नागरिकांपेक्षा चोरांना संरक्षण का…?
सावंतवाडी शहरात पेट्रोल चोरीच्या घटना वारंवार घडत आहेत. एकीकडे सरकारने पेट्रोलचे दर गगनाला भिडवले आहेत तर दुसरीकडे पेट्रोल चोरीमधून विनासायास पैसा मिळतो त्यामुळे पेट्रोल चोरीच्या घटना वाढत आहेत. सावंतवाडी शहराच्या सालईवाडा भागातील घरे, इमारतींमधील अनेक रहिवासी पेट्रोल चोरीमुळे त्रस्त आहेत.
सकाळी कामावर जायच्यावेळी गाडी पेट्रोल पंपवर नेण्यापेक्षा नोकरदार वर्ग पेट्रोल टाक्या फुल्ल करून ठेवतात आणि याचाच फायदा पेट्रोल चोर उठवतात याचा प्रत्यय सालईवाडा भागातील मिलाग्रीस हायस्कूलच्या मागील परिसरातील घरे, इमारतींमध्ये राहणाऱ्या नागरिकांना येत आहे. “समृद्धी अपार्टमेंट” ही इमारत विरळ लोकवस्ती असलेल्या सालईवाडा भागात आहे. या परिसरातील घरे, इमारतीमध्ये डॉक्टर, प्रोफेसर, बँकर्स, आणि सरकारी नोकरवर्ग राहतो. त्यामुळे अनेकजण सकाळी कामावर जाण्याच्या घाईत असतात. अशावेळी पेट्रोल चोरी होत असल्याने नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. इमारतीमध्ये नेहमी पेट्रोल चोरी होत असल्याने सदर घटनेचा छडा लावण्यासाठी इमारतीमध्ये सीसीटिव्ही लावून पेट्रोल चोरी करणाऱ्या तीन चोरट्यांचा माग काढून त्यांना पकडण्यात आले. गाडीच्या डिक्की सीट उचकटून पेट्रोल काढतानाचे व्हिडिओ कैद झाले आहेत. त्यांनी आपण चोरी केल्याचे कबूलही केले. परंतु सावंतवाडी पोलीस प्रशासनाकडून नागरिकांनी तक्रार देऊनही चोरांवर कडक कारवाई केली जात नाही. उलट तक्रारदार व्यक्तींकडून तक्रार नसल्याचे लिहून घेतल्याचे सूत्रांकडून समजते. त्यामुळे नागरिकांपेक्षा पोलीस चोरांची सुरक्षितता राखतात की काय❓ असा प्रश्न उभा राहिला आहे.
सालईवाडा भागातील चोरी प्रकरणातील संशयित तीन तरुण युवक असून त्यातील मुख्य संशयित हा नभातील “तारा” असलेला पिळून काढलेला निवृत्त शाळा शिक्षिकेचा मुलगा असल्याचे समोर येत आहे. तर त्याचे साथीदार देखील सावंतवाडी शहरा लगतच्या गावातील “जया” आणि “सोटी” नामक तरुण आहेत. सालईवाडा भागातील मिलाग्रीस शाळेच्या लगत असलेल्या इमारती मधील एका सरकारी अधिकाऱ्यांच्या गाडीचे, त्याच प्रमाणे बागकर शेत परिसरातील घरांच्या अंगणात ठेवलेल्या गाड्यांचे मालक हेरून त्यांच्या गाड्यांतील पेट्रोल चोरी होत असल्याचे समजते. ही घटना साधी क्षुल्लक वाटत असली तरी पेट्रोल चोरी ही गंभीर बाब असून डिकी उघडल्याने डिकितील महत्त्वाचे कागद आदी देखील गहाळ होण्याची भीती असल्याने सावंतवाडी पोलिसांकडून याची गंभीर दखल घेणे आवश्यक होते. भविष्यात विशितील हेच तरुण घरफोडी सारखे गुन्हे देखील करू शकतात. त्यामुळे आत्ताच त्यांच्यावर योग्य ती कारवाई होऊन वचक बसविणे आवश्यक आहे. परंतु सावंतवाडी पोलिस सदर घटनेची गंभीर दखल का घेत नाहीत…? हे मात्र कोडे आहे…जिल्हा पोलीस प्रमुखांनी याची योग्य ती दखल घ्यावी अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.