You are currently viewing बिबट्याच्या हल्ल्यात चौकुळ येथे शेतकरी जखमी…

बिबट्याच्या हल्ल्यात चौकुळ येथे शेतकरी जखमी…

बंदोबस्त करण्याची ग्रामस्थांची मागणी

आंबोली

बिबट्याने मागून हल्ला केल्याने चौकुळ येथील शेतकरी गंभीर जखमी झाला आहे. ही घटना काल रात्री ९ वाजण्याच्या सुमारास त्याच्या घराच्या मागच्या बाजूला घडली. रामचंद्र उर्फ भाऊ जाधव असे त्यांचे नाव आहे. ते घरामागे असलेल्या, गोठ्यात म्हैशींना पाणी देण्यासाठी गेले होते. त्यावेळी हा प्रकार घडला.

त्यांना आंबोली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात अधिक उपचार करण्यात आले. दरम्यान भरवस्तीत हल्ला करणाऱ्या या बिबट्याचा योग्य तो बंदोबस्त करावा अशी, मागणी चौकूळ ग्रामस्थांच्या वतीने वनविभागाकडे करण्यात आली आहे.

याबाबतची माहिती अशी की, श्री जाधव हे आपल्या घरामागे बांधण्यात आलेल्या म्हैशींना पाणी देण्यासाठी गेले होते. यावेळी तेथून परतत असताना चोर पावलानी आलेल्या बिबट्याने त्यांच्यावर मागून झडप घातली. यात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. तर, ते पडल्यामुळे त्यांच्या चेहऱ्याला दुखापत झाली आहे.

यावेळी जाधव यानी आरडाओरड केल्यानंतर बिबट्याने तेथून पळ काढला दरम्यान याबाबतची माहिती मिळाल्यानंतर सामाजिक कार्यकर्ते दिनेश गावडे व त्यांच्या कुटुंबियांनी त्यांना अधिक उपचारासाठी आंबोली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. त्या ठिकाणी त्यांच्यावर अधिक उपचार करण्यात आले. याबाबतची माहिती मिळताच वनक्षेत्रपाल विद्या घोटगी,वनपाल अमोल पटेकर,श्री भिंगारदिवे आदींनी रूग्णालयात धाव घेऊन श्री जाधव यांची विचारपूस केली

प्रतिक्रिया व्यक्त करा