परिवहन मंत्री अनिल परब
मुंबईः
एसटी कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वीच बोनस देणार असल्याची मोठी घोषणा परिवहन मंत्री अनिल परब यांनी केली आहे. एसटी कर्मचाऱ्यांना दोन महिन्यांचा पगारही देण्यात येणार आहे. तीन महिन्यांपैकी दोन महिन्यांचा पगार देण्यात येणार असून, तासाभरात या महिन्याचा पगार जमा होणार असल्याचीही माहितीही अनिल परबांनी दिली आहे. पत्रकार परिषद घेऊन परिवहन मंत्री अनिल परब यांनी ही माहिती दिली आहे.
दिवाळीपूर्वी अजून एक महिन्याचे वेतन असे एकूण थकीत दोन महिन्यांचे वेतन दिलं जाणार आहे. हे तात्पुरते संकट आहे, एसटी कर्मचाऱ्यांनी टोकाचं पाऊल उचलू नका, ही नम्र विनंती, असं आवाहनही अनिल परब यांनी एसटी कर्मचाऱ्यांकडे केली आहे.
दोन महिन्यांचा वेतन दिलं जाणार आहे. ज्या दोन कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केली आहे, त्यांच्याबाबत अधिकाऱ्यांशी बोलणं चालू आहे. आजच एका तासात एक पगार व सणाची अग्रिम रक्कम देण्यात येईल, अशी माहितीसुद्धा अनिल परब यांनी दिली आहे.
प्रवीण दरेकर यांचा अभ्यास कमी आहे. शासनाकडून एका मोठ्या रकमेची गरज आहे, ही रक्कम जर भेटली तर बराच दिलासा भेटेल. आम्ही राज्य शासनाला प्रस्ताव दिला आहे की कर्मचाऱ्यांचे पगार द्यावे, असंही अनिल परब यांनी सांगितलं आहे. दोन महिन्यांचा पगार आणि सानुग्रह अनुदान आजच देणार आहे. कृपया आत्महत्या करू नका, तुमच्या आत्महत्येनंतर कुटुंबावर ओढावणारं संकट फार मोठं असेल. सध्याचं संकट तात्पुरतं आहे. यावर लवकरच मार्ग काढू, पण आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलू नका, आत्महत्या केलेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना दिलासा देण्याबाबत लवकरच निर्णय घेऊ, असं आश्वासनही अनिल परब यांनी दिलं आहे.
प्रवीण दरेकर यांना कायद्याची माहिती आहे का?, कुठल्या प्रकरणात 302,304, 306 कलम लागतात, याचा अभ्यास दरेकरांनी करावा, असा टोलाही अनिल परब यांनी प्रवीण दरेकरांना लगावला आहे. एसटीचे जे पैसे येत आहेत, ते फक्त पगार आणि डिझेलमध्येच जात आहेत. त्यामुळे उत्पन्नवाढीचा स्त्रोत थांबला आहे. हा सर्व बॅलन्स साधण्यासाठी सरकारकडून एका मोठ्या रकमेची गरज असून, मुख्यमंत्री, ऊर्जामंत्र्यांसोबत चर्चा सुरू असल्याची माहिती अनिल परब यांनी दिली आहे.
दुसरीकडे दिवाळीपर्यंत कर्मचाऱ्यांचे थकीत वेतन अदा करा, अशी मागणी एसटी कर्मचाऱ्याकडून केली जात आहे. तसेच प्रलंबित वेतनासाठी आज 9 नोव्हेंबरला प्रत्येक एसटी कर्मचारी त्यांच्या कुटुंबासोबत स्वतःच्या घराबाहेर आक्रोश आंदोलन करत आहे. दरम्यान, ग्रामीण भागाची जीवन वाहिनी असलेल्या एसटी सेवेतील कर्मचारी दिवाळीच्या तोंडावर आंदोलनाचे अस्त्र उपसण्याच्या तयारीत आहेत. कोरोनाच्या संकटामुळे गेल्या काही महिन्यांपासून एसटीच्या कर्मचाऱ्यांना वेतन मिळालेले नाही. त्यासाठी राज्यातील एसटी कामगार पुन्हा एकदा आक्रोश करणार आहेत. प्रलंबित वेतनासाठी 9 नोव्हेंबरला प्रत्येक एसटी कर्मचारी त्यांच्या कुटुंबासोबत स्वतःच्या घराबाहेर आक्रोश आंदोलन करतील. दिवाळीपर्यंत कर्मचाऱ्यांचे थकीत वेतन अदा करावे. तसेच एसटी महामंडळाला तातडीने दोन हजार कोटींची मदत करावी, अशी मागणी कर्मचारी संघटनांकडून करण्यात आली आहे.