिषेक शर्मा यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.

प्रेरक मांकडला सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

1 × three =