खासगी रुग्णालयात उपचार सुरू; मदतीसाठी दानशुरांनी पुढे यावे, ग्रामस्थांची मदतीची हाक…
सावंतवाडी
कौटुंबिक परिस्थिती बेताची आणि त्यात दोन्ही पायाने अपंगत्व असलेल्या कुणकेरी येथील युवकाच्या दुचाकीला अपघात झाला आहे. यात त्याच्या दोन्ही पायाला गंभीर दुखापत झाली आहे. शासनाकडुन मिळालेल्या दुचाकीचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. चंद्रकांत भानुदास सावंत (वय ३८) असे त्याचे नाव असून त्यांच्यावर येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मात्र उपचारासाठी किमान ५० ते ६० हजाराचा खर्च असल्याने समाजातील दानशुरांनी पुढे यावे, असे आवाहन त्याच्या गावातील ग्रामस्थ नारायण सावंत व अन्य सहकार्यांनी केले आहे. अपघातात जखमी झालेल्या सावंत यांच्यावर शहरातील एका खासगी दवाखान्यात उपचार सुरू आहे.
ते आज आपले काम आटपून सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास सावंतवाडीहून कुणकेरी येथे जात असताना रस्त्यावर पडलेल्या काजूच्या झाडाच्या पानामुळे त्यांच्या दुचाकीचे ब्रेक लागले नाहीत आणि ती दुचाकी त्यांच्या पायावर कोसळली. त्याच ठिकाणी ते जायबंदी झाले. काही वेळाने त्याठिकाणावरुन आलेल्या ग्रामस्थांनी हा प्रकार पाहिला व त्यांना रिक्षात घालून खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्याची गरज असल्याचे वैद्यकीय अधिकार्यांचे म्हणणे आहे. त्यासाठी ५० ते ६० हजाराचा खर्च आहे. मात्र त्यांची घरची परिस्थिती अत्यंत बेताची असल्यामुळे आता उपचार कसे करावेत? असा प्रश्न त्यांच्या समोर पडला आहे. दरम्यान त्यासाठी दानशुरांनी पुढे यावे, असे आवाहन ग्रामस्थ नारायण सावंत यांनी केले आहे. श्री. सावंत यांची कौटुंबिक परिस्थिती बेताची आहे. वर्षभरापुर्वी त्यांच्या आईचे कॅन्सरने निधन झाले. त्यानंतर ते वडील व भाऊ असे तिघे घरात राहतात. सुतारकाम करून ते आपले कुटुंब चालवितात. मात्र अचानक अपघात झाल्यामुळे त्यांच्या कुंटुबावर आघात झाला आहे. तरी मदतीचा हात पुढे करणाऱ्यांनी चंद्रकांत भानुदास सावंत यांच्या 022400000025802, IFSC code- SIDC 0001022 या बँक खात्यात आपली मदत जमा करावी. तसेच अधिक माहितीसाठी या नंबरवर 9404451368 संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.