टपाल खात्यातील अधिकारी लक्ष्मण शेळके यांचा सेवापुर्ती सत्कार सोहळा संपन्न
वैभववाडी
टपाल सेवेत काम करत असताना लक्ष्मण शेळके यांनी सामाजिक बांधिलकी जोपासत समाजसेवेचे काम केले आहे. सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तिमत्त्वांची राजकारणात ही गरज आहे. धनगर समाजाचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. समाजाच्या विकासासाठी अर्थसंकल्पात भरीव तरतूद देखील करण्यात आली आहे. परंतु ती मदत तळागाळापर्यंत पोहोचणे फार गरजेचे आहे. त्यासाठी आपण सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे. एकजुटीने धनगर समाजाचा विकास साधूया, असे प्रतिपादन आमदार नितेश राणे यांनी व्यक्त केले.टपाल खात्यातून सेवानिवृत्त होत असलेले लक्ष्मण मानाजी शेळके यांचा सेवापुर्ती सत्कार सोहळा समारंभ येथील सुवर्ण मंगल कार्यालयात पार पडला. यावेळी उद्योगपती राजू जांगळे, यशवंत सेना सरसेनापती माधव गडदे, ऑल इंडिया धनगर समाज प्रदेशाध्यक्ष प्रवीण काकडे, वैभववाडी भाजपा अध्यक्ष नासीर काझी, बबन झोरे, राजेंद्र खरात, प्रमोद रावराणे, सज्जन काका रावराणे, जयेंद्र रावराणे, नेहा माईंणकर, संजय सावंत, गुलाबराव चव्हाण, अंबाजी हुंबे, बाप्पी मांजरेकर व समाज बांधव, टपाल खात्यातील कर्मचारी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आमदार नितेश राणे म्हणाले, लक्ष्मण शेळके यांनी टपाल सेवा करत असताना लोकांची मने जोडण्याचे काम केले. सेवानिवृत्त असंख्य कर्मचारी होतात. परंतु असा कार्यक्रम सोहळा प्रत्येकाचा होत नाही. धनगर समाज बांधवांच्या जीवनात परिवर्तन घडवण्याचे काम शेळके यांनी केले. विद्यार्थ्यांचे भविष्य घडविण्याचे काम त्यांनी केले आहे. त्यांनी आपले समाजकारण वर्षानुवर्ष सुरूच ठेवावे. परंतु राजकारणात त्यांच्याबरोबर काम करण्यास आम्ही सर्व तयार आहोत. समाजाच्या विकासासाठी सर्वांनी एकत्र येऊया असे सांगितले.प्रवीण काकडे म्हणाले, लक्ष्मण शेळके यांनी सामाजिक चळवळ उभी केली. त्यांच्या ज्ञानाचा उपयोग समाजासाठी झाला पाहिजे. आम्ही सर्वजण त्यांच्या सोबत आहोत. आपल्या समाजासाठी एकत्र राहूया, असे सांगितले. सत्कारमूर्ती लक्ष्मण शेळके म्हणाले, अत्यंत खडतर जीवन प्रवास आमच्या वाटेला आला होता. परंतु त्यातून मार्गक्रमण केले. धनगर समाजासाठी जे जे देता येईल ते देण्यासाठी मी कटिबद्ध आहे. तळागाळातील प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही कमी पडणार नाही. नावळे गावच्या विकासासाठी नेहमी प्रयत्नशील असे सांगितले. आमदार नितेश राणे यांचा घोंगडी, धनगर काठी व फेटा देऊन शेळके कुटुंबियांनी सत्कार केला. तालुका धनगर समाजाच्या वतीने लक्ष्मण शेळके यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. आमदार नितेश राणे यांनी देखील शेळके यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. शेळके यांना शुभेच्छा देण्यासाठी मोठ्या संख्येने जनसमुदाय उपस्थित होता. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पांडुरंग काळे यांनी तर आभार प्रभाकर कोकरे यांनी मानले.