कार्यकारी अभियंता रोहित कोरे यांचे लेखी आश्वासन
बांदा
बांदा शाखा कालव्यातून रोणापाल पर्यंत ३१ मार्चपर्यंत पाणी न आल्याने दशक्रोशीतील ग्रामस्थांनी आज चराठे येथील जलसंपदा कार्यालयात धडक दिली. संबंधित विभाग वारंवार दिशाभूल करीत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. गळफास आंदोलन इशार्याच्या पार्श्वभूमीवर सावंतवाडी पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडे यांच्या नेतृत्वाखाली मोठा पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला होता. येत्या ५ दिवसात पाणी रोणापाल पर्यंत निश्चितपणे पोचेल असे कार्यकारी अभियंता रोहित कोरे यांनी सांगितले. अन्यथा ६ एप्रिल रोजी आपल्या कार्यालयात गळफास घेऊ असा इशारा निगुडे सरपंच लक्ष्मण निगुडकर यांनी दिला.
मडुरा दशक्रोशीतील गावांना सध्या पाणी टंचाईचे दुर्भिक्ष जाणवू लागले आहे. रब्बी पीके पाण्याअभावी मरुन जाण्याची भीती आहे. तिलारी कालव्याचे पाणी रोणापाल पर्यंत आल्यास दशक्रोशीतील गावांना त्याचा फायदा होणार आहे. विभागाच्या आश्वासना प्रमाणे ३१ मार्चपर्यंत पाणी न आल्याने आज गळफास आंदोलनासाठी ग्रामस्थ चराठे कार्यालयात दाखल झाले होते.
यावेळी अभियंता रोहित कोरे यांनी वस्तुस्थितीची माहिती दिली. बांदा शाखा कालव्यातून ४५०० लीटर प्रति सेकंद पाण्याचा विसर्ग सुरु आहे. गोव्यात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर असल्याने पाण्याचा विसर्ग कमी होता. आता तो वाढविण्यात आला आहे. आज ओटवणे पर्यंत पाणी पोचले आहे. त्यामुळे येत्या चार दिवसात रोणापाल पर्यंत नक्की पाणी येईल. स्थानिकांच्या मागणीनुसार तेथील नाल्यांनाही पाणी सोडण्यात येईल असे स्पष्ट केले.
पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडे यांनीही याप्रकरणी हस्तक्षेप करीत पोलीस प्रशासनाकडून पाण्यासाठी पाठपुरावा करण्याचे अभिवचन दिले. यावेळी रोणापाल माजी सरपंच सुरेश गावडे, माजी उपसभापती कृष्णा सावंत, कास सरपंच प्रवीण पंडीत, निगुडे सरपंच लक्ष्मण निगुडकर, संघर्ष समिती अध्यक्ष जगन्नाथ पंडीत, माजी ग्रा. पं. सदस्य प्रकाश वालावलकर, रोणापाल ग्रा. पं. सदस्य योगेश केणी, निगुडे माजी सरपंच समीर गावडे, मोहन गवस, विलास पावसकर, मडुरा सोसायटी संचालक उदय देऊलकर, आत्माराम गावडे, सदाशिव गाड, अरुण पंडीत, सुधीर नाईक, वसंत जाधव, संजू चौकेकर उपस्थित होते.
कार्यकारी अभियंता रोहित कोरे यांनी स्थानिकांच्या मागणीनुसार तसे आश्वासनाचे पत्र सुरेश गावडे यांना प्रदान केले. त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.