You are currently viewing सिंधुदुर्ग किल्ला प्रवासी वाहतुकीत नियमांचे पालन होत नसल्याची तक्रार

सिंधुदुर्ग किल्ला प्रवासी वाहतुकीत नियमांचे पालन होत नसल्याची तक्रार

अन्यथा किल्ला बंद आंदोलन छेडू – सयाजी सकपाळ

मालवण

मालवण जेटी ते सिंधुदुर्ग किल्ला पर्यटक वाहतुकीमध्ये प्रवासी सुरक्षिततेच्या नियमांचे पालन होत नसल्याची तक्रार किल्ले सिंधुदुर्ग मधील शिवराजेश्वर मंदिरातील प्रमुख पुजारी कुटुंबातील सयाजी सकपाळ यांनी तहसीलदार, पोलीस आणि बंदर विभागाच्या वरिष्ठ कार्यालयाकडे केली आहे. यापूर्वी बंदर विभागाकडे तक्रार करूनही कोणतीही कारवाई झाली नाही, त्यामुळे किल्ला रहिवासी असलेल्या लोकांच्या तक्रारींची दखल जर प्रशासन आणि बंदर विभाग घेत नसेल, तर न्याय हक्कासाठी आम्ही किल्ला बंद आंदोलन छेडू, असाही इशारा सकपाळ यांनी दिला आहे.

मालवण बंदर विभागाकडे सयाजी सकपाळ यांनी याबाबत तक्रार केली होती, मात्र बंदर विभागाकडून कोणतीही कारवाई करण्यात येत नसल्याने सदरची तक्रार सकपाळ यांनी मालवण तहसीलदारांकडे केली आहे. गेल्या काही दिवसांपासून पर्यटकांना लाईफ जॅकेट वापराची सक्ती करण्याचा स्तुत्य उपक्रम बंदर विभागातर्फे राबविला जात आहे. परंतु याचवेळी, बोटीच्या प्रवासी वाहतूक क्षमतेपेक्षा दुपटीने प्रवासी वाहतूक करून प्रवाशांच्या जीवाशी खेळ केला जात आहे. याआधीही आम्ही सदर बाब मालवण पोर्ट ऑफिस यांच्या निदर्शनास आणून दिली होती, परंतु सदर विभागाकडून या नियमांची पायमल्ली करताना अक्षम्य दुर्लक्ष करण्यात येत आहे. प्रवासी वाहतुकीच्या वेळेसंदर्भातील नियमांचेही प्रवासी व्यावसायिकांकडून सर्रास उल्लंघन केले जात आहे. सकाळी ७ ते सायंकाळी ५.३० या वेळेतच वाहतूक सरू राहावी, असा नियम असताना सायंकाळी पाचनंतरही ही वाहतूक बेधडक सुरू असल्याचे निदर्शनास आले आहे. या नियमांचीही कडक अंमलबजावणी करून नियमभंग करणाऱ्या बोटचालकांवर कडक कारवाई करण्यात यावी, असे सकपाळ यांनी निवेदनात म्हटले आहे.

तसेच प्रवासी वाहतूक करणाऱ्या बोटींना बंदर विभागाचा परवाना असणे गरजेचे आहे. परंतु यातील काही बोटींच्या परवान्याची मुदत संपुष्टात आल्यानंतरही प्रवासी वाहतुकीसाठी त्यांचा वापर केला जात आहे, असाही आरोप सकपाळ यांनी केला आहे. बंदर विभाग अशा विनापरवाना बोटींकडेही दुर्लक्ष करीत आहे. तरी कार्यरत सर्व बोटींच्या परवान्याची पडताळणी केल्यानंतरच प्रवासी वाहतुकीची परवानगी देण्यात यावी. गेल्या पर्यटन हंगामात मालवण समुद्र किनाऱ्यावर झालेल्या दुर्दैवी बोट अपघाताची पुनरावृत्ती झाल्यानंतर किल्ला प्रवासी वाहतूक संघटना व मालवण पोर्ट ऑफीस यांचे डोळे उघडणार आहेत का? असाही सवाल सकपाळ यांनी केला आहे.

यापूर्वी किल्ला रहिवासी असलेल्या लोकांनी लाईफ जॅकेट घातलेले नसल्याने त्यांना दंड करण्यात आला होता. मात्र तक्रार देऊन आता इतरांवर कारवाई केली जात नसल्या बंदर विभागाच्या कामकाजावर सकपाळ यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा