You are currently viewing शासकीय विदर्भ ज्ञान विज्ञान संस्था म्हणजे विदर्भ महाविद्यालय* *अमरावती या संस्थेचा शतकपूर्ती सोहळा त्यानिमित्त:- प.सि आणि बी.टी*

शासकीय विदर्भ ज्ञान विज्ञान संस्था म्हणजे विदर्भ महाविद्यालय* *अमरावती या संस्थेचा शतकपूर्ती सोहळा त्यानिमित्त:- प.सि आणि बी.टी*

*शासकीय विदर्भ ज्ञान विज्ञान संस्था म्हणजे विदर्भ महाविद्यालय* *अमरावती या संस्थेचा शतकपूर्ती सोहळा त्यानिमित्त:- प.सि आणि बी.टी*
==============
आज अमरावती शहरात फारच कमी लोक असे आहेत की जे केवळ नावाच्या आद्याक्षरावरून ओळखले जातात .त्यातले एक आहेत प.सि . म्हणजे विदर्भ महाविद्यालयाचे माजी प्राचार्य व राज्यशास्त्राचे गाढे अभ्यासक पदमाकर काणे सर आणि दुसरे आहेत बी टी म्हणजे आमदार प्रा. बी.टी देशमुख .आज मंगळवार दि.११ एप्रिल२३ रोजी दुपारी साडेबारा वाजता अमरावतीमध्ये एक चांगला कार्यक्रम घडवून येत आहे .आपणा सर्वांना माहीत आहेत की यावर्षी विदर्भ महाविद्यालय या संस्थेला शंभर वर्षे पूर्ण झालेली आहेत. आणि या शंभर वर्षांमध्ये हजारो विद्यार्थी या महाविद्यालयामधून शिकून गेलेले आहेत .या सर्व माजी विद्यार्थ्यांचा मेळावा आदरणीय व्यक्तिमत्व असलेले प्राचार्य डॉ. प.सि .काणे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होत आहे आणि या कार्यक्रमात सर्वात महत्त्वाचं म्हणजे संपूर्ण महाराष्ट्राला परिचित असलेले आणि आपल्या विधान परिषदेमधील कामामुळे खऱ्या अर्थाने आमदार असलेले प्रा. डॉ. बी टी देशमुख यांचा सत्कार या कार्यक्रमात होणार आहे . अमरावतीचे विदर्भ महाविद्यालय हे महाराष्ट्रातील कदाचित एकमेव महाविद्यालय असावे की ज्या महाविद्यालयाजवळ १८० एकराचा परिसर आहे. या परिसरामधील बहुतांश सर्व वास्तू ह्या ऐतिहासिक आहेत .आजही ह्या ऐतिहासिक वास्तू आपले लक्ष वेधून घेतात .तसेच या महाविद्यालयाने या वास्तुसारखेच आपले लक्ष वेधून घेणारी अनेक माणसे या महाराष्ट्राला दिलेली आहेत. आणि त्यापैकी दोन आहेत .प सि आणि बीटी .खरं म्हणजे नुसतं दोन अक्षरावरून ओळखले जाणारे खूप कमी लोक महाराष्ट्रात आहेत .पसी म्हटल्याबरोबर काणे हे नाव ओठावर येतेच आणि बीटी म्हटल्याबरोबर आमदार बी टी देशमुख नाव ओठावर येतेच .एवढे मोठे या दोघांचे कार्य आहे.
कालच महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस या कार्यक्रमाचे रितसर उद्घाटन करून गेले .शतकपूर्ती कार्यक्रमासाठी पूर्ण महाविद्यालय नटले आहे सजले आहे. महाविद्यालयाच्या संचालिका डॉ.अंजली देशमुख यांच्यापासून तर विद्यार्थ्यांपर्यंत सर्वजण तन-मन धनाने काम करीत आहेत .पावसाची भीती होतीच. पण पावसाने न येऊन या महाविद्यालयाच्या उद्घाटन समारंभावर आपलं कृपा क्षेत्र दर्शवून दिले आहे .कधी कधी निसर्ग पण चांगल्या कामाला आळकाठी बनत नाही .मी विदर्भ महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी .त्यामुळे प सि आणि बीटी या दोन्ही व्यक्तीशी माझा वारंवार संपर्क येत गेला .त्यात तर प सि काणेसर हे विदर्भ महाविद्यालयाचे प्राचार्य होते. केवळ प्राचार्य असून नाही चालत .मी पुढे जाऊन असे म्हणेल की ते एक सामाजिक बांधिलकी जोपासणारे प्राचार्य होते. त्या काळात विदर्भ महाविद्यालयाचा प्राचार्य म्हणजे प्रचंड दबदबा असायचा. पण काणेसरांनी आपल्या प्राचार्य पदाला सर्वसामान्य विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवून दिले. त्या काळात विदर्भ महाविद्यालय एक खूप मोठे महाविद्यालय म्हणून परिचित होते .आजच्यासारखा महाविद्यालयांचा सुकसुकाळ झालेला नव्हता. त्या काळात काणेसरांनी आम्हाला जे प्रेम दिले जो जिव्हाळा दिला आणि नेहमी पाठीवर शाबासकीचा हात दिला त्यामुळे आम्ही उभे झाले आहोत .मी सामाजिक चळवळीत असल्यामुळे हे महाविद्यालय सोडल्यानंतरही काणे सरांचा संपर्क येत गेला आणि आजही तो कायम आहे .काणेसरांच्या संदर्भातील दोन-तीन आठवणी या ठिकाणी आठवणीने नमूद कराव्या अशा वाटतात .मला आठवते आम्ही मृदगंध नावाचे भित्तीपत्रक सुरू केले होते .कवी खूप होते .लेखक खूप होते. परंतु आजच्यासारखा सोशल मीडिया त्यावेळेस नव्हता. मग नवोदितांना प्रोत्साहन मिळावे म्हणून आम्ही त्यावेळेस आम्ही भीत्तीपत्रक तयार केले होते .ते वेगळ्या महाविद्यालयामध्ये आम्ही लावत होतो .खरं म्हणजे भित्तीपत्रक तयार करायला खूप वेळ लागायचा.कारण सगळं हाताने लिहावं लागत होतं .एक वेळ आमच्या काही कार्यकर्त्यांना भीत्तीपत्रक घेऊन मी विदर्भ महाविद्यालयात पाठविले .तेव्हा प्राचार्य काणे सर प्राचार्यपदी होते .विद्यार्थी काणे सरांना भेटले .काणे सरांनी ते भित्तीपत्रक प्रभारी प्राध्यापकाकडे पाठविले. प्रभारी प्राध्यापकांनी त्यावर नजर फिरवली आणि सरांना म्हणाले सर यातील साहित्य फारच किरकोळ स्वरूपाचे आहे .महाविद्यालयाच्या नोटीस बोर्डवर ते लावण्याच्या दर्जाचे नाही आहे .आमचे कार्यकर्ते नाराज झाले .एक तर ते सगळे नवे कवी होते .त्यांनी दोन-तीन दिवस मेहनत घेऊन ते भित्तीपत्रक तयार केले होते .ते सगळे कवी माझ्याकडे आले आणि त्यांनी वृत्तांत सांगितला .मी काहीच बोललो नाही .काणे सरांचा स्वभाव मला माहीत होता .मी विदर्भ महाविद्यालयामध्ये गेलो. प्राचार्यांच्या केबिनमध्ये प्रवेश मिळविला. काणे सरांना आनंद झाला. ते म्हणाले ये नरेश काय काम काढले आहे .मी ते भित्तीपत्रक समोर केले. सर म्हणाले प्रभारी प्राध्यापकांनी ते पाहिले. पण यातील साहित्य फारच सुमार आहे. त्यामुळे ते कॉलेजच्या मोठ्या नोटीस बोर्डवर लावता येणार नाही .मी सरांना म्हणालो सर हे सर्व नवोदित आहेत. हे जर चांगले कवी असते तर मोठ्या वर्तमानपत्राकडे गेले असते .तिथे आपल्या कविता छापून आणल्या असत्या .सुरुवातीला साहित्य हे सुमार असणारच.सरांना हा माझा मुद्दा पटला .सरांनी बेल वाजवली कर्मचाऱ्याला बोलाविले आणि सांगितलं की हे ताबडतोब आत्ताच्या आत्ता आपल्या मोठया नोटीसबोर्डावर लावून टाका. आमची कवी मंडळी खूप खूष झाली .आजच्या सोशल मीडियावर जेवढा आनंद होणार नाही तेवढा आनंद त्यांना विदर्भ महाविद्यालयाच्या मोठ्या नोटीस बोर्डवर पोर्च मधल्या नोटीस बोर्डवर आपली कविता लागली .त्याचा खूप आनंद झाला .सरांची दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे सरांनी लिहिलेले राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे इंग्रजी चरित्र. आज जेव्हा आम्ही संपूर्ण भारतामध्ये फिरतो. तेव्हा मला जाणवते की आपण आपल्या भागातील थोर पुरुषांची चरित्रे इंग्रजीमध्ये हिंदीमध्ये लिहिले पाहिजेत. कारण राष्ट्रसंत तुकडोजी महाराज,कर्मयोगी गाडगेबाबा,शिक्षण महर्षी डॉ.पंजाबराव देशमुख यांना आपण मराठी पर्यंत सिमीत ठेवले तर भारतातील इतर राज्यात त्यांच्या कार्याचा प्रसार होणार नाही. राज्यशास्त्राचे व्यासंगी प्राध्यापक म्हणून काणेसरांचा नावलौकिक आहे. राज्यशास्त्रा बरोबर प.सि .काणेसर हे समीकरण गेले कित्येक वर्ष ठरून गेले होते .योगायोगाने सरांच्या सौभाग्यवती आमच्याच भारतीय महाविद्यालयामध्ये प्राध्यापिका होत्या .विदर्भ महाविद्यालय नुटा भारतीय महाविद्यालय यामुळे सरांच्या वारंवार भेटी व्हायच्या. सरांकडे काही काळ आयएएस कोचिंग सेंटरचा पण चार्ज होता. पुढे सरांचे चिरंजीव राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाचे कुलगुरू झाले .मी जेव्हा जेव्हा कुलगुरू बंगल्यावर जायचा तेव्हा सरांना खूप आनंद व्हायचा.ते म्हणायचे नरेश तू आलास. खूप छान वाटत आहे. मी जेव्हा कुलगुरू बंगल्यावर पहिल्यांदा गेलो. तेव्हा त्यांनी त्यांच्या मुलाला म्हणजे कुलगुरूंना आमच्या खोलीत बोलावले आणि म्हणाले दादा हा नरेश काठोळे .चळवळीतला प्राध्यापक आहे .चांगला प्राध्यापक आहे .माझा विद्यार्थी आहे .मलाही खूप धन्य वाटले.सर नागपूरच्या कुलगुरू निवासात असताना अमरावतीवरून माझी गाडी अगोदर कुलगुरू निवासात जायची.सरांची आणि वहिनींची नियमितपणे भेट घेत होतो .सर आदरतिथ्य करीत होते. सर गाडीपर्यंत मला सोडायला येत होते .एक एका मोठ्या संस्थेचे प्राचार्य कुलगुरूंचे पिताश्री नामवंत लेखक मला गाडीपर्यंत सोडायला येतो हे खूपच हृदयस्पर्शी होते .मी सरांना नकार द्यायचो .पण सर म्हणाले अरे तू इतक्या दुरून आलास तर मला गाडीपर्यंत यायला तर काय हरकत आहे .तेवढेच पाय मोकळे होतात .सरांचे आज वय झाले आहे पण याही वयात त्यांच्या ठिकाणचा जिव्हाळा आत्मीयता व प्रोत्साहन देण्यासाठी पाठीवर मारलेली थाप अजूनही आमच्या पाठीवरच आहे .आणि ती पाठीवरच सदैव राहावी अशी आंतरिक इच्छा पण आहे.. आमदार प्रा. बीटी देशमुखांबद्दल मला खूप आदर आहे. या माणसाचा खऱ्या अर्थाने सत्कार व्हावा यासाठी आम्ही प्रयत्न केले .पण आम्हाला अपयश आले. पण विदर्भ महाविद्यालयाने मात्र बाजी मारली .त्यांनी बी.टी. सरांचा नकार सकारात्मक केला आणि सरांनाही नाही म्हणवले नाही .खरं म्हणजे आपल्यासमोर आजकाल आदर्श माणसे राहिलेली नाहीत. कुणाचा आदर्श समोर ठेवणार.सुरेश भटांच्या शब्दात सांगायचे तर माणसे कुठे गेली .अशीच परिस्थिती जाणवत आहे. तुम्ही वणवण फिरले तरी चांगली माणसे सापडणार नाहीत. पण त्याला एक माणूस मात्र अपवाद आहे .विरोधकही ते मान्य करतात आणि त्या माणसाचे नाव आहे .आदरणीय प्राध्यापक बी टी देशमुख .हा माणूस केवळ प्राध्यापक नव्हता केवळ विधान परिषद सदस्य नव्हता नुटाचा अध्यक्ष नव्हता तर हा माणूस म्हणजे अमरावती शहराच्या नवे विदर्भाच्या नव्हे महाराष्ट्राचा आदर्श होता आणि ही अशी माणसे शोधूनही पुढे सापडणार नाहीत. आज ज्या आदराने आम्ही हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाचे सर्वेसर्वा प्रभाकरराव वैद्य यांचे नाव घेतो .त्याच आदराने दुसरे नाव आमच्या ओठांवर येते ते म्हणजे प्राध्यापक बी टी देशमुख सरांचे. बीटी देशमुख यांचे संबंध नकळत येत गेले .त्याला कारणही तसेच घडले .मी अमरावतीच्या श्रीमती केशरबाई लाहोटी महाविद्यालय मध्ये विद्यार्थी होतो आणि कर्मचारी होतो आणि पुढे प्राध्यापकही झालो.त्यानंतर मी अमरावतीच्या भारतीय महाविद्यालयामध्ये प्राध्यापक म्हणून रुजू झालो .केशरबाई लाहोटी महाविद्यालय आणि भारतीय महाविद्यालय ही दोन महाविद्यालये म्हणजे नुटाची चालती बोलती कार्यालये होती .खरं म्हणजे बीटी देशमुख सर श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या शिवाजी महाविद्यालयामध्ये कार्यरत होते. पण नुटाच्या चळवळी चालायच्या त्या केशरबाई लाहोटी महाविद्यालय व भारतीय महाविद्यालयातून .तेव्हा नुटा बुलेटीन वाटण्याचं काम मी स्वीकारले होते .त्यातून आम्हाला पैसे मिळत होते .आम्ही विद्यार्थी असताना पैशाची गरज असायची. मग आम्ही घरोघरी नुटा बुलेटीन पोहोचून द्यायचो. त्यासाठी आम्हाला प्रत्येक पाकिटामागे पाच पैसे मिळायचे. तेव्हा त्या पाच पैशालाही खूप महत्त्व होते .रात्रभर नुटा बुलेटीन फोल्ड करायचे. त्याला स्टेपलर लावायचं. त्याच्यावर पत्ता असलेले स्टिकर लावायचं .त्याचे एरिया वाईज गठ्ठे तयार करायचे आणि मग आमची टीम कामाला लागायची. या कामाचे नेतृत्व होते माझ्याकडे .पुढे श्री बाबासाहेब सोमवंशी निवडणुकीला उभे राहिले. बी.टी देशमुख अतिशय खंबीरपणे त्यांच्या पाठीशी उभे राहिले आणि त्यांना केवळ ३७ मताने निवडून आणले. हा माणूस आजही तेवढ्याच ताठ आहे .कधीही झुकलेला नाही आणि कधीही कुठल्याही तडजोडी केलेल्या नाहीत. सत्यमेव जयते हा मंत्र त्यांनी खऱ्या अर्थाने जपला आहे आणि आज तर सत्याशी एकनिष्ठ राहिलेली माणसेच सापडणे कठीण झालेली आहे .आम्ही काम करीत असताना बी.टी. देशमुख यांची चक्कर व्हायची.मला विचारायचे काठोळे कुठपर्यंत आले काम ? सर उद्या संध्याकाळपर्यंत सर्व बुलेटीन वितरित होऊन जातील. मी त्यांना म्हणायचो .मला आठवते बाबासाहेब सोमवंशींच्या मतमोजणीची वेळ .आम्ही सर्वजण जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर बसलेलो होतो बीटी देशमुख पण त्यामध्ये होते .बाबासाहेब सोमवंशी ३७ मतांनी निवडून आले होते .परंतु तत्कालीन अधिकारी निकाल जाहीर करायला विलंब लावत होते .बाबासाहेब बाहेर आले .ते बाहेर येताच मी त्यांच्याजवळ गेलो .ते म्हणाले बीटी देशमुख यांना बोलवा .मी बी टी सर तिथे बसले होते तिथे गेलो आणि सरांना घेऊन आत मध्ये गेलो.बी.टी.सर तेव्हा विद्यमान आमदार होते आणि सरांच्या शब्दाला वजन होते .तो निकाल लगेच घोषित झाला आणि आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयापासून तर भारतीय विद्यालयापर्यंत पायी मिरवणूक काढली. कुठलीही गाडी नाही कुठलेही वाहन नाही कुठली स्कूटर नाही .एक वेळ मी मुंबईवरून बडनेरा येथे उतरलो .समोर बीटी सर दिसले .मी नमस्कार केला. सर म्हणाले चला माझ्याबरोबर. सरांनी त्यांची गाडी त्यांना घ्यायला बोलावली होती .चांगले वाटले. सरांनी आठवण ठेवली .मला घरापर्यंत सोडले .आमदार किती व्यस्त असतो हे आम्हाला माहित आहे. त्यात तर बी.टी.देशमुख हे तर अतिशय क्रियाशील आमदार. ते सतत काम करायचे .पण मी बसविलेल्या गाडगेबाबा युग निर्माता या नाटकाला ते आवर्जून उपस्थित राहिले. आणि आमच्या पाठीवर शाबासकीची थाप द्यायला हे विसरले नाहीत.आम्ही अमरावतीची ही नाटकं मुंबई पर्यंत पोहोचवली आणि ज्या ज्या वेळी जी जी मदत लागली ते ती आम्ही बीटी सरांकडून हक्काने मागूनही घेतली .आजही श्री संत गाडगेबाबा यांच्या जीवनावर आम्ही या शतकपूर्तीनिमित्त अंधार पाहिलेला माणूस हे नाटक स्टेजवर आणायचे ठरवले आहे आणि या कामात देखील आम्हाला त्यांचे सहकार्य लाभणार आहे आणि ते देणारही आहे याचा आत्मविश्वास पण आहे. अमरावतीला चांगले आयएएस सेंटर व्हावे यासाठी मी एक वेळ बी टी देशमुख सर यांच्या घरी गेलो. त्यांना ते पटलं. ते म्हणाले .मी नक्की याचा पाठपुरावा करेल आणि आज अमरावतीला त्यांच्यामुळे तसेच आ. सुनील देशमुख व खा.डॉ. अनिल बोंडे यांच्यामुळे व यांच्या पुढाकाराने विदर्भ महाविद्यालयाच्या परिसरात एक देखणे आयएएस सेंटर उभे झाले आहे. आणि त्याचेही उद्घाटन महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते संपन्न झाले आहे .जिथे जिथे सत्य आहे जिथे जिथे माणुसकी आहे. त्या कामात बीटी देशमुख प्रामाणिकपणे उभे राहिलेले आहेत.प्राध्यापकांची नुटा ही संघटना त्यांनी ज्या ताकदीने बांधली त्या ताकदीने कदाचित फार कमी संस्था नावारूपाला आल्या असतील. नुटा आणि बी टी देशमुख हे समीकरण झाले आहे .आज महाराष्ट्राच्या विधान परिषदेमध्ये महाराष्ट्राच्या राजकारणात अत्र तत्र सर्वत्र केवळ बी.टी. म्हटले म्हणजे आमदार प्राध्यापक बी टी देशमुख हे समीकरण रुजून गेले आहे .कारण त्यांची कर्तव्यनिष्ठ कार्यतत्परता अचूक मांडणी आणि तेवढे चांगले सादरीकरण यामुळे ते लोकांच्या लक्षात आहेत आणि राहतील .आज या अशा आदर्श व्यक्तिमत्त्वाचा शासकीय विदर्भ ज्ञान विज्ञान संस्थेमध्ये दुपारी साडेबारा वाजता शतकपूर्ती कार्यक्रमांमध्ये सत्कार होत आहे हे खरोखरच आनंदाची गोष्ट आहे .पसी आणि बी.टी या दोन्ही महामानवांना मी विदर्भ महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी या नात्याने शतशः नमन करतो आणि आम्ही पुढे चालू हा वारसा असे अभिवचन पण देतो .
==============
*डाँ.नरेशचंद्र काठोळे*
माजी विद्यार्थी विदर्भ महाविद्यालय व संचालक मिशन आयएएस अमरावती
9890967003

प्रतिक्रिया व्यक्त करा