डी.के.सावंत; गणेशोत्सवातील गाड्यांना मुदतवाढ देण्याची मागणी…
कोकण रेल्वे मार्गावर तुतारी एक्सप्रेस चालू करावी,तसेच गणेशोत्सव काळात सुरू करण्यात आलेल्या विशेष गाड्यांना मुदतवाढ देण्यात यावी, अशी मागणी कोकण रेल्वे प्रवासी संघटनेच्यावतीने आज रेल्वे प्रशासनाकडे करण्यात आली आहे.
यावेळी संघटनेचे अध्यक्ष डी.के.सावंत, विनोद रेडकर, सतिश पाटणकर, नकुल पार्सेकर, अशोक देसाई, सौ.उल्का नाईक इत्यादी संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी गणेशोत्सवाच्या निमित्ताने कोकण रेल्वेच्या मार्गावर गेल्या १५ ऑगस्टपासून विशेष गाड्या सुरू झाल्या आहेत. त्या येत्या ५ सप्टेंबरपर्यंत चालणार आहेत. या गाड्यांना सुरुवातीला कमी प्रतिसाद मिळाला तरी चाकरमान्यांनी नंतर मात्र चांगला प्रतिसाद दिला आहे. परतीच्या प्रवासात तर अनेक गाड्यांचे आरक्षण फुल झाले आहे. मुंबईतून कोकणात गेलेले चाकरमानी नेहमीप्रमाणे गणेशोत्सव संपल्यानंतर पितृपक्षातील धार्मिक कार्ये आटोपून पुन्हा मुंबईत येणार आहेत. कोकण रेल्वेमुळे त्यांना कमीत कमी खर्चामध्ये, तसेच सोशल डिस्टन्सिंग पाळून मुंबईमध्ये परतणे सोयीचे होणार आहे. त्यामुळे ५ सप्टेंबरनंतरही पुढे काही काळ या गाड्या सुरू ठेवणे आवश्यक आहे.मुंबईत आल्यानंतर त्यांना आपापल्या घरी जाणे सोयीचे व्हावे, यासाठी लोकलमधून प्रवास करण्याची मुभाही त्यांना मिळावी असे संघटनेचे सावंत यांनी सांगितले