You are currently viewing शासनाकडून मिळणाऱ्या विविध सवलतींचा लाभ घेऊन महिलांनी सक्षम बनावे – प्रज्ञा परब

शासनाकडून मिळणाऱ्या विविध सवलतींचा लाभ घेऊन महिलांनी सक्षम बनावे – प्रज्ञा परब

वेंगुर्ले नगरपरिषदेकडून महिला स्वयंसहाय्यता बचत गटांचा स्नेहमेळावा…

वेंगुर्ले

येथील नगरपरीषद महिलांसाठी राबवित असलेल्या योजनांच्या माध्यमातून महिला बचत गटांनी विविध व्यवसाय करावेत. शासनाकडून मिळणाऱ्या सवलतींचा लाभ घेऊन महिलांनी सक्षम बनावे, असे प्रतिपादन महिला काथ्या कामगार औद्योगिक सहकारी संस्थेच्या व्यवस्थापकिय संचालिका सौ. प्रज्ञा परब यांनी नगरपरीषदेमार्फत आयोजित महिला स्वयंसहाय्यता बचत गटांचा स्नेहमेळाव्यात केले.
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून वेंगुर्ला नगरपरिषदेच्या कँम्प येथील नाटककार मधुसूदन कालेलकर बहुदेशीय सभागृहात आयोजित केलेल्या महिला स्वयंसहाय्यता बचत गटांचा स्नेहमेळावाचे उद्घाटन महिला काथ्या कामगार औद्योगिक सहकारी संस्थेच्या व्यवस्थापकिय संचालिका सौ. प्रज्ञा परब यांच्या हस्ते दिपप्रज्वलनाने झाले.

या प्रसंगी व्यासपिठावर उपस्थित मान्यवरांत वेंगुर्ले तालुक्याच्या वैद्यकिय अधिकारी डॉ. सौ. अश्विनी माईणकर-सामंत, महिला काथ्या कामगार औद्योगिक सहकारी संस्थेच्या व्यवस्थापकिय संचालिका सौ. प्रज्ञा परब, सौ. धनश्री पाटील, नगरपरीषदेच्या प्रशासकिय अधिकारी सौ. संगीता कुबल यांचा समावेश होता.

या कार्यक्रमांत वेंगुर्ले तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सौ. अश्विनी माईणकर-सामंत यांनी महिलांना आरोग्यविषयक शासनाकडून मिळणाऱ्या सोयी व सुविधा यांची माहिती देत महिलांनी वेळेत आरोग्य तपासणी करून घ्यावी. असे स्पष्ट केले. प्रमुख पाहुण्या काथ्या प्रकल्पाच्या व्यवस्थापकिय संचालिका सौ. प्रज्ञा परब व बँ. बाळासाहेब खर्डेकर डॉ. सौ. धनश्री पाटील यांनी उदयोगांतील संधी आणि साध्य याबाबतचे मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमांत विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी केलेल्या सानिया आंगचेकर, संस्कृती गावडे, स्नेहा नार्वेकर, पूजा धुरी, निरजा मडकर, फाल्गुनी नार्वेकर यांचा सत्कार करण्यात आला. डॉ. प्रा. धनश्री पाटील यांनी नगर परिषदे मार्फत ‘”पर्यावरण दुत”‘ म्हणून सन्मानित करण्यात आले. तसेच वेंगुर्ला नगरपरिषद आयोजित `कचऱ्यातून कल्पकता’ या स्पर्धेचा बक्षिस वितरण सोहळा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.

यानंतर निरजा माडकर हिने गणेश वंदना सादर केली. तदनंतर पूर्णप्राथमिक भटवाडी शाळा नं. 2 च्या मुलांनी `स्वच्छ भारत अभियान’ या विषयावर पथनाटय सादर केले. तसेच बँ. खर्डेकर महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी प्लँस्टीक बंदीवर एक उत्कृष्ट पथनाटय सादर केले. नगरपरिषदेने बचत गटांच्या महिलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी व त्यांची कला सादर करण्यासाठी एक मंच दिला. महिलांनी आपल्या बचत गटांमार्फत विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करुन त्याचा आनंद घेतला.यावेळी महिला स्वयंसहाय्यता बचत गटा मार्फत प्रशासकिय अधिकारी, सौ. संगिता कुबल, विलास ठुंबरे, अतुल अडसूळ व सौ. मनाली परब यांचा सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. संगिता कुबल, सौ. शिवानी ताम्हणेकर यांनी केले. वेंगुर्ला नगरपरिषदेचे मुख्याधिकारी परितोष कंकाळ यांच्या मार्गदर्शनाखाली नगर परिषद अधिकारी कर्मचारी, साप्ताहिक किरातच्या संपादक सिमा मराठे, माजी नगरसेवक प्रशांत आपटे, फोटोग्राफर रवि वारंग व साऊंड सिस्टीम चालक भानुदास मांजरेकर यांचे तसेच दै. तरुण भारतचे सिंधुदुर्ग आवृत्ती प्रमुख शेखर सामंत व शिक्षक बाळासाहेब पाटील यांनी वेंगुर्ले नगरपरीषदेच्या कार्यक्रमासाठी केलेल्या सहकार्याबद्दल त्यांचाही नगरपरीषदेच्या वतीने संगिता कुबल यांनी आभार मानले.

प्रतिक्रिया व्यक्त करा