You are currently viewing ज्येष्ठ अभिनेते समीर खक्कर यांचे निधन

ज्येष्ठ अभिनेते समीर खक्कर यांचे निधन

*’नुक्कड’ मालिकेतील खोपडी ही व्यक्तिरेखा अजरामर केली*

 

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) :

दूरदर्शनवरील गाजलेली मालिका ‘नुक्कड’ मध्ये खोपडी ही व्यक्तिरेखा अजरामर करणारे ज्येष्ठ अभिनेते समीर खक्कर यांचे बुधवारी निधन झाले आहे. ते ७१ वर्षांचे होते. त्यांच्या निधनाने मनोरंजनसृष्टीत शोककळा पसरली आहे. खक्कर यांनी त्यांच्या कारकीर्दीत अनेक चित्रपट आणि मालिकांमध्ये काम केले होते, पण ते ‘नुक्कड’ या टीव्ही मालिकेतील खोपडी या भूमिकेसाठी विशेष ओळखले जायचे.

समीर खक्कर ३८ वर्षांपासून अभिनय क्षेत्रात काम करत होते. गणेश खक्कर यांनी सांगितल्यानुसार, मंगळवारी त्यांना श्वास घेण्यास त्रास होत होता. त्यानंतर ते बेशुद्ध पडले. तातडीने डॉक्टरांना बोलावण्यात आले. डॉक्टरांनी त्यांना आयसीयूमध्ये दाखल करण्यास सांगितले. यानंतर त्यांना लघवीचा त्रास होऊ लागला. त्यांचा शेवटचा काळ बेशुद्धावस्थेत गेला. लघवीचा त्रास झाल्याने त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवले, पण नंतर त्यांचे हृदय बंद पडले. शरीरातील अनेक अवयव निकामी झाल्याने त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

१९८७ मध्ये आलेल्या जबाब हम देंगे या चित्रपटातून त्यांनी करिअरला सुरुवात केली. याशिवाय पुष्पक, मेरा शिकार, शहंशाह, गुरु, नफरत की आंधी, परिंदा, पुष्पक, राजा बाबू, रिटर्न ऑफ ज्वेल थिफ, जय हो अशा अनेक चित्रपटांमधून त्यांनी आपल्या उत्कृष्ट अभिनयाने प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे.

‘नुक्कड’ मालिके व्यतिरिक्त मनोरंजन, सर्कस, नया नुक्कड, श्रीमान श्रीमती, बंदिनी, अदालत, संजीवनी ह्या मालिकांमधून आपल्या पात्रांना न्याय दिला.

समीर खक्करने अनेक चित्रपटांमध्ये आपल्या व्यक्तिरेखांनी प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. काही काळानंतर ते चित्रपटसृष्टी सोडून अमेरिकेत गेले. तथापि, अमेरिकेतून परतल्यानंतर, त्यांनी पुन्हा इंडस्ट्रीत प्रवेश केला आणि चित्रपटांव्यतिरिक्त अदालत आणि संजीवनी सारख्या टीव्ही मालिकांमध्ये दिसले. याशिवाय ते झी५च्या सनफ्लावर या वेब सीरिजमध्येही दिसले होते. २०२० मध्ये नवाजुद्दीनच्या ‘सिरीयस मॅन’ या चित्रपटात राजकारण्याची भूमिका साकारून त्यांनी बरीच प्रशंसाही मिळवली. ह्या वर्षी प्राईम व्हिडिओच्या फर्जी मधून त्यांनी शेवटी अभिनय केला होता.

प्रतिक्रिया व्यक्त करा

20 − 4 =