You are currently viewing पदर…

पदर…

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रा. सौ.सुमती पवार लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*पदर …*

 

असा पदर पदर लेकराला घाले वारा

असा पदर पदर घरादाराचा तो थारा..

 

खानदानी पदराने वाढे घरट्याची शानं

ढळताच पदर हा उठे वावटळं रानं…

 

पदराच्या सावलीत घरदार सामावते

घसरताच पदर चूड घराला लागते…

 

नाही ढळत हो कधी नाही येऊ देत बाधा

कुणी असू दे फाटकी कुणी असू देत राधा..

 

नवखणी माडीची ती असू देत झोपडीत

नाही सुटत हो तिला ना ती चुके रीतभात…

 

घाली पाठीशी ती घर ऊन वारा ना लागतो

ती आहे ना घरात जो तो मग घाबरतो…

 

तीने खोचता पदर पाचावरती धारण

मग असू दे पुढ्यात भले किती मोठे रण..

 

ती तो पुरून उरते पदराला पुसे घाम

करे चुंबळ पदर आणि कमवून दाम..

 

पदराची ती धम्मक पळे तोंडाचे ते पाणी

गेली होऊन ती येसू तारा बाई महाराणी..

 

जीजाऊच्या पदराने गाजविली ती सदर

किती सांगावी महती भरजरी तो पदर…

 

अहिल्येचा तो पदर नाव लौकिक अजून

खाणाखुणा ठाईठाई नाही झाली पहा जून …

 

आहे पदर अमर आहे पहा चिरंजीव

रामकृष्ण वाढले हो तोच पदराचा शेव…

 

 

प्रा.सौ.सुमती पवार नाशिक

(९७६३६०५६४२)

दि: १६ मार्च २०२३

वेळ : रात्री १०/४७

प्रतिक्रिया व्यक्त करा

11 + one =