You are currently viewing कोंडये – फोंडाघाट रस्त्याचे काम पावसाळ्यापूर्वी न झाल्यास आंदोलन

कोंडये – फोंडाघाट रस्त्याचे काम पावसाळ्यापूर्वी न झाल्यास आंदोलन

कणकवली

कणकवली तालुक्यातील फोंडाघाट ते कोंडये रस्त्याची अवस्था अतिशय दयनीय झाली असून या रस्त्याच्या कामाला पंतप्रधान सडक योजनेतून मंजुरी मिळाली आहे. हे काम येणाऱ्या पावसाळ्यापूर्वी न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा कोंडये गावातील ग्रामस्थांनी कार्यकारी अभियंता. यांना दिला आहे.

कोंडये गावचे माजी सरपंच अनिल मेस्त्री,भारतीय सेनेतील सेवानिवृत्त अधिकारी दिनकर परब, सामाजिक कार्यकर्ते तुकाराम तेली, अनिल कामतेकर व ग्रामस्थांनी कुडाळ येथील कार्यालयात पंतप्रधान सडक योजनेची अंमलबजावणी करणाऱ्या महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्थेचे कार्यकारी अभियंता श्री बामणे यांची भेट घेतली आणि निवेदन सादर केले. यावेळी या रस्त्याबाबत चर्चाही केली. या निवेदनात म्हटले आहे की, फोंडाघाट कोंडये करूळ जाणाऱ्या रस्त्याची दुरावस्था झाली आहे. गेली तीन-चार वर्षे कोंडये गावातील ग्रामस्थ रिक्षाचालक व इतर वाहनधारकांना या रस्त्यावरून प्रवास करणे कठीण बनले आहे. या रस्त्याच्या कामाला पंतप्रधान सडक योजनेतून मंजुरी मिळाली आहे. हे काम येणाऱ्या पावसाळ्यापूर्वी होणे आवश्यक आहे. हे काम पावसाळ्यापूर्वी झाले नाही तर या रस्त्यावरून चालणे ही कठीण होऊन जाईल. कोंडये गावातील लोकांना फोंडाघाट येथे जाणे मुश्किल होईल. त्यामुळे हा रस्ता पावसाळ्यापूर्वी पूर्ण व्हावा अन्यथा आंदोलन छेडावे लागेल असा इशारा यावेळी ग्रामस्थांनी अधिकाऱ्यांना दिला .

यावेळी कार्यकारी अभियंता श्री बामणे यांनी या रस्त्याचे कामाची निविदा प्रक्रिया लवकरात लवकर सुरू करण्यात येईल असे आश्वासन दिले.त्याशिवाय कोंडये झिरो पॉईंट ते तेलीवाडी जाणाऱ्या रस्ता ही खराब झाला आहे तसेच कोंडये झिरो पॉईंट ते सावंतवाडी कडे जाणारा रस्ता देखील खराब झाला असून तोही नूतनीकरण करण्याबाबत चर्चा झाली.

प्रतिक्रिया व्यक्त करा