You are currently viewing कोल्हापूर येथे देशातील पहिल्या ‘हॅम रेडिओ’ आधारित पूरप्रवण गावांसाठी बिनतारी संदेश यंत्रणेचे उद्घाटन

कोल्हापूर येथे देशातील पहिल्या ‘हॅम रेडिओ’ आधारित पूरप्रवण गावांसाठी बिनतारी संदेश यंत्रणेचे उद्घाटन

कोल्हापूर :

 

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण येथे देशातील पहिल्या ‘हॅम रेडिओ’ आधारित पूरप्रवण गावांसाठी असलेल्या बिनतारी संदेश यंत्रणेचे १ मे या दिवशी कोल्हापूर येथे पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. हा प्रकल्प सार्वजनिक आणि खासगी क्षेत्र भागीदारीतून उभारण्यात आला आहे. या प्रसंगी जिल्हाधिकारी राहुल रेखावार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण अधिकारी प्रसाद संकपाळ, ‘हॅम रेडिओ’चे मुख्य प्रशिक्षक आणि तज्ञ नितीन ऐनापुरे, मालोजीराजे, पुणे येथील ‘इन्टिट्यूट ऑफ इनफॉरमेशन टेक्नोलॉजी’चे प्राचार्य डॉ. प्रदीप माने, तसेच अन्य उपस्थित होते.

या संदर्भात माहिती देतांना जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण अधिकारी प्रसाद संकपाळ म्हणाले, ‘‘आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत विशेषकरून पूरकाळात उपयोगी पडावे, यासाठी ही ‘हॅम रेडिओ’ यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. देशातील कोणतेही राज्य, शहर अथवा व्यक्ती या यंत्रणेद्वारे जोडता येतात. सध्या जिल्हाधिकारी कार्यालय, आंबेवाडी, चिखली येथील केंद्र या यंत्रणेद्वारे जोडली असून भविष्यात जिल्ह्यातील १२ तालुके जोडण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. ‘आपदा सखी’च्या माध्यमातून आम्ही १०० हून अधिक युवतींना आपत्ती प्रशिक्षण दिले असून त्या पूर, वादळ, भूकंप, अपघात अशा कोणत्याही आपत्तीत काम करू शकतात. या प्रकल्पाच्या अंतर्गत पहिल्यांदाच तृतीयपंथी कार्यकर्त्यांनाही प्रशिक्षण देण्यात येत आहे.’’या प्रकल्पाच्या संदर्भात अधिक माहिती देतांना ‘हॅम रेडिओ’चे मुख्य प्रशिक्षक आणि तज्ञ नितीन ऐनापुरे म्हणाले की,

१. भूकंप, पूर, वादळ अशा अनेक आपत्तींमध्ये आपल्याकडे असलेली भ्रमणभाष, दूरभाष, तसेच अन्य सर्व संपर्क यंत्रणा चालणे बंद होते. अशा वेळी आपल्याला कुणाशीही संपर्क साधण्यासाठी ‘हॅम’ यंत्रणा हा अत्यंत चांगला आणि तुलनेत सुलभ पर्याय आहे.

२. ही यंत्रणा खासगी स्वरूपाची असून जगातील काही हौशी लोकांनी एकत्र येऊन चालू केली आहे. ‘हॅम’ यंत्रणा ३ मेगाहर्ट्स पासून ते १० गीगा हर्ट्स इतक्या मोठ्या बँडवीड्थवर काम करते. इतक्या मोठ्या ‘स्पेट्रम’वर काम करेल, अशी कोणतीही यंत्रणा सध्या कार्यरत नाही. ‘हॅम’ची क्षमता इतकी मोठी आहे की, ती उपग्रह व्यवस्थित काम करतो कि नाही ते सांगू शकते.

३. ही यंत्रणा १२ वर्षे वयाच्या पुढे कुणीही वापरू शकतो. ही यंत्रणा वापरणार्‍यांना किमान इंग्रजी यावे, अशी अपेक्षा असते आणि साधारणत: १० दिवसांचा ‘कोर्स’ केल्यावर केंद्र सरकारची परीक्षा द्यावी लागते. यानंतर आपण ही यंत्रणा वापरू शकतो.

४. मी स्वत: फयान वादळ, कोल्हापूरमधील महापूर, असंख्य रस्ते अपघात, विशाळगड येथील वर्ष २००८ मध्ये झालेला अपघात, जंगल यांसह अनेक ठिकाणी ही यंत्रणा वापरली आहे. कोल्हापूर जिल्ह्यात १० ‘हॅम ऑपरेटर’ असून आमचा एक ‘क्लब’ आहे. सार्वजनिक आणि खासगी क्षेत्र भागीदारीतून उभारण्यात आलेला भारतातील हा पहिलाच प्रकल्प आहे. जपानसारख्या देशात ३ लाख ‘हॅम’ आहेत, अमेरिकेत ७ लाख, तर भारतात केवळ ४ सहस्रांहून अधिक ‘हॅम’ नाहीत. भारतासारख्या प्रचंड मोठी लोकसंख्या असलेल्या देशात ‘हॅम’ वापरणार्‍यांची संख्या वाढणे अत्यावश्यक आहे. ही संख्या वाढल्यास संभाव्य आपत्तीच्या प्रसंगी आपण ‘हॅम’ यंत्रणेचा उपयोग करून लोकांचे प्राण वाचवू शकतो.

प्रतिक्रिया व्यक्त करा

9 − 6 =