You are currently viewing दिल्ली कॅपिटल्स अंतिम फेरीत पोहोचणारा पहिला संघ ठरला; मुंबई आणि उत्तर प्रदेश एलिमिनेटरमध्ये भिडणार

दिल्ली कॅपिटल्स अंतिम फेरीत पोहोचणारा पहिला संघ ठरला; मुंबई आणि उत्तर प्रदेश एलिमिनेटरमध्ये भिडणार

*दिल्ली कॅपिटल्स अंतिम फेरीत पोहोचणारा पहिला संघ ठरला; मुंबई आणि उत्तर प्रदेश एलिमिनेटरमध्ये भिडणार*

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) :

महिला प्रीमियर लीगच्या २० व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने यूपी वॉरियर्सचा पाच गडी राखून पराभव केला. या विजयासह दिल्ली संघाने अंतिम फेरीत धडक मारली. त्यांनी गुणतक्त्यात अव्वल स्थान पटकावले. मंगळवारी (२१ मार्च) दिल्लीची कर्णधार मेग लैनिंगने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यूपी वॉरियर्स संघाने २० षटकांत ६ बाद १३८ धावा केल्या. प्रत्युत्तरात दिल्लीने १७.५ षटकांत १४२ धावा करत सामना जिंकला.

दिल्ली कॅपिटल्सला अव्वल स्थानावर राहण्याचा फायदा होईल. त्यांना एलिमिनेटर सामन्यात खेळावे लागणार नाही. २६ मार्च रोजी ब्रेबॉर्न स्टेडियमवर अंतिम सामना खेळवला जाईल. त्याच वेळी, दुसऱ्या स्थानावर असलेल्या मुंबई इंडियन्स आणि तिसऱ्या स्थानावर असलेल्या यूपी वॉरियर्स यांच्यातील एलिमिनेटर सामना २४ मार्च रोजी डीवाय पाटील स्टेडियमवर खेळवला जाईल.

धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना दिल्लीची सुरुवात चांगली झाली. कर्णधार मेग लैनिंग आणि शफाली वर्मा यांनी पहिल्या विकेटसाठी ४.५ षटकांत ५६ धावा जोडून विजयाचा पाया रचला. शफाली १६ चेंडूत २१ धावा करून बाद झाली. जेमिमा रोड्रिग्सला केवळ तीन धावा करता आल्या. कर्णधार मेग लैनिंग २३ चेंडूत ३९ धावा करून तंबूमध्ये परतली. दिल्लीच्या तीन विकेट ७० धावांत पडल्या. तीन विकेट पडल्यानंतर सामना रंगेल असे वाटत होते, पण मरिजान कैप आणि एलिस कैप्सीने डाव सांभाळला. दोघींनी चौथ्या विकेटसाठी ६० धावांची भागीदारी केली. एलिस कैप्सी ३१ चेंडूत ३४ धावा करून बाद झाली. जेस जोनासेनला खातेही उघडता आले नाही. मरिजान कैपने ३४ धावा केल्या आणि अरुंधती रेड्डी खाते न उघडता नाबाद राहिली.

यूपीबद्दल बोलायचे झाले तर ताहलिया मैक्ग्राने तिच्या संघासाठी तुफानी खेळी खेळली. तीने ३२ चेंडूत नाबाद ५८ धावा करत संघाला सन्मानजनक धावसंख्येपर्यंत नेले. ताहलिया मैक्ग्राने आपल्या खेळीत आठ चौकार आणि दोन षटकार मारले. त्यांच्याशिवाय एलिसा हिलीने ३६, श्वेता सहरावतने १९ आणि सिमरन शेखने ११ धावा केल्या. दीप्ती शर्माने तीन तर किरण नवगिरेने केवळ दोन धावा केल्या. सोफी एक्लेस्टोन खाते न उघडताच बाद झाली. अंजली सरवानी तीन धावा करून नाबाद राहिली. दिल्ली कॅपिटल्सकडून एलिस कैप्सीने तीन विकेट घेतल्या. राधाने दोन आणि जेस जोनासेनने एक विकेट घेतली.

एलिस कैप्सीला सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले. तिने गोलंदाजी करताना ३ विकेट २६ धावांत घेतल्या होत्या तर फलंदाजी करताना ३१ चेंडूंत ३४ धावा काढल्या होत्या.

प्रतिक्रिया व्यक्त करा

14 − 8 =