सिंधुदुर्गनगरी
कुडाळ तालुक्यातील माणगाव, तळीवाडी येथील पार्वती महादेव साटम यांच्या घरी घरफोडी करून 99 हजार रुपयांचा सोन्याचा ऐवज चोरणाऱ्या आरोपीस जेरबंद करण्यात पोलीसांना यश आले आहे. सदर प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेने केलेल्या कारवाईमध्ये आरोपीस पडकण्यात आले आहे. पोलीस अधिक्षक राजेंद्र दाभाडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुनिल धनावडे यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.
या गुन्ह्याचा शोध घेत असताना आनंद महादेव चिपकर, रा तळीवाडी, माणगाव, ता. कुडाळ या इसमाचा चोरीमध्ये सहभाग असल्याची विश्वसनिय माहिती पोलिसांनी मिळाली. त्यावरून सदर इसमास ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांने गुन्ह्याची कबुली दिली. तसेच त्याच्याकडून चोरीस गेलेले मंगळसुत्र व गुन्हा करण्यासाठी वापरण्यात आलेला हातोडा असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. गुन्हा घडल्यानंतर अवघ्या 12 तासांमध्ये गुन्ह्याची उकल करून स्थानिक गुन्हे शाखेने उल्लेखनिय कामगिरी केली आहे.
या कारवाईसाठीच्या पथकामध्ये पोलीस उपनिरीक्षक सचिन शेळके, पोलीस अंमलदार रामचंद्र शेळके, आशिष गंगावणे, कुष्णा केसरकर, सत्यजित पाटील, रवि इंगळे, संदीप नार्वेकर यांचा समावेश होता अशी माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक श्री. शेळके यांनी दिली.