You are currently viewing अतिवृष्टी काळात काळजी घेण्यासाठी प्रशासन सज्ज …

अतिवृष्टी काळात काळजी घेण्यासाठी प्रशासन सज्ज …

कणकवली

तालुक्यामध्ये अतिवृष्टी काळात घडणाऱ्या आपत्ती बाबत प्रशासकीय अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी मुख्यालयातच राहून कायमस्वरूपी सज्ज राहावे. बाधित नागरिकांना तात्काळ मदतीसाठी तालुका नियंत्रण कक्षाशी प्रथम संपर्क साधावा अशा सूचना प्रांताधिकारी जगदीश कातकर यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.येथील तहसील कार्यालयात प्रांताधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली तालुका आपत्ती व्यवस्थापन समितीची बैठक सोमवारी झाली.

यावेळी तहसीलदार रमेश पवार, नगरपंचायत मुख्याधिकारी अवधूत तावडे, नायब तहसीलदार शिवाजी राठोड, पोलिस निरीक्षक अनिल जाधव आदी उपस्थित होते. कणकवली तालुक्यामध्ये खारेपाटण परिसर हा सातत्याने अतिवृष्टी काळामध्ये पाण्याखाली जात असतो. तसेच इतरही ठिकाणी अचानक काही घटना घडत असतात. विशेष म्हणजे कोकण आणि कोल्हापूरला जोडणाऱ्या घाटामध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाने दरडी कोसळणार नाहीत. याबाबतच्या उपाययोजना कराव्या, अशा सूचना बैठकीत देण्यात आल्या. महावितरण कंपनीने धोकादायक ठिकाणी आतापासूनच सुरक्षा व्यवस्था करावी. रेल्वेच्या अधिकाऱ्यांनीही उपाययोजना कराव्यात. रेल्वे मार्गावर दर्डी कोसळण्याच्या घटना घडली तर तात्काळ नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा, असे आवाहनही करण्यात आले. नगरपंचायत क्षेत्रातील धोकादायक इमारती निवडून, त्यातील नागरिकांचे स्थलांतर करावे. पंचायत समितीतर्फे शाळा इमारतीमध्ये विशेष लक्ष घालून मुलांना धोका पोहोचणार नाही, याची काळजी घ्यावी. धोकादायक शाळांच्या इमारतीच्या याद्या तयार करून उपाययोजना करावी. तालुका नियंत्रण कक्षासाठी ९४२२७४६९०६ आणि ०२३६७२३२०२५ हे संपर्क क्रमांक दिले आहेत.

आपत्ती काळात ज्या मालमत्तांचे, शेती- बागायतींचे नुकसान होणार आहे. त्यांचे पंचनामे ॲपद्वारे केले जाणार आहेत. त्यामुळे तात्काळ पंचनामे कृषी किंवा महसूल विभागाकडून केले जातील, अशी सूचनाही प्रांताधिकाऱ्यांनी दिली.

प्रतिक्रिया व्यक्त करा