खूनाचे नेमके कारण तपासण्याचे पोलिसांसमोर आव्हान
सावंतवाडी
सावंतवाडी तालुक्यातील ओवळीये गावचे माजी उपसरपंच लवू रामा सावंत यांच्या खूनप्रकरणी त्यांचा सख्खा भाऊ अजित सावंत यांना अटक करण्यात आली असली तरीही त्याने अद्यापी खुनाची कबुली दिली नसल्याने दुसऱ्या बाजूनेही पोलिसांचा तपास सुरू आहे. सावंत कुटुंबात कोणतेही वाद नव्हते तर मग खून नेमका का करण्यात आला तसेच यात आणखी कोणाचा सहभाग आहे का त्या दृष्टीने पोलीस तपास करीत आहेत. या पार्श्वभूमीवर बुधवारी या खून प्रकरणी पोलिसांनी अन्य चौघांची चौकशी केली. खून प्रकरणी भाऊ अजित सावंत याला अटक केली असली तरीही खूनाचे नेमके कारण शोधून काढण्याचे आव्हान पोलिसांसमोर असून त्या दृष्टीने पोलीस तपास करीत आहेत.
आम्ही सर्व भाऊ एकत्र गुण्यागोविंदाने राहत होतो. आमच्यात कसलाही वाद किंवा भांडण नाही. त्यामुळे पोलीसांनी अटक केलेला संशयित अजित भावाचा खून करणे शक्यच नाही. त्याला नाहक गोवेले जात आहे. शेतमांगरासाठी तोडलेल्या झाडांमूळे काही लोकांशी झालेल्या वादातूनच ही घटना घडली असावी, असा संशय मृत लवू सावंत यांचा भाऊ अंकुश सावंत यांनी व्यक्त केला आहे.