लॉकडाऊन मुळे राज्याची अर्थव्यवस्था खिळखिळी…

लॉकडाऊन मुळे राज्याची अर्थव्यवस्था खिळखिळी…

नव्या अर्थसंकल्पानंतर परिस्थिती येईल जाग्यावर

जलसंपदा मंत्री ना. जयंत पाटील

सावंतवाडी
आघाडी सरकारला कोरोनाचा मोठा फटका बसला असून सततच्या लॉकडाऊन मुळे राज्याची अर्थव्यवस्था खिळखिळी झाली आहे. निधीची कमतरता असल्याने नाबार्डकडून काढलेल्या कर्जा व्यतिरिक्त मोठ्या प्रकल्पांवर कोणताही निधी खर्च करू शकत नाही. त्यामुळे जलसंपदा बरोबरच सर्वच नवे-जुने प्रकल्प ठप्प आहेत. सद्यस्थितीत शासनाच्या कर्मचाऱ्यांचे पगार कर्ज काढून द्यावे लागत आहेत. जानेवारी फेब्रुवारी पर्यंत ही परिस्थिती जाग्यावर येईल व नवीन अर्थसंकल्पानंतरच सक्षमपणे काम करता येईल, अशी अपेक्षा राज्याचे जलसंपदा मंत्री ना. जयंत पाटील यांनी व्यक्त केली.

सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर असलेले जलसंपदा मंत्री ना. जयंत पाटील यांनी माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले यांच्या सावंतवाडीतील घरी भेट दिली. यावेळी आयोजित अशी पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अमित सामंत, माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले, महिला जिल्हाध्यक्षा रेवती राणे, नगरसेवक अबीद नाईक, युवक जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल सुद्रिक, काका कुडाळकर, पुंडलिक दळवी, चित्रा देसाई आदी उपस्थित होते.

सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी पक्ष भविष्यात पूर्वीप्रमाणेच अधिक भक्कमपणे उभा राहण्यासाठी वेगळी रचना करून बुथ कमिट्या सक्षम करण्याचा आमचा प्रयत्न आहे. शिवाय जिल्ह्याच्या विकासकामात राष्ट्रवादीचे कार्यकर्ते अग्रेसर राहणार आहेत अशी भूमिका घेण्यात आली असून याला जिल्ह्यातील सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांनी दुजोरा दिला आहे. राज्यात असलेली आघाडी जिल्ह्याच्या आणि स्थानिक पातळीवरील निवडणुकांमध्ये व्हावी अशी अपेक्षा असून त्यासाठी आमचे प्रयत्न सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.

जिल्ह्यातील ज्या तालुक्यांमध्ये तालुका अध्यक्ष पद नाही आहे अशा जागेसाठी इच्छुकांच्या मुलाखतीही आज घेण्यात आल्या. त्यामध्ये सावंतवाडी तालुका हा आम्हाला महत्त्वाचा असल्याने लवकरच या ठिकाणी तालुका अध्यक्ष देण्यात येणार आहे. माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले यांच्यासमवेत त्याकाळी काम केलेले कार्यकर्तेही पक्षामध्ये पुन्हा काम करण्यासाठी तयार झाले असून तशी इच्छाही त्यांनी आज आपल्याकडे व्यक्त केली मात्र जे कार्यकर्ते पक्षात पुन्हा सक्रिय होणार आहे त्यांची योग्य पारख करूनच पुन्हा पक्षात सामावून घेतले जाणार आहे. माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले यांनाही लवकरच उचित सन्मान दिला जाईल असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

राज्यात सत्तेत सहभागी असलेल्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना जिल्ह्याच्या विकास कामांमध्ये सहभागी करून घेतले जात नाही अशी नाराजी आज आपल्याकडे पदाधिकाऱ्यांकडून व्यक्त करण्यात आली. त्यामुळे जिल्ह्याच्या विकास कामांमध्ये यापुढे राष्ट्रवादीच्या प्रत्येक पदाधिकारी व कार्यकर्त्यांना समावून घेण्यासंदर्भात आपण जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्याशी चर्चा करणार आहे, असेही त्यांनी सांगितले.

तसेच जिल्ह्यातील रखडलेले धरण व सिंचन प्रकल्प तसेच पुनर्वसनाचे प्रश्न या संदर्भात आपल्याकडे निवेदनाद्वारे अनेक तक्रारी आल्या आहेत. यासंदर्भात आपण अधिकाऱ्यांकडून योग्य ती माहिती घेणार आहे. त्यामुळे दिवाळीनंतर जिल्ह्यातील रखडलेल्या सर्व प्रकल्पांसंदर्भात आणि इतर समस्यावर योग्य मार्ग काढला जाणार आहे, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.

प्रतिक्रिया व्यक्त करा