जागृत राहाल तरच खाते सुरक्षित
दि.१५ मार्च जागतिक ग्राहक दिनानिमित्त ग्राहक पंचायतीने केले जागृतीचे आवाहन
वैभववाडी
ऑनलाईन व्यवहार काळाची गरज बनली असून त्याचे बरेच फायदे आहेत. तसेच त्याचे काही तोटे सुद्धा आहेत. दिनांक १५ मार्च हा “जागतिक ग्राहक दिन” म्हणून साजरा केला जातो. ग्राहक जागृती करणे हा याचा मुख्य उद्देश असतो. गेल्या काही दिवसांपासून ऑनलाईन व्यवहार करणाऱ्यांसाठी नवनवीन क्ल्युप्त्या शोधून ग्राहकांचे बँक खाते सहजपणे रिकामे करण्यात ऑनलाईन ठग यशस्वी होत आहेत. यावर प्रतिबंध घालण्याचा प्रयत्न सरकारी यंत्रणा करीत आहे. परंतु यामध्ये ग्राहक जेवढा जास्त जागृत राहिल तेवढे त्याचे बँक खाते सुरक्षित राहील, असे आवाहन ग्राहक पंचायत महाराष्ट्र-कोकण विभाग, सिंधुदुर्ग जिल्हा शाखेने केले आहे.
१५ मार्च हा दिवस “जागतिक ग्राहक दिन” म्हणून दरवर्षी साजरा करण्यात येतो. परंतु दिनांक १४ मार्चपासून शासकीय व निमशासकीय कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी पुकारलेल्या बेमुदत संपामुळे जागतिक ग्राहक दिन कार्यक्रम बऱ्याच ठिकाणी झालेला नाही. त्यामुळे संस्थेच्यावतीने ग्राहकांना ऑनलाईन व्यवहाराची दुसरी बाजू याबाबत माहिती देऊन जागृती करण्याचा हा एक प्रयत्न आहे.
आपण दैनंदिन व्यवहारात गडबडीत असतो आणि नेमकी हीच वेळ लुटारु साधतात. आणि काहीतरी योग्य कारण सांगून जसे आपले खाते असलेल्या बँकेतून मैनेजर बोलतोय, आपले केवायसी करायचे आहे, केवायसी न झाल्यास आपले खाते बंद होईल किंवा आपले एटीएम कार्ड बंद होईल इ. ग्राहकाने भीतीपाटी दिलेली माहिती किंवा ओटीपी दिला की बँक खाते रिकामे झाले असे निदर्शनास येते.
कोणतीही बँक आपल्या ग्राहकाला फोनवरून माहिती घेऊन कोणताही व्यवहार करीत नाही. त्यामुळे ग्राहकांनी अशा फसव्या फोन व मॅसेजकडे दुर्लक्ष करावे जेणेकरून त्यांचे बँक खाते सुरक्षित राहण्यास मदत होईल.
हॅकर्सनी एक नवीन शक्कल लढवून मॅसेज पाठवत आहेत. मॅसेज सोबत एक लिंक दिली जाते. त्यावर क्लिक करून माहिती भरल्यास ग्राहकाच्या खात्याची माहिती मिळते. त्यावर जास्तीची रक्कम दिसल्यास त्या खात्यातील रक्कम ऑनलाईनमध्ये फसवे कॉल करून आलेला ओटीपी घेऊन खाते साफ करण्यात हॅकर्स यशस्वी होत आहेत. पण ग्राहकांनी अशा कोणल्याही लिंकला फ्लिक न करता तो मेसेज आपल्या मोबाईलमधून डिलीट करावा, जेणे करून बँक खाते सुरक्षित राहील.
बैंक व्यवहार करताना ग्राहकांनी सावध राहूनच व्यवहार करावेत, हीच त्याची सुरक्षितता वाढवू शकते. व्यवहार कोणताही असो ओटोपी किंवा एटीएम पीन कधीही कोणास सांगू नये किंवा लिहूनही ठेवू नये. जेणेकरून बैंक खाते सुरक्षित राहण्यास मदत होईल.
दिल्ली पोलिसांच्या सायवर सेल आणि गृह मंत्रालयाने लोकांच्या मदतीसाठी एक हेल्पलाइन नंबर जारी केला आहे. कोणताही ऑनलाईन फ्रॉड झाल्यास या ठिकाणी तात्काळ तक्रार करता येते.
गृह मंत्रालय आणि दिल्ली पोलिसांची सायबर ओटीपी सेलने मिळून 155260 हेल्पलाईन सुरू केली आहे. जर ग्राहकासोबत कोणत्याही प्रकारचा ऑनलाईन फ्रॉड झाला असेल तर तात्काळ या नंबरवर तक्रार करा, असे आवाहन ग्राहक पंचायत महाराष्ट्र-कोकण विभाग, सिंधुदुर्ग जिल्हा शाखेच्यावतीने दि.१५ मार्च “जागतिक ग्राहक दिना”च्या निमित्ताने करण्यात आले आहे.