You are currently viewing डॉ संजय पोळ यांचा वैद्यकीय अधीक्षक म्हणून बढती झाल्याने सत्कार

डॉ संजय पोळ यांचा वैद्यकीय अधीक्षक म्हणून बढती झाल्याने सत्कार

ओरोस

सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेत ३० वर्षे वैद्यकीय सेवा बजावलेल्या डॉ संजय पोळ यांची पेंडूर ग्रामीण रुग्णालय येथे वैद्यकीय अधीक्षक म्हणून बढती झाल्याने त्यांचा सत्कार आरोग्य विभागाच्यावतीने करण्यात आला. कोल्हापूर येथील उपसंचालक डॉ प्रेमचंद कांबळे यांच्याहस्ते हा सत्कार सोहळा जिल्हा परिषदेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात संपन्न झाला.
यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ महेश खलीपे, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ श्रीपाद पाटील, माता व बाल संगोपन अधिकारी डॉ सई धुरी, बाह्यस्थ निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ सुबोध इंगळे, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ संदेश कांबळे, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ हर्षल जाधव, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ रमेश कर्तस्कर आदी उपस्थित होते.
डॉ संजय पोळ हे जिल्हा परिषद आरोग्य विभागात गेली ३० वर्षे कार्यरत आहेत. त्यांनी चौके प्राथमिक आरोग्य केंद्र वैद्यकीय अधिकारी, मालवण तालुका आरोग्य अधिकारी आणि कणकवली तालुका आरोग्य अधिकारी म्हणून सेवा बजावली आहे. पोलिओ निर्मूलन, हत्तीरोग निर्मूलन, टी बी, लेस्प्रोसी एलिमिनेशन, गरोदर माताच्या सेवा, कुपोषण निर्मूलन, माता मृत्यू, बालमृत्यू कमी करणे, साथरोग व असंसर्गिक रुग्णाच्या सेवा आदी सेवा प्रामाणिकपणे बजावल्या आहेत. कणकवली तालुका आरोग्य अधिकारी म्हणून कार्यरत असताना त्यांना शासनाने पेंडूर ग्रामीण रुग्णालय येथे वैद्यकीय अधीक्षक म्हणून बढती केली आहे. त्यानिमित्त त्यांचा हा सत्कार करण्यात आला असून मालवण मधील शासकीय आरोग्य सेवा व जिल्हा परिषद आरोग्य सेवा समन्वय साधून परिणामकारक रित्या आरोग्य सेवा राबविण्याचा मानस यावेळी डॉ पोळ यांनी व्यक्त केला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा