महिला व्यावसायिकेचे हजारोंचे नुकसान;आग लावणाऱ्या युवकास पोलिसांनी केली अटक
दोडामार्ग
मासे विक्री करण्यासाठी तात्पुरत्या स्वरूपात उभारलेल्या झोपडीला आग लावून जाळल्याची तक्रार फिर्यादी दर्शना दशरथ जाधव यांनी संशयित संतोष बोडेकर यांच्या विरुद्ध दोडामार्ग पोलिस ठाण्यात दिली आहे. दिलेल्या तक्रारी नुसार संशयितावर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आल्याची माहिती पोलिस ठाण्यातून देण्यात आली.
या प्रकरणी दोडामार्ग पोलीस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी की, वझरे येथील दर्शना जाधव यांचा दोडामार्ग शहरात मासे विक्रीचा व्यवसाय आहे. मच्छि विक्री बाजारपेठेत निवाऱ्यासाठी झोपडी उभारून आपला व्यवसाय थाटला आहे. आठवड्यातील सोमवार व गुरुवार या दोन दिवशी त्यांचे मासे विक्रीचे दुकान बंद असते. त्यानुसार सोमवारी दुकान बंद होते. त्यादिवशी रात्री ९.३० वाजण्याच्या सुमारास त्यांच्या दुकानाला संतोष बोडेकर हा युवक आग लावत असल्याचे बाजूच्या एका दुकानदाराकडून दर्शना जाधव यांना समजले. लागलीच त्यांनी पती समवेत घटनास्थळी धाव घेतली. दुकाना शेजारी पोहोचे पर्यंत दुकानातील सामान जळाले होते. या घटनेत त्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
तात्काळ दर्शना जाधव यांनी पोलिस ठाण्यात धाव घेत घडलेली हकीगत कथन केली व तशी फिर्याद पोलिसांना दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारी नुसार संतोष बोडेकर याच्यावर गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे. आग लावण्यामागचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसल्याचे पोलिसांनी सांगितले.