You are currently viewing वेरली प्राथमिक शाळेचा हिरक महोत्सव उद्यापासून शोभायात्रेने होणार प्रारंभ

वेरली प्राथमिक शाळेचा हिरक महोत्सव उद्यापासून शोभायात्रेने होणार प्रारंभ

मालवण

जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा वेरलीचा शतकोत्तर हिरक महोत्सव ४ मे ते ६ मे या कालावधीत विविध कार्यक्रमानी साजरा होणार असून या महोत्सवाचे उदघाटन दिनांक ४ मे रोजी सकाळी १० वाजता होणार आहे. या प्रशालेच्या शतकोत्तर हिरक महोत्सवानिमित्त भव्य शोभायात्रा काढण्यात येणार आहे.

मालवण तालुक्यातील वेरली येथील जिल्हापरिषद पूर्ण प्राथमिक शाळा वेरलीची स्थापना १८ नोव्हेंबर १८५६ रोजी झाली असून या प्रशालेचा शतकोत्तर हिरक महोत्सव उद्या दि ४ मे पासून साजरा करण्यात येणार आहे.

उद्या दि ४ मे पासून प्रशालेच्या हिरक महोत्सवाच्या निमित्ताने विविध कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे. सायंकाळी ४ वाजता प्रशालेचे शिक्षक व इतर मान्यवरांचा सत्कार समारंभ तर रात्रौ १० वाजता शाळेतील विद्यार्थ्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम व महाराष्ट्राची लोकधारा हा आजी विद्यार्थ्यांचा कार्यक्रम होणार आहे. उदघाटन निमित्त प्रमुख अतिथी म्हणून गटविकास अधिकारी आपासाहेब गुजर, गटशिक्षणाधिकारी संजय माने, केंद्र प्रमुख वाडाचापाट नंदकिशोर देसाई हे उपस्थित राहणार आहेत.

शुक्रवार दिनांक ५ मे रोजी सकाळी ११ वाजता नेत्रशिबीर आणि माजी विद्यार्थी स्नेहमेळावा, रात्री १० वाजता आजी माजी विद्यार्थ्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम तसेच शिक्षक पालक ग्रामस्थ यांचा महाराष्ट्राची लोकधारा हा कार्यक्रम होणार आहे.

शनिवार दिनांक ६ मे रोजी सकाळी १० वाजता सत्यनारायणाची महापूजा व भजने आणि रात्रौ १० वाजता बाळकृष्ण दशावतार कोळंब यांचा पौराणिक दशावतार नाट्यप्रयोग होणार आहे. या कार्यक्रमास सर्वांनी उपस्थित रहावे असे आवाहन ग्रामपंचायत विरण शाळा व्यवस्थापन समिती शतकोत्तर हिरक महोत्सव समिती मुख्याध्यापक शिक्षक आजी माजी विद्यार्थी व ग्रामस्थ यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा