You are currently viewing सावंतवाडी येथील शिवसेना कार्यकर्ता मेळाव्यात नाम. दीपक केसरकरांच्या निशाण्यावर ठाकरे…!

सावंतवाडी येथील शिवसेना कार्यकर्ता मेळाव्यात नाम. दीपक केसरकरांच्या निशाण्यावर ठाकरे…!

*सावंतवाडी येथील शिवसेना कार्यकर्ता मेळाव्यात नाम. दीपक केसरकरांच्या निशाण्यावर ठाकरे…!*

शिवसेना पक्ष फुटीनंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि बाळासाहेबांची शिवसेना हा शिंदेगट अशी नावे मिळाल्यानंतरही अनेकांना दोन्ही गट एकत्र येतील अशी आशा वाटत होती. परंतु दोन्ही गटांमध्ये टोकाचा संघर्ष होऊन दोन वेगवेगळे पक्ष निर्माण झाले आणि सर्वात जास्त लोकप्रतिनिधी, शिवसैनिक सोबत असलेल्या शिंदे गटाला न्यायालयाने झुकते माप देत शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण निशाणी दिल्याने बाळासाहेबांची शिवसेना हा गट अधिकृत “शिवसेना पक्ष” म्हणून ओळखला जाऊ लागला. शिवसेना हे नाव अधिकृतपणे मिळाल्यानंतर आज सावंतवाडीत शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख रवींद्र फाटक आणि माजी खासदार ब्रिगेडियर सुधीर सावंत यांच्या उपस्थितीत सावंतवाडीचे नाम.दीपक केसरकर यांनी सावंतवाडीत शिवसेना कार्यकर्ता मेळावा घेतला. पक्षाचे अधिकृत नाव व चिन्ह मिळाल्यानंतर सिंधुदुर्गात शिवसेनेचा झालेला हा पहिलाच मेळावा होय…!
“आम्हाला हे गद्दार म्हणत आहेत. पण खरे गद्दार हे आहेत. कारण यांनी महाराष्ट्राच्या जनतेचा विश्वासघात केला आहे. आम्ही जनतेने दिलेल्या निर्णयाच्या बाजून उभे राहिलो आहोत.” असे म्हणत नाम.केसरकर यांनी उद्धव ठाकरे यांच्यावरच शिरसंधान साधले. महाराष्ट्राने भाजपा सेना युतीला विधानसभेत कौल देऊनही राष्ट्रवादी व काँग्रेस या दोन विरुद्ध विचारांच्या पक्षांसोबत महाविकास आघाडी करून उद्धव ठाकरे यांनी शिवसेना पक्ष राष्ट्रवादीच्या दावणीला बांधला. त्यामुळे गद्दारी जर कोणी केली असेल तर ती उद्धव ठाकरे यांनी केल्याचे सांगत उद्धव ठाकरेंना लक्ष्य केलं.
“खोक्याचा अर्थ काय… ?
आम्ही काय पैसे घेवून कुठे गेलोय. अहो, यांना पाहिजे त्यावेळी पैसे आम्ही पुरविले आहेत. मंत्रीपदाच्या पाच वर्षात सिंधुदुर्ग जिल्ह्याचा सगळा खर्च मी माझ्या प्रॉपर्टी विकून केलेला आहे. मग यांना आम्हाला गद्दार म्हणण्याचा काय अधिकार आहे ?”
असे प्रतिप्रश्न उपस्थित करत शिवसेना प्रवक्ते तथा शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्ला केला. त्यामुळे शिवसेना मंत्रीपदी असणाऱ्या मंत्र्यांकडून उद्धव ठाकरे हे मंत्रिपदाच्या बदल्यात मातोश्रीसाठी पैसे घेत असल्याचे सावंतवाडी येथील शिवसेना मेळाव्यात नाम.दीपक केसरकर यांनी स्पष्ट केले. त्याचबरोबर जिल्ह्यात शिवसेनेचे कार्य करण्यासाठी स्वतःच्या प्रॉपर्टी विकून पदरमोड केल्याचेही सांगितले.
“आजचा बदल महाराष्ट्राच्या हिताचा आहे. जगामध्ये कुठेही गेलात तरी गवगवा कोणाचा आहे…? पंतप्रधान मोदी यांचा…! रशिया युक्रेन यांचे युद्ध चालू आहे. यावर अमेरिकेचे राष्ट्रपती म्हणतात,”मोदी यांनी पुढाकार घेवून युद्ध संपवावे”. एवढा मोठा नेता ज्या देशाचा असतो. त्या देशाचा तो अभिमान असतो. आम्हाला सुद्धा आमच्या पंतप्रधान मोदी यांचा अभिमान आहे. मोदी यांनी चांगले काम करायचे. मात्र, संजय राऊत यांनी त्यांच्या विरोधात रोज काहीतरी लिहायचे, हे कोणालाच आवडले नव्हते”. असे सांगताना केसरकर यांनी उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदावर असताना भाजपासोबत आता केलेली युती महाराष्ट्राच्या हिताचीच असल्यावर ते ठाम राहिले. राष्ट्रवादी मधून शिवसेनेत आल्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या मंत्रीमंडळात केसरकर यांची शिवसेना नेते आणि राष्ट्रवादी पक्षाकडून हेटाळणी होत होती. अजित पवार कित्येकदा केसरकरांना अपमान करायचे. त्यामुळे केसरकर अपमान गिळून पक्षात कार्यरत होते. राष्ट्रवादी कडून होत असलेली पक्षाची अवहेलना पाहून केसरकरांसह अनेक आमदारांचे भाजप सोबत जावे असे मत होते. परंतु संजय राऊत अनेकदा मोदींवर टीका करायचे. उद्धव ठाकरेंनी भाजप सोबत गद्दारी केलेली कोणालाही पटली नसल्याने अस्वस्थ असलेले आमदार पक्ष सोडून वेगळा गट करून भाजप सोबत गेले आणि शिवसेना पक्ष फुटला.
“केलेल्या उपकाराची जाणिव नसलेली माणसे सत्तेवर होती. ती कोणाला विचारत नव्हती. मी काजू धोरण सादर केले. त्याला अन्य मंत्री मान्यता देण्यास सांगायचे. पण आमचे तत्कालीन मुख्यमंत्री हसायचे. त्यांना काजू धोरण म्हणजे काय ? माहित नव्हते. काजूचे झाड, काजूची बी, काजूचे बोंड म्हणजे काय माहित नाही”. असे सांगतानाच केसरकरांनी उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री असताना राष्ट्रवादीच्या किती अंमलाखाली होते याचे उदाहरण दिले. “माझे साडेचारशे कोटी अजित पवार यांनी काढून घेतले. त्यावेळी आदित्य ठाकरे हसत होते. त्याचा व्हिडिओ पूर्ण कोकणात दाखविला पाहिजे. कोकण कधीही अवहेलना सहन करणार नाही”… असे सांगत केसरकर यांनी राष्ट्रवादीचे अजित पवार व आदित्य ठाकरे यांच्यावर केसरकर यांनी थेट आरोप केले. त्यामुळे उद्धव ठाकरेंचे पुत्र आणि तत्कालीन पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे हे देखील कोकण बद्दल किती मागास विचार करायचे याचा दाखला दिला.
“शिवसेनेतून बाहेर पडलेला निवडून येत नाही म्हणून काय सांगता. नारायण राणे बाहेर पडले त्यावेळी त्यांच्यासोबत १२ आमदार गेले होते. त्यावेळी नारायण राणे व अकरा आमदार निवडून आले. दुसऱ्या माणसाचा आदर ठेवण्याची कोकणी संस्कृती आहे. म्हणून आम्ही तुमचा आदर ठेवत आहोत. परंतु तुम्ही सारखे आरोप करीत राहिलात तर आम्हाला सुद्धा तसेच वागावे लागेल”, असा गर्भित इशारा नाम. केसरकर यांनी उद्धव ठाकरे नेहमी गद्दार म्हणून हिणवून शिंदे गटावर आरोप करत असल्याने उद्धव ठाकरेंना दिला आहे. भविष्यात दोन्ही पक्षांमध्ये संघर्ष अटळ असल्याचेच आजच्या कार्यकर्ता मेळाव्यातील आरोप प्रत्यारोप मधून दिसून आले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

3 × three =