You are currently viewing क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले व बोधिसत्व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंती महोत्सव…

क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले व बोधिसत्व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंती महोत्सव…

फुले, शाहू, आंबेडकर विचारमंच मालवणच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन

सामाजिक प्रबोधनकार ऍड. वैशाली डोळस यांची होणार जाहीर सभा ; भव्य जिल्हास्तरीय भीमगीत गायन पार्टी स्पर्धा

मालवण

भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३२ वी जयंती तर क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची १९६ वी जयंती निमित्ताने संयुक्त जयंती महोत्सव कार्यक्रम फुले शाहू आंबेडकर विचारमंच मालवणच्या वतीने शुक्रवार १४ एप्रिल रोजी मामा वरेरकर नाट्यगृह मालवण येथे आयोजित करण्यात आला आहे.

या महोत्सवा अंतर्गत १४ एप्रिल रोजी सकाळी ८:३० वाजता समाज मंदिर मालवण येथे पूजा पाठ, सकाळी ९ वाजता समाज मंदिर एसटी स्टँड येथून डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक बांगीवाडा येथे भव्य धम्म रॅली काढण्यात येणार आहे. तर दुपारी १२ वाजता मामा वरेरकर नाट्यगृह येथे सामाजिक प्रबोधनकार मराठा सेवा संघ, औरंगाबादच्या ऍड. वैशाली डोळस यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेचे अध्यक्षस्थान सेवानिवृत्त गटविकास अधिकारी मिलिंद जाधव हे भूषविणार आहेत. तर या कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष म्हणून फुले शाहू आंबेडकर विचारमंच मालवणचे अध्यक्ष आनंद मालवणकर हे उपस्थित राहणार आहेत. प्रमुख पाहुणे म्हणून मालवणचे पोलीस निरीक्षक विजय यादव, भंडारी हायस्कुलचे मुख्याध्यापक वामन खोत, आर.पी. बागवे हायस्कुल, मसुरेचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक किशोर चव्हाण आदी उपस्थित राहणार आहेत.

या कार्यक्रमास सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन फुले, शाहू, आंबेडकर विचारमंच मालवणचे अध्यक्ष आनंद मालवणकर, सचिव संजय जाधव, कार्याध्यक्ष सिद्धार्थ जाधव यांनी केले आहे.

भव्य जिल्हास्तरीय भीमगीत गायन पार्टी स्पर्धा

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि क्रांतिसूर्य महात्मा जोतिबा फुले यांची संयुक्त जयंतीच्या निमित्ताने जिल्हा स्तरीय भीमगीत गायन पार्टी स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेतील प्रथम विजेत्या संघास ७ हजार रु. व सन्मानचिन्ह, द्वितीय विजेत्यास ५ हजार रु. व सन्मानचिन्ह, तृतीय विजेत्यास ३ हजार रु. सन्मानचिन्ह अशी पारितोषिके देण्यात येणार आहेत. या व्यतिरिक्त दोन उत्तेजनार्थ संघांना प्रत्येकी १ हजार रुपये पारितोषिक दिले जाणार आहे. तरी या जयंती महोत्सव कार्यक्रमास सर्वांनी उपस्थित राहावे, असे आवाहन फुले शाहू आंबेडकर विचारमंचने केले आहे

प्रतिक्रिया व्यक्त करा