You are currently viewing कणकवली तालुक्यातील शिवडाव गावात ११० केव्ही लाईनचा २५ मीटर उंचीचा टॉवर समाजकंटकाने गॅसकटरने कापून पाडला खाली

कणकवली तालुक्यातील शिवडाव गावात ११० केव्ही लाईनचा २५ मीटर उंचीचा टॉवर समाजकंटकाने गॅसकटरने कापून पाडला खाली

कणकवली तालुक्यातील शिवडाव गावात ११० केव्ही लाईनचा २५ मीटर उंचीचा टॉवर समाजकंटकाने गॅसकटरने कापून पाडला खाली

कणकवली :

राधानगरीहून सिंधुदुर्गला विद्युत पुरवठा करणाऱ्या ११० केव्ही लाईनचा २५ मीटर उंचीचा टॉवर (मनोरा) २६ जानेवारी रोजी पहाटेच्या सुमारास अज्ञात समाजकंटकाने गॅसकटरने कापून खाली पाडला. जीवितावरही बेतू शकते, असा धोका पत्करत गॅसकटरने टॉवर पाडण्याचा नेमका उद्देश काय? यामागे घातपात करण्याचा डाव होता का, असा सवालही उपस्थित होत आहे. या कृत्यामुळे महापारेषण, महावितरणसह सर्व यंत्रणाही चक्रावून गेली असून याबाबत महापारेषणकडून पोलिसांत अज्ञाताविरुद्ध तक्रार देण्यात आली आहे. चालू स्थितीतील हा टॉवर खालून जाणाऱ्या ११ केव्ही लाईनवर पडल्याने शिवडाव परिसरातील काही भागातील वीजपुरवठा खंडित झाला होता. दरम्यान, या प्रकरणी पोलीस तपास सुरू करण्यात आला आहे.

याबाबत महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीचे अधिकारी संजय कळविकट्टे यांनी पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार, दि. २६ जानेवारी रोजी मध्यरात्री २.१० वा. च्या सुमारास राधानगरीहूनहून कणकवली येथे वीजपुरवठा करणाऱ्या ११० केव्ही लाईनच्या मनोऱ्याचा पाया अज्ञात व्यक्तीने गॅस कटरच्या सहाय्याने कापून सुमारे सहा लाख रुपयांचे नुकसान केल्याचे म्हटले आहे. त्यानुसार पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध सार्वजनिक मालमता दस्तऐवज अधिनियम १९८४ च्या कलम ३ व भादंवि कलम ४२७ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

प्राप्त महितीनुसार, २५ रोजी उत्तररात्रीनंतर व २६ रोजी पहाटेच्या पूर्वी हा प्रकार घडला. यातील अज्ञात हा माहीतगार असण्याची शक्यता आहे. कारण रस्त्यापासून जवळ असलेला टॉवर कापण्यात आला आहे. टॉवरपर्यंत गॅसकटर व आवश्यक साहित्याचे वाहन नेऊन नंतरच हा टॉवर कापण्यात आला आहे. तसेच टॉवर कापताना एका बाजूचे खांब अगोदर कापून एका बाजूने भार आल्यानंतर दुसरे खांब कापण्यात आल्याने तो एका बाजूला पडल्याचे दिसून येत होते. हा टॉवर पडत असताना तेथूनच शिवडाव व परिसरात वीजपुरवठा करणाऱ्या ११ केव्ही लाईनवर पडल्याने परिसरातील दोन ट्रान्सफॉर्मर फॉल्टी झाले होते. त्यामुळे काही भागातील वीजपुरवठा खंडित झाला होता. … तर ठरले असते धोकादायक अज्ञाताकडून करण्यात आलेले हे कृत्य अत्यंत धोकादायक होते. तसेच यातील अज्ञात हा एकटा असण्याची शक्यता अजिबात नाही. त्याच्यासोबत अजून काहीजण असण्याची शक्यता आहे. हा टॉवर पडताना लाईन तुटली असती अथवा काही दुर्घटना घडली असती तर ते धोकादायक ठरले असते. मात्र, टॉवर कापताना अत्यंत सावधगिरी बाळगत हे दुष्कृत्य करण्यात आल्याचे दिसून येत असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. उद्देश काय? अशाप्रकारे चालू ११० केव्ही लाईनचा टॉवर कापण्याचा नेमका उद्देश काय? हा प्रश्न सर्वांनाच सतावत आहे. तसेच टॉवर कापल्यानंतर त्यातील कोणत्याही साहित्याला हात लावण्यात आलेला नाही. त्यामुळे फक्त गॅसकटरने टॉवर कापून नुकसान करण्याचा उद्देश काय? याचा उलगडा होऊ शकलेला नाही. तातडीने दुरुस्तीचे काम दरम्यान, हा टॉवर ११ केव्ही लाईनवर पडल्याने त्या लाईनवरील ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित झाला होता. हा बीजपुरवठा शनिवारी सुरळीत करण्यात येत असल्याचे महावितरणचे कार्यकारी अभियंता बाळासाहेब मोहिते यांनी सांगितले. तर टॉवर दुरुस्तीचे काम तातडीने हाती घेण्यात आले असून तात्काळ टॉवर उभा करण्याचा प्रयत्न असल्याचे पारेषणचे अधिकारी संजय कळविकट्टे यांनी सांगितले.

तर बहुतांशी भाग राहिला असता अंधारात ११० केव्ही राधानगरीवरून येणारा वीजपुरवठा हा सध्या इमर्जन्सीसाठी वापरण्यात येतो. सद्यस्थितीत या भागात खारेपाटण लाईनवरून येणाऱ्या सप्लायचा वापर करण्यात येतो. खारेपाटण लाईनला समस्या असल्यास राधानगरी लाईनचा वापर केला जातो. त्यामुळे टॉवर कापल्यानंतर वीजपुरवठा खंडित होण्याची मोठी समस्या जाणवली नाही. मात्र, जर या कालावधीत खारेपाटण लाईनला फॉल्ट आला असता, तर जिल्हयाच्या बहुतांश भागावर अंधारात राहण्याची वेळ आली असती.

WhatsAppFacebookTwitterTelegramShare

प्रतिक्रिया व्यक्त करा