ज्ञान,विज्ञान आणि सुसंस्काराचा वसा जपणारे : अनिल माने
श्रीमती आक्काताई रामगोंडा पाटील कन्या महाविद्यालय, इचलकरंजी येथून आपल्या प्रदिर्घ प्रशासकीय सेवेतून निवृत्त होत असणारे अनिल माने सर म्हणजे बापूजींचे एक सच्चे गुरुदेव कार्यकर्तेच म्हणावे लागतील. त्यांनी 1 डिसेंबर 1985 ला श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर मध्ये आपल्या प्रशासकीय सेवेची सुरुवात केली. खरंतर 2013 ला मी या कन्या महाविद्यालयात रुजू झाले. तेव्हा मला भेटलेली पहिली व्यक्ती म्हणजे श्री. अनिल माने सर होय. आणि तेव्हापासून आज जवळजवळ दहा वर्ष होत आली. रोज त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे अनेक पैलू नव्याने समोर येतात. “ज्ञान विज्ञान आणि सुसंस्कार यासाठी शिक्षण प्रसार….” या ध्येयाने प्रेरित होऊन ज्ञानयोगी डॉ बापूजी साळुंखे यांनी श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था नामक हा ज्ञानयज्ञ प्रज्वलित केला. सत्य,शील त्याग, प्रामाणिकता व पिळवणुकीस आळा ही मूल्ये त्यांनी फक्त विद्यार्थ्यांच्यातच नाही तर आम्हा सर्व गुरुदेव कार्यकर्त्यांमध्ये रुजवली आहेत. इथे कोणीच लहान वा मोठा नाही कारण येथे सगळेच गुरुदेव कार्यकर्ते आहेत. “गुरुदेव कार्यकर्ता” या शब्दांमध्येच एक वेगळी ताकद आहे. हा नुसता शब्द नाही तर आमच्या जगण्याची ऊर्जा आहे. आयुष्यात बऱ्याचदा बऱ्याच अडचणी येतात निराशा पदरात पडते तेव्हा ही हाक आम्हाला जगण्याचं नवं बळ देते. माने सर अखंड आयुष्यभर गुरुदेव कार्यकर्ता म्हणूनच जगले आहेत आणि इथून पुढच्या आयुष्यातही ते गुरुदेव कार्यकर्ता म्हणूनच जगतील एवढा विश्वास आहे, कारण एक शांत आणि तितकेच संयमी व्यक्तिमत्व म्हणून संपूर्ण संस्थेत श्री माने सरांना ओळखतात.शिक्षण महर्षी बापूजी साळुंखे महाविद्यालय मिरज येथे काही वर्षे सेवा केल्यानंतर श्री माने येथील श्रीमती अक्काताई रामगोंडा पाटील कन्या महाविद्यालयात रुजू झाले. तेव्हापासून आज अखेर त्यांचे या महाविद्यालयाशी ऋणानुबंध जोडले आहेत. त्यांनी त्यांच्या अखंड आयुष्यातला बराचसा काळ हा स्वतःच्या घरी कमी पण महाविद्यालयात जास्त घालवलेला आहे. आणि या महाविद्यालयाचेही त्यांच्यावर तितकेच प्रेम आहे.
हे महाविद्यालय सोडावे लागेल म्हणून मिळालेलले प्रमोशन ही नम्रपणे नाकारणारा हा एक अवलीया आहे. जगामध्ये खूप कमी अशी माणसं असतात जी आपल्या कामावर व कामाच्या ठिकाणावर जीवापाड प्रेम करतात. माने सर त्यांच्या पैकीच एक आहेत. खरं तर या महाविद्यालयाची स्थापना 1984 मध्ये झाली. नवीनच महाविद्यालय होतं, त्यात ही संस्थेतील एकमेव कन्या महाविद्यालय म्हणून सगळ्यांचे लक्ष या महाविद्यालयावरच असायचं, तेव्हा माने सर गेटवरून हलायचे सुद्धा नाहीत, सगळ्या विद्यार्थ्यीनी सुद्धा त्यांना घाबरत असत.असे अनेकांकडून आम्ही ऐकलं आहे.त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा आणखी एक पैलू म्हणजे त्यांचे सुंदर हस्ताक्षर…. माता सरस्वतीचे आशीर्वाद यांना जन्मतःच लाभलेले असावेत, त्यांचे अक्षर बघून मन प्रसन्न होत. अतिशय कमी बोलणारे शांत,संयमी आणि आपल्या कामात जीव ओतणारे म्हणून महाविद्यालयात त्यांना सगळेजण ओळखतात.आपल्या सुंदर हस्ताक्षराने महाविद्यालयातील सर्वच कार्यक्रम,घटना,प्रसंग,उत्सव त्यांनी सजवले आहेत.
आज ते आपल्या प्रदीर्घ प्रामाणिक प्रशासकीय सेवातून निवृत्त होत आहेत. पण त्यांची आणि त्यांच्या अक्षरांची आठवण आम्हाला सतत येत राहील. शिक्षण महर्षी डॉक्टर बापूजी साळुंखे आमचे दैवत असून त्यांनी घालून दिलेल्या ज्ञान,विज्ञान आणि सुसंस्काराचा वसा प्राणपणाने जपणारे एक सच्चे गुरुदेव कार्यकर्ते म्हणून आम्हांस त्यांचा नेहमीच अभिमान राहील.
त्यांच्या या निःस्वार्थ सेवेस आमचा हृदयपूर्वक सलाम आणि त्यांना उत्तम आरोग्य,सुख,संपदा लाभो हीच पांडुरंग चरणी प्रार्थना.
– डॉ. प्रतिभा भारत पैलवान
कन्या महाविद्यालय, इचलकरंजी