You are currently viewing ग्राहकांनी नेहमी जागृत राहिले पाहिजे- श्री.प्रसंन्नजित चव्हाण

ग्राहकांनी नेहमी जागृत राहिले पाहिजे- श्री.प्रसंन्नजित चव्हाण

वैभववाडी

प्रत्येक व्यक्ती आपल्या गरजा भागवण्यासाठी वस्तू आणि सेवा खरेदी करीत असते. अशावेळी ग्राहक म्हणून आपण नेहमी आपल्या हक्काविषयी जागृत असले पाहिजे असे मत वैभववाडीचे तहसीलदार तथा उपजिल्हाधिकारी श्री.प्रसन्नजीत चव्हाण यांनी व्यक्त केले.
वैभववाडी तहसील कार्यालयात वैभववाडीचे तहसीलदार तथा उपजिल्हाधिकारी श्री. प्रसन्नजीत चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली “जागतिक ग्राहक हक्क दिन” कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी व्यासपीठावर ग्राहक पंचायत महाराष्ट्र संस्थेचे जिल्हाध्यक्ष व राज्य सदस्य प्रा.श्री.एस.एन. पाटील, सचिव श्री.संदेश तुळसणकर, तालुकाध्यक्ष श्री. कुमार स्वामी, वैभववाडी व्यापारी मंडळाचे अध्यक्ष श्री. रत्नाकर कदम व माजी अध्यक्ष व नगरसेवक श्री.मनोज सावंत उपस्थित होते.
दिनांक १५ मार्च हा ‘जागतिक ग्राहक हक्क दिन’ म्हणून साजरा केला जातो. परंतु १५ मार्च दरम्यान शासकीय- निमशासकीय कर्मचाऱ्यांच्या बेमुदत संपामुळे कार्यक्रम होऊ शकला नव्हता. आज गुरुवार दिनांक ६ एप्रिल रोजी वैभववाडीचे तहसीलदार श्री. प्रसन्नजीत चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली जागतिक ग्राहक हक्क दिन कार्यक्रम संपन्न झाला.
यावेळी अध्यक्ष स्थानावरून बोलताना ते म्हणाले, प्रत्येक व्यक्तीने ग्राहक भूमिका बजावत असताना सावध असले पाहिजे, आपली फसवणूक झाल्यास संबंधित यंत्रणा व ग्राहक पंचायतीशी संपर्क साधून न्याय मिळवला पाहिजे. अन्यथा तक्रार करून अन्यायाविरुद्ध आवाज उठवला पाहिजे. ग्राहक संरक्षण कायद्यानुसार निर्माण केलेल्या त्रिस्तरीय ग्राहक न्यायालयाच्या माध्यमातून न्याय मिळवता येतो.
ग्राहक केंद्रबिंदू मानून ग्राहक पंचायत महाराष्ट्र ही संस्था ग्राहकांचे संघटन, ग्राहकांचे प्रबोधन व ग्राहकांना योग्य मार्गदर्शन करण्याचे काम करीत आहे. या ग्राहक चळवळीला प्रशासन आणि समाजाचा पाठिंबा मिळत आहे. ग्राहक चळवळ ही लोक चळवळ झाली पाहिजे. यासाठी समाजातील सुशिक्षित व्यक्तींनी सभासद होवून या पवित्र कार्याला हातभार लावला पाहिजे असे जिल्हाध्यक्ष व राज्य सदस्य प्रा. श्री. एस. एन. पाटील यांनी मार्गदर्शन करताना सांगितले.
ग्राहक पंचायत महाराष्ट्र संस्था, आणि संस्थेचे कार्य तसेच संस्थेने तालुक्यात केलेल्या कार्याचा आढावा तालुकाध्यक्ष श्री.कुमार स्वामी यांनी सादर केला. आपली ग्राहक म्हणून झालेली फसवणूक आणि त्याविरुद्ध आवाज उठवून न्याय कसा मिळवला याबद्दल स्वअनुभव संदीप हांगे यांनी सांगितला. ग्राहक पंचायत महाराष्ट्र संस्थेच्या माध्यमातून सुरू असलेल्या कामाला सर्वांनी सहकार्य केले पाहिजे असे आवाहनही त्यांनी केले. वैभववाडीमध्ये काजू उत्पादक शेतकऱ्यांचा प्रश्न गंभीर बनला असून यामध्ये प्रशासनाने लक्ष घालून शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा, असे आवाहन व्यापारी मंडळाचे अध्यक्ष श्री. रत्नाकर कदम यांनी केले.
सुरुवातीला ग्राहक चळवळीचे अधिष्ठान स्वामी विवेकानंद प्रतिमा पूजन व दिप प्रज्वलन करण्यात आले. वैभववाडीचे तहसीलदार तथा उपजिल्हाधिकारी श्री. प्रसन्नजीत चव्हाण यांचा ग्राहक पंचायत महाराष्ट्र संस्थेच्या वतीने शाल, श्रीफळ व सामाजिक चातुर्मास संदर्भग्रंथ देऊन सत्कार करण्यात आला. कै.अरुण भार्गवे स्मृती प्रित्यर्थ दिला जाणारा कोकण विभागाचा पहिला ग्राहकतीर्थ बिंदुमाधव जोशी उत्कृष्ट कार्यकर्ता पुरस्कार-२०२२ वैभववाडी येथील ग्राहक चळवळीचे ज्येष्ठ कार्यकर्ते श्री. एस.पी.परब यांना देऊन गौरविण्यात आले.
आपल्या समाजात अनेक गोरगरीब माणसांना पैशापेक्षा इतर मदतीची गरज आहे. ग्राहक पंचायतीच्या माध्यमातून हे काम करीत आहे. या कामाची दखल घेऊन मला पुरस्कार देऊन सन्मानित केल्याबद्दल संस्थेचे आभार आणि ऋण व्यक्त करतो असे एस.पी‌.परब यांनी सांगितले.
या कार्यक्रमाला तहसीलदार कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी, व्यापारी मंडळाचे प्रतिनिधी, शेतकरी संघाचे मॅनेजर श्री.पाटील, ग्राहक पंचायत महाराष्ट्र संस्थेचे तालुका उपाध्यक्ष श्री.इंद्रजीत परबते, संघटक श्री.जयवंत पळसुले, सदस्य श्री.तेजस आंबेकर पदाधिकारी, पत्रकार व ग्राहक उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुका पुरवठा अधिकारी श्री. रामेश्वर दांडगे यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन संस्थेचे जिल्हा सचिव संदेश तुळसणकर यांनी केले. या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. एस.पी.परब यांनी केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा