You are currently viewing १५ महिन्यांनंतर भारतात कसोटी सामना अनिर्णित* *बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी सलग चौथ्यांदा टीम इंडियाच्या नावावर

१५ महिन्यांनंतर भारतात कसोटी सामना अनिर्णित* *बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी सलग चौथ्यांदा टीम इंडियाच्या नावावर

*१५ महिन्यांनंतर भारतात कसोटी सामना अनिर्णित* *बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी सलग चौथ्यांदा टीम इंडियाच्या नावावर*

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चार सामन्यांच्या कसोटी मालिकेतील चौथा सामना अनिर्णित राहिला आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात ४८० धावा केल्या. प्रत्युत्तरात टीम इंडियाचा पहिला डाव ५७१ धावांवर आटोपला. ऑस्ट्रेलियाने सामना संपेपर्यंत २ बाद १७५ धावा केल्या होत्या. यानंतर दोन्ही कर्णधारांनी सामना ड्रॉ करण्याचा निर्णय घेतला.

भारतात १५ महिन्यांनंतर कसोटी अनिर्णित राहिली आहे. यापूर्वी नोव्हेंबर २०२१ मध्ये भारत आणि न्यूझीलंड यांच्यात कसोटी अनिर्णित राहिली होती. ग्रीन पार्क, कानपूर येथे हा सामना झाला. तेव्हापासून आतापर्यंत टीम इंडियाने १२ कसोटी सामने खेळले असून एकच सामना अनिर्णित राहिला आहे. यादरम्यान टीम इंडियाने आठ कसोटी जिंकल्या आणि तीनमध्ये पराभवाचा सामना केला. भारताने ही कसोटी मालिका २-१ अशी आपल्या नावे केली. टीम इंडियाने नागपुरातील पहिली कसोटी एक डाव आणि १३२ धावांनी आणि दुसरी कसोटी सहा विकेट्सने जिंकली. तिसऱ्या कसोटीत ऑस्ट्रेलियाने नऊ विकेट्स राखून विजय मिळवला होता.

या कसोटी मालिकेतील विजयासह भारताने बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीही जिंकली. यावर्षी बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी जिंकण्यासोबतच टीम इंडियाने इतिहासही रचला आहे. भारताने सलग चौथ्यांदा बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीवर कब्जा केला. बॉर्डर गावस्कर ट्रॉफी मालिका भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात जवळपास २६ वर्षांपासून खेळली जात आहे, मात्र सलग चौथ्यांदा एखाद्या संघाने या ट्रॉफीवर कब्जा करण्याची ही पहिलीच वेळ आहे. १९९६ मध्ये बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीची सुरुवात झाली, त्यापूर्वी भारत-ऑस्ट्रेलिया कसोटी मालिका या नावाने खेळली जात होती.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात आतापर्यंत बॉर्डर-गावस्कर मालिका १६ वेळा खेळली गेली आहे. यापैकी ११ वेळा टीम इंडियाने ही ट्रॉफी ताब्यात घेतली आहे. भारताने ही ट्रॉफी १९९६/९७, १९९७/९८, २०००/०१, २००३/०४, २००८/०९, २०१०/११, २०१२/१३, २०१६/१७, २०१८/१९, २०२०/२१ आणि २०२३ मध्ये जिंकली. त्याचबरोबर ऑस्ट्रेलियाने ही ट्रॉफी पाच वेळा जिंकली आहे. त्यांनी ही ट्रॉफी १९९९/००, २००४/०५, २००७/०८, २०११/१२, २०१४/१५ मध्ये जिंकली. दोन्ही संघांमध्ये एकूण २८ कसोटी मालिका खेळल्या गेल्या आहेत. यापैकी ऑस्ट्रेलियाने १२ मालिका जिंकल्या आहेत, तर टीम इंडियाने ११ मालिका जिंकल्या आहेत. पाच मालिका अनिर्णित राहिल्या आहेत.

चौथ्या कसोटीत ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात ४८० धावा केल्या होत्या. उस्मान ख्वाजाने १८० धावांची खेळी केली, तर कॅमेरून ग्रीनने ११४ धावा केल्या. या दोघांशिवाय ट्रॅव्हिस हेड ३२ धावा, मार्नस लॅबुशेन तीन धावा, कर्णधार स्टीव्ह स्मिथ ३८ धावा, पीटर हँड्सकॉम्ब १७ धावा, अॅलेक्स कॅरी शून्य, मिचेल स्टार्क सहा धावा, नॅथन लियॉन ३४ धावा आणि टॉड मर्फी ४१ धावांवर बाद झाले. भारताकडून अश्विनने सहा विकेट घेतल्या. त्याचवेळी शमीला दोन, जडेजा आणि अक्षरला प्रत्येकी एक विकेट मिळाली.

भारताने पहिल्या डावात ५७१ धावा केल्या होत्या आणि ऑस्ट्रेलियावर ९१ धावांची आघाडी घेतली होती. टीम इंडियासाठी शुभमन गिलने १२८ आणि विराट कोहलीने १८६ धावांची शानदार खेळी केली. त्याचवेळी कर्णधार रोहित शर्मा ३५, चेतेश्वर पुजारा ४२, रवींद्र जडेजा २८, श्रीकर भारत ४४, अक्षर पटेल ७९ धावा, अश्विन सात धावा करून बाद झाला. उमेश यादवला खातेही उघडता आले नाही. रिटायर्ड दुखापतीमुळे श्रेयस अय्यर फलंदाजीसाठी मैदानात येऊ शकला नाही.

ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या डावात २ बाद १७५ धावा केल्या. मॅथ्यू कुहनेमन सहा धावा करून अश्विनच्या गोलंदाजीवर बाद झाला. यानंतर ट्रॅव्हिस हेडला अक्षर पटेलने ९० धावांवर क्लीन बोल्ड केले. मार्नस लबुशेन ६३ आणि स्टीव्ह स्मिथ १० धावा करून नाबाद राहिले. यानंतर दोन्ही संघांनी कसोटी अनिर्णित ठेवण्याचे मान्य केले.

न्यूझीलंडने श्रीलंकेला पराभूत केल्यामुळे भारत जागतिक कसोटी अजिंक्यपदाच्या अंतिम फेरीसाठी आधीच पात्र ठरला आहे. अशा स्थितीत ही कसोटी केवळ औपचारिकता ठरली. आता जागतिक कसोटी अजिंक्यपदाचा अंतिम सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात ७ ते ११ जून दरम्यान ओव्हल, लंडन येथे होणार आहे.

चौथ्ता कसोटी सामन्याच्या शेवटी अनेक मजेदार क्षण होते. सामन्याच्या पाचव्या दिवशी ऑस्ट्रेलियन संघ दुसऱ्या डावात फलंदाजी करत होता. या डावात ७६ षटकांपर्यंत कर्णधार रोहित शर्माने आपल्या प्रमुख गोलंदाजांसह गोलंदाजी केली. यानंतर त्याने ७७व्या षटकात शुभमन गिलला गोलंदाजीसाठी पाचारण केले. रोहित इथेच थांबला नाही. शुभमननंतर त्याने चेतेश्वर पुजारालाही गोलंदाजी दिली. पुढच्या षटकात तो शुभमनकडून पुन्हा गोलंदाजी करवून घेत होता. या षटकाच्या एका चेंडूनंतर ऑस्ट्रेलियाचे फलंदाज मार्नस लॅबुशेन आणि कर्णधार स्टीव्ह स्मिथ या दोघांनीही भारतीय कर्णधार रोहितशी बोलून सामना ड्रॉ करण्याचा निर्णय घेतला. पुजारा आणि शुभमन गोलंदाजीला आले तेव्हा लबुशेन आणि स्मिथ हसत होते.

अश्विनने रोहितच्या पुजारा-गिलला गोलंदाजी करायला लावली या निर्णयाचा गमतिुदार समाचार घेतला. त्याने ट्विट करून लिहिले- मी काय करू? नोकरी सोडू यानंतर त्याने हसणारा इमोजी टाकला आहे. पुजाराने सामन्यात लेगस्पिन गोलंदाजी केली. याआधीही त्याने २०१५ मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध एकदा गोलंदाजी केली होती. त्यावेळी त्याने एकही विकेट न घेता दोन धावा दिल्या होत्या. या सामन्यात पुजाराने एका षटकात एक धाव दिली, तर शुभमनने १.१ षटक टाकून एक धाव दिली. शुभमन क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच गोलंदाजी केली. मात्र, पुजाराने कौंटी चॅम्पियनशिपमध्ये ससेक्ससाठी अनेकदा गोलंदाजी केली आहे.

सोमवारची (१३ मार्च) सकाळ भारतासाठी दोन मोठ्या आनंदी वार्ता घेऊन आली. एकीकडे भारताने ऑस्करमध्ये दोन पुरस्कार जिंकले आणि दुसरीकडे भारतीय क्रिकेट संघाने जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत स्थान निश्चित केले. ऑस्करमध्ये पुरस्कार मिळाल्यानंतर ज्युनियर एनटीआर आणि रामचरण यांच्या ‘आरआरआर’ या चित्रपटासोबतच ‘नाटू-नाटू’ गाण्याची सर्वत्र चर्चा होत आहे.

भारताचे माजी फलंदाज सुनील गावस्कर यांचा या गाण्यावरील डान्सचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. आता रविचंद्रन अश्विन आणि रवींद्र जडेजा हे देखील ज्युनियर एनटीआर आणि रामचरण बनले आहेत. दोघांनी त्यांचे गाणे रिक्रिएट केले आहे. यासोबतच अक्षर कुमारच्या ‘हेरा फेरी’ चित्रपटातील डायलॉगही कॉपी करण्यात आला आहे. अश्विनने इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये तो जडेजासोबत हेरा फेरी या चित्रपटातील एक प्रसिद्ध मजेदार दृश्य पुन्हा तयार करताना दिसत आहे. यानंतर दोघेही उठतात आणि पार्श्वभूमीवर ‘नाटू-नाटू’ गाणे ऐकू येते.

त्याच्या कॅप्शनमध्ये अश्विनने लिहिले – आणि ऑस्कर जातो… व्हिडिओचे श्रेय सोहम देसाईला जाते. माझ्या रीलचा तो अविभाज्य भाग आहे. हार्दिक पंड्यानेही या रीलवर टिप्पणी केली आणि हसणारा इमोजी शेअर केला. तत्पूर्वी, बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीच्या चौथ्या कसोटीच्या पाचव्या दिवसाचा खेळ सुरू होण्यापूर्वी संपूर्ण संघ ऑस्करमध्ये नाटू-नाटूच्या विजयाचा आनंद साजरा करत होता. गावस्कर म्हणाले, मला खूप आनंद झाला की हे घडले. संपूर्ण ‘आरआरआर’ टीमचे अभिनंदन. ज्यांनी हे गाणे तयार केले त्यांचे अभिनंदन. कलाकार उत्कृष्ट होते. मी चित्रपट पाहिला. तो एक उत्तम चित्रपट होता. त्यांना पुरस्कार मिळाल्याचा मला खूप आनंद आहे.

चौथ्या कसोटी सामन्यात टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू अक्षर पटेलने महत्त्वपूर्ण योगदान दिले. त्याने ७९ धावांची खेळी खेळली. याशिवाय त्याने दोन्ही डावात प्रत्येकी एक विकेट घेतली. अक्षरने कसोटी सामन्यात ५० बळी पूर्ण केले. कारकिर्दीतील १२व्या कसोटीत त्याने हा आकडा गाठला आहे. त्याने दुसऱ्या डावात ट्रॅव्हिस हेडला क्लीन बॉलिंग करून इतिहास रचला. अक्षर भारतासाठी सर्वात कमी चेंडूत ५० बळी घेणारा गोलंदाज ठरला. त्याने टीम इंडियाचा अनुभवी वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला मागे टाकले आहे. अक्षरने २२०५व्या चेंडूवर ५०वी विकेट घेतली. बुमराहने २४६५ चेंडूत ५० बळी घेतले होते.

अहमदाबाद कसोटीत भारतीय कर्णधार रोहित शर्माने भारताच्या पहिल्या डावात ३५ धावा केल्या. यासह त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १७,००० धावा पूर्ण केल्या. अशी कामगिरी करणारा तो जगातला २८वा आणि सातवा भारतीय खेळाडू आहे. रोहितपूर्वी सचिन तेंडुलकर, विराट कोहली, राहुल द्रविड, सौरव गांगुली, महेंद्रसिंग धोनी आणि वीरेंद्र सेहवाग यांनी हा पराक्रम केला आहे.

चेतेश्वर पुजाराने ४२ धावा केल्या आणि त्याने एक खास विक्रमही आपल्या नावावर केला. या सामन्यात पुजाराने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटीत २,००० धावा पूर्ण केल्या. अशी कामगिरी करणारा तो चौथा भारतीय खेळाडू आहे. त्याच्या आधी सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड आणि व्हीव्हीएस लक्ष्मण यांनी ही कामगिरी केली होती.

या सामन्यात शुभमन गिलने १२८ धावांची खेळी केली. त्याने सलग चौथ्या महिन्यात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शतक झळकावले आहे. गिलने डिसेंबरमध्ये बांगलादेशविरुद्ध ११०, श्रीलंकेविरुद्ध ११६ आणि जानेवारीत न्यूझीलंडविरुद्ध २०८, फेब्रुवारीमध्ये न्यूझीलंडविरुद्ध ११२ आणि मार्चमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध १२८ धावा केल्या.

विराट कोहलीचे कसोटी क्रिकेटमधील मागील शतक नोव्हेंबर २०१९ मध्ये बांगलादेशविरुद्ध झाले होते. यानंतर त्याला कसोटी क्रिकेटमध्ये शतकही करता आले नाही. आता त्याने २३ सामने आणि ४१ डावांनंतर कसोटी क्रिकेटमध्ये शतक झळकावले आहे. यापूर्वी, त्याला कसोटीतील दोन शतकांदरम्यान जास्तीत जास्त ११ डावांची प्रतीक्षा करावी लागली होती. ऑस्ट्रेलियाविरुद्धचे हे त्याचे १६ वे शतक आहे. त्याने कसोटी आणि वनडेमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध प्रत्येकी आठ शतके झळकावली आहेत. अहमदाबादमध्ये त्याने आपल्या कसोटी कारकिर्दीतील २८वे शतक झळकावले. त्याचे हे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील ७५वे शतक आहे. यासह तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके ठोकण्याच्या बाबतीत सचिन तेंडुलकरनंतर दुसऱ्या क्रमांकावर आला आहे. सचिनने भारतासाठी एकूण १०० शतके झळकावली होती. त्याचबरोबर विराटने आतापर्यंत ७५ शतके ठोकली आहेत. यापैकी २८ शतके कसोटीत, ४६ एकदिवसीय आणि एक टी२० मध्ये आहे.

विराट कोहलीला सामनावीर तर रवीचंद्रन अश्विनला मालिकावीर पुरस्काराने गौरविण्यात आले.

१७ मार्चपासून दोन्ही संघांमध्ये तीन सामन्यांची वनडे मालिका खेळवली जाणार आहे.

 

*संवाद मीडिया*

*🏟️कृष्णामाई बोअरवेल🏟️*

*💦 आमच्याकडे ४.५’ , ६’ आणि ६.५’ बोअरवेल खोदून मिळेल*

*💦 तसेच HDPE पाईप, ठिबक सिंचन, तुषार सिंचन व पंप सेट लगेच बसवून मिळतील.*

*💦 रस्त्यापासून ५०० फूट अंतरावर लांब गाडी लावून अडचणीच्या ठिकाणी देखील बोअरवेल खोदून मिळेल*

*📍 पत्ता : मुंबई गोवा महामार्गावर बिबवणे, तालुका कुडाळ, जि. सिंधुदुर्ग*

*🛑 प्रोप्रा. : आनंद रामदास*

📲 *संपर्क :*

*9422381263 / 7720842463*

प्रतिक्रिया व्यक्त करा

four × 1 =