You are currently viewing जांभ्या दगडाच्या नावाखाली ‘बॉक्साइट सदृश्य’ गौण खनिजाची वाहतूक : स्थानिकांचा संशय

जांभ्या दगडाच्या नावाखाली ‘बॉक्साइट सदृश्य’ गौण खनिजाची वाहतूक : स्थानिकांचा संशय

जांभ्या दगडाच्या नावाखाली ‘बॉक्साइट सदृश्य’ गौण खनिजाची वाहतूक : स्थानिकांचा संशय

कर्नाटक गुलबर्गा येथील सिमेंट कंपनीत क्रश केलेल्या जांभ्या दगडाचा पुरवठा

जांभ्या दगडात ‘बॉक्साईट ‘चे प्रमाण असल्याची तज्ञांची माहिती

सावंतवाडी

निरवडे येथे मंगळवारी सायंकाळी महसूल विभागाने धाड टाकत दोन दहा चाकी ट्रक जप्त केले. या ट्रकांमधून क्रश केलेल्या जांभ्या दगडाच्या नावाखाली बॉक्साइट सदृश्य खनिजाची वाहतूक होत असल्याचा संशय स्थानिकांनी व्यक्त केला आहे. सदरचे बॉक्साइट युक्त खनिज कर्नाटक गुलबर्गा येथील एका सिमेंट फॅक्टरीत पाठविण्यात येत असल्याची खात्रीलायक माहितीही प्राप्त झाली आहे. त्यामुळे महसूल विभाग आता याबाबत नेमके कोणते पाऊल उचलणार याकडे लक्ष लागले आहे.

निरवडे पलतडवाडी येथे मंगळवारी सायंकाळी क्रश केलेला जांभा दगड दोन दहा चाकी ट्रक मधून वाहतूक केला जात असताना स्थानिकांनी ही वाहतूक रोखली. सदर गाड्यांच्या वाहतुकीमुळे नवीनच तयार करण्यात आलेला डांबरीकरणाचा रस्ता उखडला गेल्याने संतप्त ग्रामस्थांनी या गाड्या रोखल्या. या गाड्यांची पाहणी केली असता सदरचा प्रकार निदर्शनास आला. त्यानंतर स्थानिक ग्रामस्थांनी याबाबत तहसीलदार श्रीधर पाटील यांना माहिती दिल्यानंतर महसूल विभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी या दोन्ही गाड्या जप्त करीत तहसील कार्यालयात नेल्या.
सदरच्या दोन्ही ट्रकमध्ये क्रश केलेल्या जांभ्या दगडाचे तुकडे दिसून येत आहेत. तसेच त्यामध्ये काही पांढऱ्या रंगाचे दगडांच्या तुकड्यांचा समावेश आहे. महसूल विभागाने सदरचे दगड हे क्रश केलेले जांभा दगड असल्याचा निर्वाळा देऊन संबंधितांची पाठराखण करण्याचा प्रयत्न केला असला तरीही एवढ्या दूर कर्नाटक गुलबर्गा येथे जांभ्या दगडाचे टाकाऊ तुकडे नेण्यामागचे नक्की कारण काय याबाबतची माहिती महसूल विभाग देऊ शकला नाही. त्यामुळे यामागे नक्की काय दडलं आहे याबाबत कुतूहल निर्माण झाले आहे.

जांभ्या दगडांचे हे तुकडे कर्नाटक गुलबर्गा येथे पाठविण्यात येणाऱ्या या यंत्रणेकडून गेल्या सहा महिन्यात सावंतवाडी तालुक्यातील आजगाव, धाकोरे, मळेवाड, तळवणे यासारख्या जांभा दगड उत्खनन करणाऱ्या भागातून हा जांभा दगड उपलब्ध करून तो निरवडे पलतडवाडी येथील एका जागी डंप केला जात होता. मुळात हा दगड थेट जाग्यावरून वाहतूक न करता तो निरवडे येथे डंप करण्यामागचे कारणही संशयास्पद आहे. डम्पिंग यार्ड साठी कोणतीही परवानगी न घेता डंप करण्यात आला होता. शिवाय त्याची रॉयल्टी ही संबंधित यंत्रणेकडून भरणा करण्यात आलेली नसल्याने यामागे महसूल यंत्रणेचा आशिर्वाद आहे का असा सवालही उपस्थित होत आहे. त्यामुळेच या दगडात बॉक्साईटचे प्रमाण असून त्याची अनधिकृत वाहतूक कर्नाटक येथे होत असल्याचा संशय स्थानिकांनी व्यक्त केला आहे.
याबाबत तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार सिंधुदुर्ग रत्नागिरी व गोवा या भागात जांभ्या दगडामध्ये काही अंशी बॉक्साईटचे प्रमाण आढळते.भारतात आढळणारे साठे सामान्यतः जांभ्यासमवेत आढळतात. बॉक्साइट हे ॲल्युमिनियमाचे सर्वात महत्त्वाचे धातुक असून ते मुख्यत्वे ॲल्युमिनियम धातू मिळविण्यासाठी वापरले जाते. तसेच उष्णतारोधी पोर्सलीन व सिमेंट तयार करण्यासाठीही बॉक्साइट वापरतात. त्यामुळे यासाठीच गुलबर्गा येथील सिमेंट फॅक्टरीत येथील गौण खनिजाची वाहतूक होत असावी, असाही संशय स्थानिकांनी व्यक्त केला आहे. तसेच या यंत्रणेशी संबंधित एका व्यक्तीने दिलेल्या खात्रीलायक माहितीनुसार सदरचे गौण खनिज गुलबर्गा येथील एका सिमेंट फॅक्टरीत नेण्यात येत असून तेथून सिमेंटची आयात मोठ्या प्रमाणात केली जाते.

या पार्श्वभूमीवर महसूल विभागाने जप्त करण्यात आलेल्या ट्रक मधील खनिजाचे सॅम्पल घेऊन त्याची विशेष प्रयोगशाळेत तपासणी करून त्यात खरोखरच बॉक्साईटचे प्रमाण आहे का याचा तपास करावा व त्यानंतरच जप्त करण्यात आलेल्या गाड्या सोडण्यात याव्यात अशी मागणी स्थानिकांनी केली आहे. महसूल विभागाकडून मात्र सदरच्या ट्रक मधून क्रश केलेला जांभा दगडच वाहतूक केला जात होता. त्यामुळे त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करून गाड्या सोडण्यात येतील अशी माहिती देण्यात आली आहे.

जिल्हाधिकाऱ्यांचे लक्ष वेधणार : स्थानिक ग्रामस्थांची माहिती

निरवडे पलतडवाडी येथे क्रश केलेल्या जांभ्या दगडाची वाहतूक करताना दोन दहा चाकी ट्रक महसूल विभागाने जप्त केले. या प्रकार मधील जांभा दगडात बॉक्साईट सदृश्य गौण खनिज असल्याचा संशय व्यक्त करीत याबाबत महसूल विभागाने तपासणी करून या अवैध गौण खनिज वाहतुकीवर कारवाई करावी अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांनी केली आहे. याबाबत स्थानिक महसूल यंत्रणांकडून योग्य ती कारवाई न झाल्यास याकडे जिल्हाधिकाऱ्यांचेही लक्ष वेधणार असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

ten − seven =