रंगमंचावरील बंधूंची जोडी…खंडू व संभू गुंजाळ
रंगमंचावरील बंधूंची जोडी...खंडू व संभू गुंजाळ - आशिष सावंत, मनोज गुंजाळ

रंगमंचावरील बंधूंची जोडी…खंडू व संभू गुंजाळ

रंगमंचावरील बंधूंची जोडी…खंडू व संभू गुंजाळ – आशिष सावंत, मनोज गुंजाळ.

शिवापूरच्या मातीत कलाकारच जन्माला येतो. हे खूप वर्षांपूर्वीच सिद्ध झालंय. पण सगळेच कलाकार रंगमंचाची सेवा करतात असं नाही. परंतु काही कलाकार रंगमंचासाठी आणि समाजासाठीच जन्म घेतात हे मात्र खरं! आपल्या गावातील अशा अग्रगण्य कलालकरांपैकी पाठीला पाठ लावून आलेले दोन भाऊ म्हणजेच खंडोजी गुंजाळ आणि संभाजी गुंजाळ. नावं जरी खंडोजी आणि संभाजी असली तरी खंडू आणि संभू याच नावाने लोक त्यांना ओळखत असत.
नाटक ही यांची खास ओळख! संक्रांती , शिमगा , पाडवा, शिवजयंती , म्हाई अशा या ना त्या निमित्ताने गावात नाट्यप्रयोग होत असत. कित्येकजण यात भाग घेत. खंडू -संभूंची जोडी यात अग्रगणी असायची. डफ ,ढोल यासारखी वाद्ये घरच्याघरी तयार करुन शिमग्यात घाटमाथ्यापासून खेळ करण्यात ही माणसे वाकबगार होती. ‘कलीचा संचार’ सारख्या पंचक्रोशीत गाजलेल्या नाटकांत दोन्ही भावांनी अप्रतिम भूमिका वटवल्या होत्या. गावचे गावकार म्हणून एकवीस वर्षे यांनी सेवा बजावली.
आमच्या नशीबाने संभू गुंजाळांचा सहवास आम्हाला लाभला. गावच्या सर्व कार्यात सदैव पुढे असलेले त्यांना पाहता आले. म्हाईचं जेवण असो वा नाटकवाल्यांचं…. सर्व भांडीकुंडी आवरुन घेईपर्यंत कोणतही काम करायला ते लाजायचे नाहीत. शिमग्यात श्री.वसंत सावंत हे राधा आणि संभूमामा कृष्णा….ही जोडी प्रत्येकाच्या अंगणात धम्माल उडवून द्यायची. त्यांना नाचायला अंगण पुरायचे नाही इतके ते त्या सोंगांमध्ये तल्लीन होऊन जायचे. नाटकाचे कपडे आणणे ते पोहोचवणे या कामात तर संभूमामांचा हात धरणारा कोणीच नव्हता. संभूमामा मूलात मूल होऊन वावरलेले मी पाहीले आहेत.
दोघांच्याही घरची परिस्थिती बेताचीच. पण घरच्या संसाराआधी गावचा संसार महत्त्वाचा हेच त्यांनी मानलं. तसेच ते वागले. १९८९साली खंडूमामांचं निधन झालं. आधीपासूनच गावच्या कार्यात पुढे असणारे संभूमामा त्यानंतर अधिकच सक्रीय झाले. त्यांचा कामाचा जोश आणि काम पूर्ण करण्याचा हातखंडा अतुलनीय होता. गावचं काम चांगलंच झालं पाहीजे हा त्यांचा आग्रह असायचा. कोणतही वाकडं काम त्यांना कधी सहन झालंच नाही. संभूमामांची शेवटची काही वर्षे आजारपणात गेली.त्यांचं २००० साली माणगाव येथे निधन झाले.
आपल्या गावात अनेक हिरे निपजले. परंतु ह्या दोन हिय्रांनी प्रकाशमान होऊन संपूर्ण गावाला दीपवून टाकलं. या दोघाही बंधूंच्या पवित्र स्मृतीस लाख वेळा अभिवादन…..!

प्रतिक्रिया व्यक्त करा