You are currently viewing पावशी सर्व्हिस रोड व बस थांब्या संदर्भात महिन्याभरात निर्णय घ्या

पावशी सर्व्हिस रोड व बस थांब्या संदर्भात महिन्याभरात निर्णय घ्या

अन्यथा ठिय्या आंदोलन; पावशी ग्रामपंचायतीचा इशारा..

 

कुडाळ/ पावशी :

 

पावशी सरपंच सौ.वैशाली पावसकर यांनी ग्रामस्थांसह तसेच पावशी ग्रामपंचायत सदस्यांना घेऊन गुरुवारी सावंतवाडी येथील महामार्ग विभागाचे उपअभियंता महेश खटी यांना लेखी निवेदन दिले आहे. मुंबई गोवा महामार्गावर पावशी बोरभाटवाडी येथे सर्विस रोड व बस थांबा संदर्भात येत्या महिन्याभरात निर्णय घेऊन हे काम मार्गी न लागल्यास ग्रामस्थांना घेऊन रस्त्यावरच ठिय्या आंदोलन करू असा इशारा कुडाळ पावशी ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ.वैशाली पावसकर यांनी महामार्ग विभागाचे उपअभियंता महेश खटी यांना दिला. सौ. पावसकर यांनी ग्रामस्थ व ग्रामपंचायत सदस्यांना घेऊन गुरुवारी दुपारी श्री खटी यांना जाब विचारत निवेदन दिले आहे.

मुंबई गोवा महामार्गावर कुडाळ पावशी बोरभाटवाडी येथे महामार्गाला लागून सर्व्हिस रोड व बस थांब्याची मागणी गेली दोन वर्ष पावशी येथील पावसकरवाडी, खोतवाडी, भोगटेवाडी, भटवाडी ग्रामस्थ करत आहेत. या ठिकाणी सर्विस रोड नसल्याने शालेय विद्यार्थी तसेच पादचारी ग्रामस्थ यांना जीव मुठीत घेऊन महामार्गावरून प्रवास करावा लागतो. गेली दोन वर्ष सातत्याने या संदर्भात शासन स्तरावर वारंवार पाठपुरावा सुरू आहे. मात्र असे असूनही महामार्ग विभागाचे अधिकारी यासंदर्भात टाळाटाळ करत आहेत.

महामार्गाच्या पलिकडे ग्रामस्थांसाठी ग्रामपंचायत कार्यालय बँक, आरोग्य केंद्र, पोस्ट ऑफिस, जिल्हा परिषद शाळा,अंगणवाडी शाळा इत्यादी सेवा आहेत. या सर्व सेवा करिता महामार्गवरून पलीकडे जाणे गरजेचे आहे. मात्र यावेळी अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे महामार्गाच्या बाजूने सर्विस रोड असणे गरजेचे आहे. त्यामुळे लवकरात लवकर सर्विस रोड बाबत निर्णय घेण्यात यावा. अशी मागणी यावेळी उपस्थित ग्रामस्थांसह ग्रामपंचायत सदस्यासह सरपंच सौ पावसकर यांनी केली.

तर महामार्गाच्या बाजूला बोरभाटकरवाडी येथे पूर्वीपासून असलेल्या बस थांबा हटविण्यात आल्यानंतर त्या ठिकाणी पुन्हा बस थांबा उभारून मिळावा अशी मागणी सुद्धा ग्रामस्थांची आहे याबाबत आश्वासने दिली जातात. परंतु कुठल्याही प्रकारची कार्यवाही अद्यापही झालेली नाही महामार्गावर बस थांबा नसल्याने शालेय विद्यार्थी तसेच इतर प्रवाशांना उन्हात ताटकळत उभे रहावे लागते. त्यामुळे बस थांब्याचा प्रश्नही सुटण्यासाठी आपण पावले उचलावीत. येत्या महिन्याभरात या संदर्भात निर्णय न झाल्यास ६ मे रोजी ग्रामस्थांना घेऊन रस्त्यावरच ठिय्या आंदोलन करण्यात येईल असा इशारा सरपंच सौ पावसकर यांनी दिला. दरम्यान यासंदर्भात महिनाभराच्या आत निर्णय घेऊन सर्व्हिस रोडचा प्रश्न मार्गी लावण्यात येईल असे आश्वासन श्री खटी यानी दिले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

1 × two =