You are currently viewing मानसिक आरोग्य व तणावमुक्तीसाठी “वर्दीचे मनःस्वास्थ्य” कार्यशाळा उपयुक्त – जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी

मानसिक आरोग्य व तणावमुक्तीसाठी “वर्दीचे मनःस्वास्थ्य” कार्यशाळा उपयुक्त – जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी

सिंधुदुर्गनगरी

ताण तणाव कमी करुन जगण्याची कला आत्मसात करण्यासाठी आणि अधिक कार्यक्षमतेने काम करण्यासाठी वर्दीचे मनःस्वास्थ्य सारख्या कार्यशाळा अत्यंत उपयुक्त ठरतात, असे मार्गदर्शन जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी केले.

जिल्हा पोलीस दल, बॅ. नाथ पै फौंडेशन फॉर कोकण डेव्हलपमेंट आणि बॅ. नाथ पै कॉलेज ऑफ फिजिओथेरपी, कुडाळ यांच्या संयुक्त विद्यमाने “वर्दीचे मनःस्वास्थ्य” या कार्यशाळेचे आयोजन येथील पत्रकार भवनात करण्यात आले होते. या कार्यशाळेचे उदघाटन जिल्हाधिकारी के .मंजुलक्ष्मी यांच्या हस्ते आणि पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल व बॅ.नाथ पै फौंडेशन च्या संस्थापक अध्यक्ष आदिती पै यांच्या उपस्थितीत झाले.
जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी म्हणाल्या, शासकीय अधिकारी कर्मचारी यांना दैनंदिन काम करीत असताना बऱ्याच अडचणी तसेच ताण तणावाला सामोरे जावे लागते. अशा प्रकारच्या कार्यशाळा आयोजित केल्याने त्यांचे निराकरण होऊन जगण्याची कला आत्मसात करता येईल व अधिक कार्यक्षमतेने काम करणे सहजसोपे होईल.
पोलीस अधीक्षक श्री. अग्रवाल म्हणाले, पोलीस दलातील अधिकारी अंमलदार यांना दैनंदिन कामकाज करत असताना, खूप मोठ्या प्रमाणात शारीरिक, मानसिक तसेच कौटुंबिक समस्यांना सामोरे जावे लागते. या समस्या सोडवण्यासाठी बॅ. नाथ पै फाऊंडेशन सारख्या संस्थांचे खूप मोठे योगदान आहे. ही कार्यशाळा आयोजित केल्याबद्दल त्यांनी आभार व्यक्त केले. या कार्यशाळेमध्ये तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून पुणे येथील एम इ एस व्यक्तिमत्व विकास केंद्राच्या मुख्य संयोजक गिरीजा लिखिते, मानसोपचार तज्ज्ञ शुभा कुलकर्णी, सुरेखा नंदे, पियुषा सामंत यांनी पोलीस दलातील अधिकारी अंमलदार यांना येणाऱ्या शारीरिक समस्या तसेच मानसिक ताण-तणाव यांचे निराकरण कसे करायचे याबाबत मार्गदर्शन केले.
दिवसभर चाललेल्या या कार्यशाळेत २१० पोलीस अधिकारी व अंमलदार सहभागी झाले होते .

प्रतिक्रिया व्यक्त करा