You are currently viewing अंगणवाडी मदतनीस,अंगणवाडी सेविका भरतीत दहावी शिक्षणाची अट रद्द; बारावी उत्तीर्ण असणे अनिवार्य

अंगणवाडी मदतनीस,अंगणवाडी सेविका भरतीत दहावी शिक्षणाची अट रद्द; बारावी उत्तीर्ण असणे अनिवार्य

*अंगणवाडी मदतनीस,अंगणवाडी सेविका भरतीत दहावी शिक्षणाची अट रद्द; बारावी उत्तीर्ण असणे अनिवार्य*

*स्थानिक स्वराज्य संस्थांच्या बालवाड्या बंद होऊन केंद्र सरकार पुरस्कृत अंगणवाड्या सुरु होणार*

*शिंदे भाजप सरकारकडून घातलेल्या शिक्षणाच्या अटीमुळे अनेक ग्रामीण भागातील महिलांवर होणार अन्याय*

*अन्यायकारक निर्णय रद्द न झाल्यास शिवसेना महिला जिल्हाप्रमुख जान्हवी सावंत यांचा आंदोलनाचा इशारा*

एकात्मिक बाल विकास सेवा योजना या केंद्र सरकार पुरस्कृत योजनेअंतर्गत राज्यात ज्या ठिकाणी नवीन
अंगणवाडया सुरु करण्यात येतील,अशा ठिकाणी यापूर्वी ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद,
महानगरपालिका, नगरपालिका व कॅन्टोनमेंट बोर्ड (कटक मंडळे) समाज कल्याण विभाग, शिक्षण विभाग, केंद्रीय वराज्य समाज कल्याण सल्लागार बोर्ड यांच्या बालवाडया सुरु असतील तर अशा बालवाड्या बंद करण्यात याव्यात तेथील बालवाडी शिक्षिका १२ वी उत्तीर्ण असेल तरच तिला नविन अंगणवाडी केंद्रातील “अंगणवाडी सेविका” या मानधनी पदावर थेट नियुक्ती देण्यात यावी.बंद होणाऱ्या अशा अंगणवाड्यांमध्ये अनेक शिक्षिका १२ वी पेक्षा कमी शिक्षण असलेल्या आहेत त्या शिक्षिकांना मात्र “अंगणवाडी सेविका” म्हणून नियुक्ती दिली जाणार नाही. अंगणवाडी सेविका, मिनी अंगणवाडी सेविका तसेच मदतनीस पदाच्या नवीन भरतीत देखील दहावी शिक्षणाची अट रद्द करून इयत्ता १२ वी उत्तीर्ण अशी किमान शैक्षणिक पात्रता ठेवण्यात आली आहे.तसा शासन निर्णय राज्याच्या महिला व बाल विकास विभागाने २ फेब्रुवारी २०२३ रोजी निर्गमित केला आहे. त्यामुळे अंगणवाड्यांमधील अनेक शिक्षिकांवर त्याचबरोबर अंगणवाडी भरती प्रक्रियेत उतरणाऱ्या ग्रामीण भागातील महिलांवर शिंदे भाजप सरकार कडून अन्याय केला जात आहे. अशी माहिती शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या महिला जिल्हाप्रमुख जान्हवी सावंत यांनी दिली असून हा अन्याय कारक निर्णय रद्द न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा जान्हवी सावंत यांनी दिला आहे.

जान्हवी सावंत म्हणाल्या या शासन निर्णयात सध्या कार्यरत असणाऱ्या अंगणवाडी मदतनीस केवळ अंगणवाडीचेच काम करत नसून ग्रामीण स्तरावर शासनाचा प्रत्येक उपक्रम राबविण्यासाठी मदतकार्य करतात.अशा मदतनिसांचे शिक्षण १२ वी पेक्षा कमी आहे. शासनाच्या या नवीन निर्णयामुळे पूर्वीच्या अंगणवाडी मदतनिसांचा रोजगार हिरावला जाणार आहे. नवीन उमेदवारांना देखील १२ वी शिक्षणाची अट भोवणार आहे.त्याचबरोबर “अंगणवाडी सेविका” म्हणून नियुक्ती दिली जाणाऱ्या शिक्षिकेने बालवाडी शिक्षिका म्हणून किमान दोन वर्ष सेवा पूर्ण केलेली असावी. या तरतूदीनुसार खाजगी अथवा स्वयंसेवी संस्थेमार्फत (जरी कोणत्याही विभागाकडून अनुदान मिळत असेल तरीही) चालविण्यात येणा-या बालवाडी केंद्रातील शिक्षिकांना अंगणवाडी सेविका म्हणून थेट नियुक्ती देखील मिळणार नाही.
अंगणवाडी मदतनीस / मिनी अंगणवाडी सेविका यांना अंगणवाडी सेविका पदावर थेट नियुक्तीचा लाभ देण्यात आल्यानंतर अशा अंगणवाडी सेविकांना त्यांचे निवासस्थानापासून नियुक्ती देण्यात आलेल्या ठिकाणापर्यंत कोणताही प्रवास भत्ता अनुज्ञेय राहणार नाही. अंगणवाडी सेविका थेट नियुक्तीची प्रकरणे निकाली काढल्यानंतर रिक्त राहणा-या तसेच सेवानिवृत्तीमुळे अथवा अन्य कारणामुळे पद रिक्त झाल्यानंतर त्याठिकाणी नवीन भरती करताना अंगणवाडी सेविका, मिनी अंगणवाडी सेविका तसेच मदतनीस पदासाठी इयत्ता १० वी शिक्षणाची अट रद्द करून १२ वी उत्तीर्ण अशी किमान शैक्षणिक पात्रता आवश्यक असल्याची माहिती जान्हवी सावंत यांनी देत हा निर्णय अन्यायकारक असल्याचे सांगितले.

प्रतिक्रिया व्यक्त करा